Monday, August 10, 2026

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर हादरले ! महावितरण कर्मचाऱ्याची जमावाच्या हल्ल्यात हत्या; अहिल्यानगरमध्ये तणाव, शहर बंद

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर हादरले ! महावितरण कर्मचाऱ्याची जमावाच्या हल्ल्यात हत्या; अहिल्यानगरमध्ये तणाव, शहर बंद

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर शहराजवळील मुकुंदनगर परिसरात कर्तव्य बजावत असलेल्या महावितरण कर्मचाऱ्यावर जमावाने केलेल्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या २२ वर्षीय धीरज कचरूसिंग परदेशी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर शहरात संतापाचे वातावरण असून, विविध संघटनांकडून शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. (Ahilyanagar Crime News)

नेमकं काय घडलं ?

धीरज परदेशी (Dhiraj Pardeshi) हा महापालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदार संस्थेत मदतनीस म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी मुकुंदनगर दर्गा दायरा परिसरात रस्त्यावरील दिव्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना १० ते १५ जणांच्या जमावाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी धीरज यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तब्बल तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर रविवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. धीरज यांच्यावर हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, याचा तपास भिंगार कॅम्प पोलीस (Bhingar Camp Police) करत आहेत. (Ahilyanagar Crime News)

सहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी तातडीने तपास सुरू केला. याप्रकरणी युनूस खानसाहेब शेख याला शनिवारीच अटक करण्यात आली होती. त्यानंतर मेहराज इब्राहिम सय्यद, मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद आणि सिराज इब्राहिम सय्यद या तिघांना तेलंगणातून ताब्यात घेण्यात आले. आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपावरून ख्वाजामिया उर्फ अकरम याकूब सय्यद आणि वसिम रहीम सय्यद यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण सहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. (Ahilyanagar Crime News)

आजपासून शहरात बेमुदत बंद

परदेशी यांच्या मृत्यूनंतर महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. कर्मचारी संघटनेने घटनेचा निषेध नोंदवला आहे. जोपर्यंत कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मुकुंदनगर भागात एकही महापालिका कर्मचारी काम करणार नाही, अशी भूमिका कर्मचारी संघटनेने घेतली आहे. तसेच सोमवारपासून (ता. १०) बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. संपूर्ण शहरातील नागरी सुविधा बंद ठेवण्यात येणार आहेत. या गैरसोयीबद्दल नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र सारसर, बाबासाहेब मुदगल, सचिव आनंदराव वायकर आदींनी केले आहे.

शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

धीरज यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच रुग्णालय परिसरात नागरिक आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली. विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन करत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. त्यानंतर कापड बाजार, नवी पेठ आणि टिळक रस्ता परिसरात दुकाने बंद ठेवण्यात आले. आंदोलनादरम्यान कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काही वेळ शाब्दिक चकमक झाल्याने परिसरातील तणाव आणखी वाढला. त्यामुळे शहरात खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेनंतर अहिल्यानगर शहरातील वातावरण तणावपूर्ण असून, पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >