Wednesday, June 26, 2024
Homeताज्या घडामोडीराज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तीव्र पडसाद

राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तीव्र पडसाद

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करत महाराष्ट्राचा अपमान केला आहे असे म्हणत विरोधकांसह सामान्य नागरिकांनी त्यांच्यावर सवाल उपस्थित केले आहेत. गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांचे हे वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे, त्यांना नारळ द्या, अशी मागणी आता विरोधकांनी केली आहे.

दुसऱ्या राज्यांबद्दल प्रेम असणाऱ्या व्यक्तींनी खुशाल तिकडे जाऊन रहावे – जयंत पाटील

परराज्यातील व्यक्तींमुळे मुंबईत पैसा नसून या राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावर मुंबई उभी आहे. दुसऱ्या राज्यांबद्दल प्रेम असणाऱ्या व्यक्तींनी खुशाल तिकडे जाऊन रहावे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यावर सुनावले आहे.

घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींनी अत्यंत जपून बोलण्याचा संकेत या देशातील सार्वजनिक जीवनात आहे. मात्र, काही महामहिम व्यक्तींनी त्यांच्या दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा चांगलाच चंग बांधलेला दिसत आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये लगावला आहे.

महाराष्ट्राच्या राजधानीत पंचतारांकित व्यवस्थेत राहून महाराष्ट्रातील मराठी माणसांचा अपमान राज्यपाल महोदय करत आहेत. महाराष्ट्रातील भाजपाला हे विधान मान्य आहे का? असा सवालही जयंत पाटील यांनी केला आहे.

राज्यपाल मराठी माणूस, महाराष्ट्राचा गौरवशाली व जाज्वल्य इतिहास यांचा वारंवार का अपमान करत आहेत? असा खडा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

राज्यपालांचे हे बोलणे अप्रस्तुत, राज्यपाल निर्विवाद असावेत- छगन भुजबळ

आदरणीय राज्यपाल हे आमचे मित्र पण त्यांनी असे वक्तव्य करणे शक्यतो टाळावे, यामुळे वाद वाढतात. राज्यपालांनी नेहमी निर्विवाद राहावे. ब्रिटिश असेल किंवा सगळ्यांनाच मुंबई आवडली होती. मुंबईत सर्व प्रकारचे लोक आहेत, अदानींना पण मुंबई आवडते. मुंबईला असलेले बंदर, व्यापार, उद्योग, विमानतळ अनेक कलाकार मुंबईतील. गुजराती, राजस्थानी सगळे आमचेच आहेत. देशाचे मुख्य न्यायाधीशही महाराष्ट्राचे. त्यामुळे मुंबईचे महत्व कसे कमी करता येईल? मुंबादेवीचा आशीर्वाद आहे मुंबईवर. राज्यपालांचे हे बोलणे अप्रस्तुत, राज्यपाल निर्विवाद असावे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राज्यपालांच्या वक्तव्यावर शिंदे गट नाराज, केंद्र सरकारला पत्र लिहिणार

राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात विरोधक आक्रमक झाले असताना शिंदे गटाने राज्यपालांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांविरोधात केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले. राज्यपालांनी केलेले वक्तव्य हे राज्याचे अपमान करणारे आहे, असेही ते म्हणाले.

राज्यपाल घटनात्मक पद आहे. त्यामुळे कोश्यारी यांच्याकडून यापुढे अशी विधाने येणार नाही अशी सूचना केंद्राने द्यावी, असेही केसरकर यांनी म्हटले. मुंबईच्या उभारणीत सगळ्याच समाजाचा वाटा आहे. मात्र, त्यातही मोठा वाटा मराठी माणसांचा आहे. मुंबईतील औद्योगिक उभारणीत मुंबईच्या उभारणीत पारशी समुदायाचे मोठं योगदान आहे.

एखाद्या समाजाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या समाजाने पैसा काढला की मुंबईत काही राहणार नाही असे वक्तव्य म्हणजे राज्यपालांचा मुंबईबाबतचा अभ्यास कमी आहे, याचे द्योतक असल्याचे केसरकर यांनी म्हटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दौऱ्यावरून मुंबईत आल्यानंतर सगळे आमदार त्यांना भेटणार आहोत. राज्याच्या भावना राज्यपालांनी जपल्या पाहिजेत. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर मराठी माणसाची भावना केंद्र सरकारला कळवावी यासाठी मुख्यमंत्र्यांना आग्रह धरणार असल्याचे केसरकर यांनी म्हटले.

नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये

ज्यांना असे वाटते की आर्थिक प्रगती हीच प्रगती आहे, ही बौद्धिक दिवाळखोरी आहे. मराठी माणसाच्या त्यागामुळे मुंबई आणि महाराष्ट्र घडला आहे. मराठी माणसांमुळे इतरांचा फायदा झाला आहे. राज्यातील आधीच्या सरकारने जी धोरणं आखली त्यामुळे मुंबई, महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे आले. म्हणून इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र प्रगत झाला. महाराष्ट्राचा अपमान कदापी सहन करणार नाही. नको त्या ठिकाणी जे समजत नाही त्याबाबत त्यांनी बोलू नये, नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये, असे मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

हे पार्सल उत्तराखंडला परत पाठवण्याची वेळ आली

हे पार्सल उत्तराखंडला परत पाठवण्याची वेळ आली आहे, असे मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी म्हटले आहे. मागे सावित्रीमाई बद्दल आता मराठी, महाराष्ट्राबद्दल बेताल वक्तव्य केले आहे. हे पार्सल उत्तराखंडला परत पाठवण्याची वेळ आली आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. मराठी, महाराष्ट्राची सभ्यता, संस्कृतीचा अवमान होत असेल तर राज्यपाल या पदाचा मान, मरातब गेला चुलीत. ज्या विषयात कळत नाही तिथे चोमडेपणा करू नका, असे काळे यांनी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -