मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. सध्या राज्यात विविध ठिकाणी लोककला महोत्सव सुरू असून, यापुढे त्यांचा विस्तार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अखिल भारतीय लोककलावंत आणि मराठी तमाशा परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा सन्मान रविंद्र नाट्य मंदिर येथे मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लोककलावंतांच्या वतीने मंत्री शेलार यांचाही सत्कार करण्यात आला. लोककला अभ्यासक प्रकाश खांडगे यांच्या उपस्थितीत आणि तमाशा परिषद अध्यक्ष संभाजीराजे जाधव यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ...
कार्यक्रमाला राज्यभरातील अनेक लोककलावंत उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील लोककला, तमाशा आणि या क्षेत्रातील कलाकारांच्या योगदानाबाबत मंत्री शेलार यांनी गौरवोद्गार काढले. लोककलेच्या माध्यमातून राज्याच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन होत असून, कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, लोककलावंतांच्या विविध मागण्यांचे निवेदन मंत्री शेलार यांना देण्यात आले. पठ्ठेबापूराव यांच्या नावाने मरणोत्तर पुरस्कार सुरू करून दिवंगत लोककलावंतांचा सन्मान करावा, विठाबाई नारायणगावकर स्मारकाचे काम लवकर पूर्ण करावे, अशा मागण्या करण्यात आल्या.
राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेत काही अपात्र व्यक्तींचा समावेश झाल्याचा आरोप करत योजनेची तपासणी करण्यासाठी समिती नेमावी, अशी मागणीही करण्यात आली. तसेच ढोलकी फडाचा तमाशा आणि संगीतबारी याबाबतच्या अभ्यास गटाच्या अहवालानुसार निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
बुलढाणा तसेच काही जिल्ह्यांमध्ये तमाशा कार्यक्रमांना पोलिसांकडून परवानगी देण्यात अडचणी येत असल्याचेही लोककलावंतांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत पोलिसांना आवश्यक सूचना देण्याची मागणी करण्यात आली.
या सर्व मागण्यांवर येत्या 15 दिवसांत बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल आणि योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मंत्री आशिष शेलार यांनी दिले. राज्यातील लोककला आणि लोककलावंतांना पुढे नेण्यासाठी शासनाकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.





