Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाIPL 2024SRH vs MI: हैदराबादने मुंबईला धुतले, ३१ धावांनी केली मात

SRH vs MI: हैदराबादने मुंबईला धुतले, ३१ धावांनी केली मात

मुंबई: सनरायजर्स हैदराबादने आयपीएल २०२४च्या ८व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला ३१ धावांनी हरवले. सामन्यात हैदराबादने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ३ बाद २७७ इतकी सर्वोच्च धावसंख्या उभारली.

प्रत्युत्तरादाखल मुंबईच्या संघाला २० षटकांत ५ बाद २४६ धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईसाठी तिलक वर्माने प्रयत्न केले आणि ६४ धावांची सडेतोड खेळी केली. मात्र त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.

मुंबईने सामन्यात टॉस जिंकत बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला. पहिल्यांदा फलंदाजी करताना हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या रचली. याचा पाठलाग करताना मुंबईची मात्र पुरती दमछाक झाली. दरम्यान, मुंबईच्या फलंदाजांनी शेवटपर्यंत धावा करण्याचा प्रयत्न केला.

असा विखुरला डाव

२७८ म्हणजेच आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या मुंबईची सुरूवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि इशान किशनने पहिल्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली. मात्र चौथ्या ओव्हरमध्ये पहिला झटका इशान किशनच्या रूपात बसला. त्याने १३ बॉलमध्ये २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या.

त्यानंतर मुंबईने दुसरा विकेट रोहित शर्माच्या रूपात गमावला. पाचव्या ओव्हरमध्ये १ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने २६ धावा करून रोहित परतला. यानंतर तिलक वर्मा आणि नमन धीर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा जाग्या झाल्या. मात्र ११व्या ओव्हरमध्ये नमनची विकेट पडल्याने ही भागीदारी संपुष्टात आली. त्याने ३० धावा केल्या. यानंतर १५व्या षटकांत तिलक वर्मा पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर १८व्या षटकांत हार्दिक पांड्याच्या रूपात पाचवा झटका मुंबईला मिळाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -