Sunday, April 28, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सSmita Tambe : एव्हरी रोल इज ड्रीम रोल

Smita Tambe : एव्हरी रोल इज ड्रीम रोल

  • टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल

स्मिता तांबे हिने आपल्या सहज, सुंदर नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. ‘जोरम’ चित्रपटातील तिच्या अभिनयाचे जागतिक स्तरावर कौतुक झाले. व्यावसायिक व कलात्मक चित्रपटात तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला.

स्मिताचा जन्म साताऱ्याचा व शिक्षण पुण्याला मॉडर्न हायस्कूलमध्ये झाले. शाळेत ती डान्समध्ये भाग घ्यायची. पुण्याच्या प्रा.रामकृष्ण मोरे कला वाणिज्य महाविद्यालयातून सत्तावीस वेळा ती वाद-विवाद स्पर्धेतून राज्यातून प्रथम आली. त्यामुळे तिच्यात स्टेजची भीती नाहीशी झाली. हा तिला तिच्या जीवनातील टर्निंग पॉइंट वाटतो. मराठी लोकसाहित्य व समाज या विषयावर तिला पीएच.डी.करायचे होते.

परंतु ‘सोनियाचा उंबरा’ ही पहिली मालिका तिला मिळाली. हेमंत देवधर त्या मालिकेचे दिग्दर्शक होते. ई टी.वी.वर ही मालिका होती. सेटवर काम झाल्यावर तिचे कौतुक केले. ते तिला आवडले. त्यानंतर ‘जोगवा’ चित्रपट तिने केला. तो चित्रपट खूप हिट ठरला. या चित्रपटानंतर तिला या क्षेत्राची आवड निर्माण झाली. या क्षेत्रात काहीतरी कारावेसे वाटले. हे क्षेत्र तिला खुणावतेयं असे वाटू लागले. अमोल पालेकर दिग्दर्शित ‘धूसर’ चित्रपटातील तिच्या अभिनयाची खूप चर्चा झाली. रिमा लागू, उपेंद्र लिमये त्यामध्ये तिच्यासोबत होते. त्यानंतर तिने ‘पांगिरा’, ‘नाती गोती’ चित्रपट केले. ‘७२ मैल एक प्रवास’हा चित्रपट तिच्या जीवनातला महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला. दिग्दर्शक राजीव पाटीलकडून भरपूर गोष्टी तिला शिकायला मिळाल्या. मराठी चित्रपटसृष्टीतून तावून सुलाखून निघाल्यानंतर तिचा अभिनयाचा मोर्चा हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळला. ‘पंगा’, ‘सिंघम रिटर्न’, ‘सिक्रेड गेम्स’, ‘नूर’, ‘रुख’ हे चित्रपट तिने केले. ‘नाळ २’ चित्रपटात तिची महत्त्वपूर्ण अशी आईची भूमिका होती.

‘जोरम’ चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. झारखंड राज्यातील फुलो कर्मा ही व्यक्तिरेखा तिने साकारली होती. एक आई जी मुलाचा बदला घेण्यासाठी तडफडत आहे. बाप मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. प्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयीसोबत तिचा हा दुसरा चित्रपट होता. तिच्याबद्दल कुठे चांगल्या प्रतिक्रिया आल्या, तर मनोज आवर्जून तिला त्या कळवायचा. या चित्रपटाला भरपूर पुरस्कार मिळाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर या चित्रपटाची व तिच्या अभिनयाची देखील नोंद घेतली गेली. या चित्रपटातील अभिनयासाठी तिचा आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असा गौरव करण्यात आला. तुझा ड्रीम रोल कोणता? असा प्रश्न तिला केला असता ती म्हणाली, ‘एव्हरी रोल इज ड्रीम रोल’ स्मिताचा हा लक्षवेधी प्रवास असाच सुरू राहील अशी अपेक्षा बाळगण्यात काहीच हरकत नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -