Monday, May 6, 2024
Homeताज्या घडामोडीShirdi Saibaba : पदयात्री साईभक्त : विवेक मुळे

Shirdi Saibaba : पदयात्री साईभक्त : विवेक मुळे

मुंबई ते शिर्डी पायी पालखी घेऊन जाणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात गेली आहे. या पालखीची सुरुवात ७० च्या दशकात झाली. मुंबईहून या पालखीची सुरुवात साईभक्त विवेक मुळे यांनी केली. ती आजपर्यंत सुरू आहे. ते ५० वर्षांपासून मुंबई ते शिर्डी पदयात्रा करत आहेत. त्यांनी दैनिक प्रहारच्या ‘गजाली’ या कार्यक्रमात या प्रवासातले अनेक किस्से सांगितले. यावेळी दै. प्रहारचे महाव्यवस्थापक मनिष राणे तसेच लेखा व प्रशासन विभाग प्रमुख ज्ञानेश सावंत यांनी त्यांचे स्वागत केले.

पालखीचे भोई : विवेक मुळे

रूपाली केळस्कर

मुंबई ते शिर्डी हे सुमारे २५० किलोमीटरचं अंतर ५० वर्षांपूर्वी पायी चालण्याचे विचार मनात येणं तसं अशक्यच. अन् असे विचार १९ वर्षांच्या नुकत्याच यैवनात आलेल्या तरुणाला सुचणंही तितकचं अशक्य. पण हा दैवयोग होता. पूर्व संचित जुळून आलं होतं म्हणून विवेक मुळे नावाच्या एका तरुणाच्या मनात हे विचार घोळू लागले आणि त्यांनी हे अंतर पार करण्याचा मनाशी चंग बांधला. ते १९७५ साल होतं. त्या काळात आळंदी ते पंढरपूर पालख्या जात असतं. त्या पालख्याचं एक अप्रुप मनात दाटून आलं आणि विवेक मुळे यांनी १९७५ पायी शिर्डीला जाण्याचं ठरवलं. पायी पदयात्रा का करावी त्याचं विश्लेषण करताना मुळे सांगतात की, ‘प’ म्हणजे ‘पाप’, ‘द’ म्हणजे ‘दमन’ म्हणजे पापक्षालनासाठी पदयात्रा केली पाहिजे, असे विचार मनात आले.

पदयात्रेला जायचं म्हणजे वेळ हवा आणि सोबत कोणी तरी असायला हवं, म्हणून एकाला विचारलं तर तो म्हणू लागला अरे काय वेडाबिडा झालास की काय? त्या काळात महाराष्ट्र शासनाच्या केवळ दोन बस शिर्डीला जात. त्या पण फुल्ल भरून जात नव्हत्या. त्या काळात शंभर-दोनशे जण शिर्डीत जमा झाले तर जत्रेचे स्वरूप येत असे, गुरुवारी लोकं जमत, त्या काळात शिर्डी मोकळी होती. एवढं प्रस्थ नव्हतं. त्यामुळे पदयात्रेला येण्यासाठी काेणीही तयार नव्हतं.

या प्रवासाविषयी विवेक मुळे सांगतात की, अनेक दिवस हा विचार मनात घोळत होता. त्यात ज्यांच्या जवळ हा विषय काढला ते नकार देत. मित्र हेटाळणी करतील याची देखील शंका मनात होती. मग बाबांचा कौल घेण्याचे ठरवलं. त्यासाठी बसने शिर्डी गाठलं आणि चिठ्ठी टाकून कौल घेण्याचे मनोमन ठरवलं, पण उत्तर नकारार्थी आलं तर, ही देखील शंका मनात चाटून गेली. मग चावडीमध्ये असलेले एक सेवेकरी शिवनेश्वर स्वामी मार्गदर्शन करत ते आठवलं. त्यांना जाऊन व्यथा सांगू असं ठरवून त्यांची भेट घेतली. त्यांना सांगितलं, ते म्हणाले सोबत कोण कशाला हवं, आपण कोणाच्या भरोशावर येणार होतात. तर मी म्हणालो बाबांच्या भरोशावर… मग निश्चय पक्का झाला.

ही गोष्ट नाक्यावरच्या मित्र मंडळींना समजल्यानंतर त्यांनी पुन्हा टवाळकी केली. तरीही प्रवासाला सुरुवात केली. तर एका मित्राने कसारा घाटात लुटण्याची भीती देखील घातली. म्हणून जवळचे पैसे देखील घरी ठेवले. घरातून निघाल्यानंतर विक्रोळीनंतर भिवंडीच्या मित्राला भेटलो. तेथून निघाल्यावर १६३ मैलाचा दगडही दिसला. शिर्डीतून येणाऱ्या गाड्या दिसायच्या, कसारा घाटातले निसर्गसाैंदर्यं बघत चालत होतो. तर एका ठिकाणी पांढरे कपडे घातलेला एक संन्यासी काही लोकांबरोबर झाडाखाली बसल्यासारखा दिसला. थोडं अंतर पार करून मागे वळून पाहिले, तर तिथे कोणीच नव्हतं. असे अनेक छोटे-मोठे दिव्य अनुभव पहिल्या प्रवासात आले. सिन्नरचा घाट चढू शकेल की नाही, असं वाटतं होतं. कारण प्रचंड तहान लागलेली होती. आजूबाजूला कुठेच पाणी नव्हतं, घरं नव्हती, बाबांकडे मनातल्या मनात पाणी मागत मागत, एका वडाच्या झाडाखाली पडलो, इतक्यात पाण्यात काही तरी पडल्याचा आवाज झाला. त्या ठिकाणी विहिरीसारखा गोल झरा दिसला. त्या ठिकाणी पाणी प्यायलो. नंतर पुढची वाट धरली. सिन्नर ते वावी अगदी छाेट्या रस्त्याने प्रवास केला. सतत तीन वर्षे एकट्याने प्रवास केला. त्यानंतर मित्र भेटत गेले. नंतर पालखी सुरू केली.

‘शिर्डी माझे पंढरपूर’

वैष्णवी भोगले

‘शिर्डी माझे पंढरपूर’ ही भावना मनात ठेवून साई भक्त विवेक मुळे यांनी मुंबई ते शिर्डी साई बाबांच्या दर्शनासाठी पदयात्रा सुरू करण्याचा संकल्प केला. शेकडो वर्षांपासून पंढरपूरला वारकरी पायी वारी करतात, तशी पायी यात्रा आपणही करावी ही कल्पना विवेक मुळे यांना सुचली. नंतर मग नुसते पायी जाण्यापेक्षा पालखी घेऊन जावे असे वाटू लागले. त्यानंतर या पालखी सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. आता गुरुपौर्णिमा, दसरा, रामनवमीला पालख्यांची रिघ लागते. अन् अवघ्या शिर्डीला पंढरपूरचे रूप येते, यामध्ये तल्लीन झालेल्या भक्तांना शिर्डी हे पंढरपूरच आहे असे वाटू लागते.

मुंबई ते शिर्डी पालखी खांद्यावर घेऊन पदयात्रा करायची कशी, हा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. त्या वेळेस मनात अनेक प्रश्न होते. त्या काळात शिर्डीचा प्रवास करणे साेपे नव्हते. त्यामुळे पालखी मुंबईतून शिर्डीला घेऊन जायची तर त्याचे नियाेजन सुरू केले. या विषयी त्यांनी शिर्डीतील बाबासाहेब शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. तसेच शिर्डीला दरवर्षी जात असल्यामुळे त्यांची बऱ्याच जणांची ओळख झाली होती. त्यामध्ये विलास परळकर यांच्याशी मैत्री झाली होती. तेव्हा परळकर यांच्याशी बोलताना पालखीचा विषय निघाला. तेव्हा परळकर यांनी सांगितले की, पालखीची व्यवस्था मी करेन; परंतु अनेक महिने उलटून गेले तरी पालखीची व्यवस्था झाली नव्हती. त्यामुळे एक प्रकारचे टेन्शन होते. बाबासाहेब शिंदे यांच्या गाणगापूरचे पिढीजात पालख्या करणारे गृहस्थ ओळखीचे होते. त्यांना सांगून पालखीची जबाबदारी शिंदेंनी घेतली. मात्र सव्वा महिना झाला तरी पालखीची व्यवस्था झाली नव्हती. त्यामुळे सर्वांना एकत्रित घेऊन साई निकेतन, दादर येथे बैठक घेण्याचे ठरवले. त्याचवेळी बाबासाहेब शिंदे यांचे पत्र आले. गाणगापूर येथून मिळणारी पालखी काही कारणास्तव रद्द झाली आहे. त्यामुळे बैठकीत विलास परळकर पालखी देणार असे ठरले. त्यानंतर परशुराम शिंदे यांच्याकडे पालखीच्या सजावटीचे काम देण्यात आले. १९८१ मध्ये पहिल्या पालखीची तयारी दादर येथे साई निकेतनमध्ये करण्यात आली. ही राम नवमीसाठी मुंबईहून शिर्डीला जाणारी पहिली पालखी होती. अशा प्रकारे पालखी सोहळा सुरू केला तेव्हा ४० साईभक्त सोबत होते. ती संख्या सध्या ७ हजारांच्या पुढे आहे. त्यावेळेला शिर्डीतल्या नागरिकांनी केलेले अभूतपूर्व स्वागत अजूनही स्मरणात आहे.

साईबाबांना जाणून घ्या!

अल्पेश म्हात्रे

साईबाबांच्या भक्तीविषयी सांगताना साईभक्त विवेक मुळे सांगतात की, आज लाखो भक्त मंडळी शिर्डीला पायी येतात, यात सगळ्यांचीच भक्ती असते असे नाही, बहुतेक लोकांना काहीतरी अनुभूती आलेली असते म्हणून ते साईबाबांना मानणारे असतात. तुम्ही आधी बाबांना जाणून घ्या, मग मानायला लागा, तर नक्की बाबा तुम्हाला मार्गदर्शन देतील. बाबांना आवडेल असे तुम्ही वागलात, तर नक्कीच तुमच्या हाकेला धावतील, तुम्हाला बदल जाणवायला लागतील. तुम्हाला सुखाची अनुभूती येईल.

साईबाबांचे वेगवेगळे अनुभव उलगडताना साई चरित्र वाचल्याने जीवनात घडलेले बदल विवेक मुळे यांनी सांगितले. साई चरित्र वाचण्याचे कोणतेही नियम नाहीत. साई चरित्र आपण कधी कुठेही वाचू शकतो. बाबा कोण आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर साई चरित्र वाचायलाच हवे. साई चरित्र वाचून, आपण जर साईबाबांना जाणून घेतले, तर आपण नक्कीच त्यांना आणखी मानायला लागतो. बाबा कोण आहेत हे जाणण्यासाठी बाबांची शिकवण, उपदेश चरित्र वाचताना समजतात, अनेकांचे अनेक प्रश्न असतात, काहींचे असे प्रश्न असतात जे ते कोणाशी बोलू शकत नाहीत. त्यांची उत्तरे आपणास साई चरित्रातून मिळतात. वाचायला सुरुवात तरी करा, तसेच बाबांना नामस्मरण खूप आवडते, कलियुगात सर्व संतांनी सांगितले आहे की, नामस्मरण खूप महत्त्वाचे आहे. शिर्डीत दर्शन कसे करावे याचे महात्म्य देखील त्यांनी विशद केले.

शिर्डीत प्रमुख तीन स्थाने आहेत. एक समाधी मंदिर, दोन बाबांनी आपला जास्तीत जास्त काळ व्यतीत केला ते द्वारकामाई व चावडी, चावडीमध्ये महिलांसाठी व पुरुषांसाठी दोन वेगवेगळे भाग आहेत. प्रत्येक स्थानाचे महत्त्व माहीत असायलाच पाहिजे मात्र हे दोन वेगवेगळे भाग का आहेत, ते सांगताना ते म्हणाले की, साईबाबा चावडीवर झोपायला जायचे. झोपायला जाताना तिघेजण तिथे असायचे. त्यामुळे साईबाबा ज्या ठिकाणी झोपायचे ती जागा पुरुषांसाठीच आहे, तर दुसरी बाजू महिलांसाठी आहे. साई चरित्र वाचले असेल तर या तीन स्थानांबद्दल आपल्याला चांगली माहिती मिळू शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -