Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणKonkan Anganewadi Yatra : कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या यात्रेला आजपासून सुरुवात

Konkan Anganewadi Yatra : कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या यात्रेला आजपासून सुरुवात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राजकीय नेत्यांनी लावली हजेरी

सिंधुदुर्ग : कोकणातील (Konkan) प्रति पंढरपूर या नावाने ओळखली जाणारी आंगणेवाडीची जत्रा (Anganewadi Yatra) महाराष्ट्रातल्याच नाही तर देश-विदेशातल्या पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र आहे. आंगणेवाडीच्या जत्रेत लाखो भाविक गर्दी करत असतात. मालवणच्या मसुरे गावातील आंगणेवाडी या ठिकाणी असलेल्या भराडी देवीच्या यात्रेला (Bharadi Devi Yatra) मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत असतात. तसंच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचीही या यात्रेत उपस्थिती असते. आजपासून या यात्रेला सुरुवात होत आहे.

आंगणेवाडीतल्या आंगणे कुटुंबाची ही देवी आहे. तसा ‘आंगणे कुटुंबीयांचं खाजगी मंदिर’ म्हणून फलक लावला आहे. मात्र, या देवीचं दर्शन सगळ्यांसाठी खुलं असतं. कोकणवासीयांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या जत्रेला यंदाही राजकीय मंडळी उपस्थिती दर्शवतात. यंदाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar), यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar), उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) आंगणेवाडीत दाखल झाले आहेत.

नवसाला पावणारी देवी असा भराडी देवीचा लौकिक

आंगणेवाडीतल्या आंगणे कुटुंबाच्या या देवीचा नवसाला पावणारी देवी असा लौकिक आहे. दरवर्षी सुमारे पाच ते सात लाख भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी केवळ दीड दिवसांच्या जत्रेमध्ये सहभागी होतात. मागच्या वर्षी या यात्रेला सात लाख भाविकांची उपस्थिती होती. यावर्षी ही संख्या आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. गाऱ्हाणं आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडीदेवीचं दर्शन घेतात. आंगणेवाडीच्या भराडी देवीचा नैवेद्य खास असतो. आंगणे कुटुंबियांच्या माहेरवाशिणी तो अबोल राहून करतात. या जत्रेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भाविकाला त्याचा लाभ घेता येतो.

भराडी देवी हे नाव कसं पडलं?

मसुरे गावात आंगणेवाडी नावाच्या वाडीत असणाऱ्या भराडी देवीची ख्याती महाराष्ट्रभरात आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीचा लौकिक आहे. भरडावर देवी प्रकट झाल्याने या देवीचं नाव भराडी देवी असं ठेवण्यात आलं. भराड म्हणजे माळरान, या देवीच्या मंदिराच्या आजूबाजूला असलेला परिसर हा माळरान आहे त्यामुळेच या देवीला भराडी देवी असं नाव पडलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -