Monday, August 10, 2026

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी ताज हॉटेल्सचे (इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पुनीत चटवाल यांची मुंबईत भेट घेतली. सिंधुदुर्गातील शिरोडा येथे प्रस्तावित असलेल्या ताज समुहाच्या आलिशान हॉटेल प्रकल्पाच्या प्रगतीबाबत आणि जलद अंमलबजावणीबाबत या बैठकीत अत्यंत सकारात्मक आणि सविस्तर चर्चा झाली. (Nitesh Rane)

जागतिक स्तरावर नावाजलेल्या ताज समूहाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे देशासह विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी जिल्ह्यात अत्यंत दर्जेदार, अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाच्या आदरातिथ्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. शिरोडा येथील या प्रकल्पाचे सकारात्मक परिणाम जिल्ह्याच्या एकंदरीत अर्थकारणावर दिसणार आहेत. या हॉटेलमुळे स्थानिक भूमिपुत्रांना आणि तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. याशिवाय स्थानिक व्यवसाय, वाहतूक, खाद्यसंस्कृती आणि पर्यटनाशी संबंधित सेवा क्षेत्राचा मोठा विस्तार होणार आहे. यामुळे सिंधुदुर्गची ओळख देशाच्या आणि जगाच्या पर्यटन नकाशावर अधिक अधोरेखित होण्यास मोठी मदत होणार आहे, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. (Taj Hotels)

सिंधुदुर्ग आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे केंद्र बनणार

सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेला अथांग समुद्रकिनारा, ऐतिहासिक किल्ले, समृद्ध निसर्ग, सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन क्षमता यांना ताज समुहाच्या जागतिक दर्जाच्या सुविधांची जोड मिळणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सिंधुदुर्ग हे राज्याचेच नव्हे, तर जागतिक पर्यटनाचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी या भेटीदरम्यान व्यक्त केला. (Sindhudurg)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >