Friday, July 31, 2026

Farmers Loan : कर्जमुक्ती योजनेतून ९४ हजार शेतकरी अपात्र

Farmers Loan : कर्जमुक्ती योजनेतून ९४ हजार शेतकरी अपात्र

आयकरदाते असल्याने कारवाई; राज्य सरकारचे १ हजार ८८१ कोटी रुपये वाचले

मुंबई : राज्य सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत सहकार विभागाने केलेल्या डेटा पडताळणीत ९४ हजार ८३ शेतकरी आयकरदाते असल्याचे उघड झाले आहे. या आयकरदात्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेतून अपात्र ठरवण्यात आले असून, या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीतील १ हजार ८८१ कोटी ६६ लाख रुपयांची बचत झाली आहे.(Farmers Loan)

सहकार विभागाने या योजनेअंतर्गत आतापर्यंत ३१ लाख ६४ हजार २८ शेतकऱ्यांच्या माहितीची सखोल पडताळणी केली. योजना जाहीर करतानाच आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही, तसेच केंद्र सरकारकडून अशा करदात्यांची माहिती मागवली जाईल, असे शासनाने स्पष्ट केले होते. त्या निकषांच्या आधारे ही अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात लाभाची रक्कम हस्तांतरित करण्यासाठी शासनाने ७ हजार कोटी रुपयांच्या निधी वितरणास प्रशासकीय मान्यता दिली आहे.(Farmers Loan)

या योजनेसाठी राज्य सरकारने ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली असून, त्याद्वारे सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी ३२ लाख शेतकरी हे थकबाकीदार गटातील आहेत. तर, वेळेवर आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या २४ लाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरवण्यात आले आहे. तसेच २ लाख ९० हजार शेतकऱ्यांकडे २ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असून, त्यांना २ लाखांवरील अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.(Farmers Loan)

पाच दिवसांत रक्कम खात्यात जमा होणार

डेटा पडताळणीत ९४ हजारांहून अधिक शेतकरी आयकरदाते निष्पन्न झाल्याने तिजोरीवरील मोठा आर्थिक ताण टळला आहे. पहिल्या यादीतील शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच पुढील ५ दिवसांत लाभाची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाईल. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन सहकार विभागातर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >