Saturday, April 27, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यकर नियोजनाची धावपळ

कर नियोजनाची धावपळ

उदय पिंगळे, मुंबई ग्राहक पंचायत

आर्थिक वर्ष संपायला आता केवळ थोडेच दिवस शिल्लक आहेत. अशा वेळी कराचे नियोजन करताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी उपयोग व्हावा या हेतूने हा लेख लिहिलेला आहे.

शेवटच्या क्षणी बेसावधपणे केली जाणारी चुकीची गुंतवणूक : अनेकदा ८० C खाली सवलत मिळवण्यासाठी करण्यात येणारी गुंतवणूक ही इन्शुरन्स कंपन्यांच्या गुंतवणूक योजनांत किंवा युलीप सारख्या साधनात केली जाते. गुंतवणूक
म्हणून त्यातून मिळणारा लाभ अन्य ठिकाणाहून मिळणाऱ्या लाभापेक्षा कमी असतो. यावर मोफत (?) देण्यात येणारे विमा संरक्षण अपुरे असते. मधेच पैसे काढून घेतल्यास पहिल्या वर्षी भरलेला बराचसा हप्ता परत मिळत नाही. त्यामुळे पैसे मिळाले तरी त्यावरील निव्वळ परतावा मामुली असतो. जीवनविमा हवा असेल तर टर्म इन्शुरन्स हा योग्य पर्याय राहील. कर वाचवायचा असेल तर म्युच्युअल फंडाच्या करबचत योजना आहेत. त्यात केवळ तीन वर्षे गुंतवणूक अडकून राहू शकते. याशिवाय पीपीएफ, एनएससी, इपीएफ यांसारखे अन्य सुरक्षित पर्यायही उपलब्ध आहेत. करबचत करण्यासाठी करण्यात येणारी गुंतवणूक किंवा खर्च हे ३१ तारखेपर्यंत करावेत.

आरोग्य विम्याचा हप्ता : स्वतःसाठी, कुटुंबासाठी तसेच आपल्या पालकांचा आरोग्यविमा असल्यास त्यावर ८० DDB नुसार आयकरात सूट मिळू शकते. जोखीम व्यवस्थापन म्हणून या योजना घ्याव्यात. वेळेवर त्याचे हप्ते भरावेत.

एनपीएसमधील गुंतवणूक : यातील पन्नास हजारांच्या गुंतवणुकीस ८० CCD 1 B नुसार अधिकची करसवलत आहे.

अग्रीम कर न भरणे : मुळातून करकपात होणं आणि आपल्याला कर द्यावा लागणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. ज्याचे उत्पन्न खरोखरच कर मर्यादेच्या आत आहे ते मुळातून कर कापू नये यासाठी १५ G / H फॉर्म भरून सूचना देऊ शकतात; परंतु ज्याचे उत्पन्न निश्चित करपात्र आहे हे माहिती असूनही असा फॉर्म भरून देणे चुकीचे आहे. उत्पन्न अधिक असल्यास नियमानुसार अग्रीम कर वेळोवेळी भरावा लागतो. तो न भरल्यास त्या तारखेपासून दंड विनाकारण भरावा लागतो. तेव्हा आपल्या उत्पन्नाची कच्ची नोंद ठेवून एकूण उत्पन्नाचा अंदाज घेऊन वेळोवेळी करभरणा करावा. १५ मार्चपर्यंत अंदाजित उत्पन्नाचा अपेक्षित करभरणा पूर्ण करावा असा नियम आहे, नाहीतर त्यावर दंड बसेल. या वर्षी शेअर बाजाराने अनेकांना मालामाल केल्याने उत्पन्नात भरीव वाढ होण्याची शक्यता आहे. मिळणाऱ्या रकमेतून मुळातून करकपात केली जात नाही. त्यामुळे भरावा लागणारा कर आणि त्यावरील दंडव्याज अधिक होऊ शकते. याचा अंदाज घेऊन अग्रीम कराचा भरणा व्याजासह ताबडतोब करावा. काही फरक निघत असल्यास विवरणपत्र भरताना त्याचे समायोजन करता येईल.

टॅक्स लॉस हार्वेस्टिंग : शेअर बाजारातील झालेल्या भांडवली नफ्यामध्ये भांडवली तोटा समायोजित करून आपले करदायित्व कमी करता येते. आपल्या गुंतवणूक संचात असलेले तोट्यातील शेअर्स विकून तोटा होईल. हा तोटा अल्प आणि दीर्घ मुदतीच्या फायद्यात मिळवला असता निव्वळ फायदा कमी म्हणजेच करदेयता कमी होते. तोट्यात विकलेले शेअर्स आपल्याला ठेवायचे असल्यास विकलेल्या किंवा त्याच्या आसपासच्या भावात खरेदी केल्यास आपल्या गुंतवणूक संचात काहीच बदल होणार नाही आणि अधिक करबचत होईल. हे पूर्णपणे कायदेशीर असून त्यास टॅक्स लॉस्ट हार्वेस्टिंग म्हणतात.

करविषयक बऱ्याच सवलती या जुन्या पद्धतीने करमोजणी केल्यासच मिळतात. तेथे कराचा दर अधिक आहे तर नवीन पद्धतीने केलेल्या करमोजणीस बहुतेक ठिकाणी त्या मिळत नाहीत. पण तेथे करदर कमी आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीचा स्वीकार करत असलात तरी त्यामुळे करात फरक पडू शकतो. तेव्हा कोणत्या पद्धतीने कर मोजणी करावी ते दोन्ही पद्धतीने करमोजणी करून ठरवावे. नवीन पद्धतीने करमोजणी करायचे स्वीकारले तरीही गुंतवणूक करण्याचे थांबवू नये. कारण हीच गुंतवणूक तुम्हाला भविष्यात उपयोगी पडणारी आहे.

आपल्याला मिळणाऱ्या एकूण मिळकतीचा, त्यातून झालेल्या करकपातीचा सर्वसाधारण फायदा घ्यावा, यासाठी आयकर विभागाने AIS या नावाचे एक ॲप उपलब्ध करून दिले आहे. त्यामध्ये मागील दोन वर्षांसह चालू आर्थिक वर्षाच्या उत्पन्न आणि करकपातीची माहिती आहे. त्यात या आर्थिक वर्षातील डिसेंबरपर्यंतचे उत्पन्न, त्यातून आपला किंवा आपण दुसऱ्याचा मुळातून कापलेला कर, विशिष्ट आर्थिक व्यवहार, आपण स्वतंत्ररित्या भरणा केलेला अग्रीम कर, विभागाकडून करण्यात आलेली मागणी किंवा दिलेला रिफंड याशिवाय अन्य माहिती सहज मिळू शकते. बहुतेक ही माहिती अचूक असते तरीही मला आलेले अनुभव असे –

दोन कंपन्यांनी मला दिलेला डिव्हिडंड (रक्कम किरकोळ आहे) याची त्यात नोंद नव्हती. प्रधानमंत्री वयवंदन योजनेतील एलआयसीने दिलेले मासिक व्याज, पोस्टाच्या योजनेतील व्याज, सहकारी बँकेतील ठेवींवरील व्याजाचा त्यात समावेश नाही.
विशेष आर्थिक व्यवहारामध्ये – मी लार्सनचे सर्व शेअर्स पुनर्खरेदीस दिले होते. त्यातील काही शेअर्स स्वीकारून उरलेले शेअर्स परत आले असले तरी सर्वच शेअर्स ३२००ने विकल्याची चुकीची नोंद आहे.

वरील व्यवहारातील नफा १० (३४A) नुसार करमुक्त असला तरी प्रत्यक्षात या ठिकाणी कदाचित चुकीची नोंद किंवा नोंदच नाही असेही असू शकते. तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवूनच उत्पन्नाची मोजणी करावी. तसेच व्यवहारांच्या नोंदींसमोर सबमिट फीडबॅक असा पर्याय असेल तर आपले म्हणणे थोडक्यात पण नेमकेपणाने सांगावे.

या आर्थिक वर्षातील शेवटच्या तिमाहीच्या उत्पन्न आणि कराच्या नोंदी प्रत्यक्ष कराचा भरणा झाल्यावर म्हणजे १५ मे किंवा त्यानंतरच्या ७ दिवसांत तेथे अद्ययावत होतात त्या तपासून खात्री करून घ्याव्यात. आपल्याकडून उत्पन्नाची मोजणी करून त्यावरील कर योग्यच दिला जाईल ते पाहावे. तरीही त्यात त्रुटी राहिली तर विवरणपत्र भरले आहे ते मंजूरही झाले आहे तरीही सुधारीत विवरणपत्र ३१ डिसेंबरपूर्वी भरून द्यावे. अधिक भरलेला कर हा मागणी न केल्यास परत मिळत नाही आणि कोणत्याही कारणाने कमी कर भरला असेल तरीही खात्याकडून मागणी नोटीस येऊ शकते.
mgpshikshan@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -