एका आदिवासी महिलेला देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे खरे पुरोगामित्व सिद्ध करून दाखविल्याने काँग्रेससह भल्याभल्यांचा मुखभंग झाला आहे, हे आता सिद्ध झाले आहे. कारण स्त्री-पुरुष समानता, जातीभेद यांना थारा न देणे, मागास-आदिवासींना सवलती बहाल करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आदींचा मक्ता केवळ आपल्याकडेच आहे, अशी शेखी काँग्रेस नेहमी मिरवित आली आहे. पण त्यांचे खरे रूप वेगळेच आहे. त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात पूर्णत: वेगळे आहेत, हे आताच्या महामहीम राष्ट्रपतींबाबतच्या एका वक्तव्यावरून सिद्ध होत आहे. त्याचे झाले असे की, काँग्रेसचे एक वाचाळ खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केलेल्या एका विधानाने काँग्रेसला पुन्हा एकदा ‘बधीर’ केले आहे. देशाच्या पहिल्या आदिवासी व दुसऱ्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत चौधरी यांनी आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यामुळे लोकसभेसह राज्यसभेतही अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळत आहे. लोकसभेचे कामकाज बंद पाडत भाजप खासदारांनी माफीची मागणी केली, तर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही सत्ताधारी भाजप खासदारांच्या आक्षेपाला उत्तर दिले आहे.
एका दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ असा केला. त्यावर भाजपच्या वतीने आक्षेप घेण्यात आला. त्याचे पडसाद संसदेतही पाहायला मिळाले. चौधरी यांच्या शब्दावर भाजपने तीव्र आक्षेप घेत हे शब्द घृणास्पद तसेच सर्व मूल्ये आणि संस्कारांना काळिमा फासणारे असल्याचे म्हटले आहे. देशाच्या घटनात्मक सर्वोच्च पदावर बसलेल्या आदिवासी महिलेचा अपमान केल्याने काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे. द्रौपदी मुर्मू यांना ‘राष्ट्रपत्नी’ म्हणून संबोधणे हे संस्कार आणि मूल्यांच्या विरोधात आहे. हे विधान सर्वोच्च घटनात्मक पदाच्या प्रतिष्ठेला धक्का देणारे असून काँग्रेसच्या एका पुरुष खासदार नेत्याने हे घृणास्पद कृत्य केल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अधीर रंजन चौधरी यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यांच्या या विधानाची भाजपच्या वतीने गंभीर दखल घेण्यात आली आहे. चौधरी यांनी माफी मागावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. काँग्रेस हा महिलाविरोधी पक्ष आहे तसेच काँग्रेस हा आदिवासी विरोधी पक्षही आहे. एक आदिवासी महिला राष्ट्रपती झालेली काँग्रेसला सहन होत नाही. त्यांच्या डोळ्यांत हा लक्षणीय बदल आणि हे यश खुपते आहे. काँग्रेसने राष्ट्रपतींची खिल्ली उडवली आहे. काँग्रेस पक्षाने द्रौपदी मुर्मू यांची माफी मागावी, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर चौफेर हल्लाबोल केला. स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी काँग्रेसचे वर्णन आदिवासी, गरीब आणि महिलांविरोधी पक्ष असे केले. द्रौपदी मुर्मूंना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवल्यापासूनच काँग्रेस त्यांची थट्टा करत आहे आणि या क्रमाने मुर्मूंना कधी कठपुतली, तर कधी अशुभ आणि अशुभाचे प्रतीक म्हणत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुर्मू यांनी निवडणूक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर, एक आदिवासी, गरीब महिला देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाला शोभते, हे सत्य काँग्रेसला अजूनही मान्य झालेले दिसत नाही, असेच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान या मुद्यावरून सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी विरोधी पक्षांच्या २० खासदारांना आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. या निलंबित खासदारांचे सभागृहाच्या आवारात आंदोलन सुरू आहे. महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर करण्यात येणाऱ्या या अंदोलनादरम्यान निलंबित खासदारांनी चिकन तंदुरी खाल्ली असल्याचा आरोप भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी केला आहे. म्हणजेच हे आंदोलन आहे की तमाशा?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
याच दरम्यान स्मृती इराणी आणि सोनिया गांधी यांच्यात वाद रंगलेला पाहायला मिळाला. इराणी यांच्या विधानावर सोनिया चांगल्याच संतापल्या आणि ‘डोन्ट टॉक टू मी’ असे म्हणत तडक निघून गेल्या. खरं म्हणजे सोनिया गांधी यांनी आपल्या पक्षाच्या नेत्याची चूक लक्षात घेऊन त्याला चांगल्याच कानपिचक्या द्यायला हव्या होत्या आणि पुन्हा अशा प्रकारची घोडचूक पुन्हा करू नये, अशी सक्त ताकीद द्यायला हवी होती. इतकेच नव्हे, तर त्याला महामहिम राष्ट्रपतींची माफी मागायला लावणे, इष्ट झाले असते. तसेच सोनियांनी पुढाकार घेऊन स्वत: या प्रकरणी पक्षातर्फे माफी मागून हे प्रकरण लागलीच निकालात काढायला हवे होते. पण ती सुबुद्धी त्यांना झाली नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल, तर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पक्षाच्या महिला खासदारांनी संसद भवनाबाहेर निदर्शने केली, तर दुसरीकडे काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. ‘मी चुकून ‘राष्ट्रपत्नी’ म्हणालो होतो. मी ठरवून ही बाब केलेली नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. भाजप जाणीवपूर्वक तिळाचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न करत आहे. आता तुम्हाला यासाठी मला फाशी द्यायची असेल, तर देऊ शकता’, असा शहाजोगपणा अधीर रंजन चौधरी यांनी यावेळी दाखवला. त्यामुळे वातावरण अधिकच बिघडले, तर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या महिला खासदारांनी संसद भवनाबाहेर निदर्शनेही केली. काँग्रेस इतक्या खाली घसरली आहे की, देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाच्या व्यक्तीचा अनादर करणे. तिच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविण्याचे काम काँग्रेस करीत आहे. काँग्रेसमध्ये असे ‘सेल्फगोल’ करणारे नेते असतील, तर या पक्षाचे कल्याणच आहे, असे म्हणावे लागेल. पक्षात असे बेलगाम वक्तव्ये करण्यास ‘अधीर’ असणारे नेते असतील, तर काँग्रेस पक्ष दिवसेंदिवस बधीर होऊन त्यांची नाचक्की होणार, हे निश्चित. या प्रकरणी त्यांच्या नेत्यांनी संसदेत आणि रस्त्यावर उतरून देशाच्या प्रथम नागरिकाची आणि देशाची माफी मागायला हवी, अशीच सार्वत्रिक भावना सध्या दिसत आहे.