Friday, July 31, 2026

Live Heart : भारतात पहिल्यांदाच ऐतिहासिक कामगिरी! वंदे भारत ट्रेनद्वारे सुरतहून अहमदाबादला यशस्वीरीत्या केली जिवंत हृदयाची वाहतूक

Live Heart : भारतात पहिल्यांदाच ऐतिहासिक कामगिरी! वंदे भारत ट्रेनद्वारे सुरतहून अहमदाबादला यशस्वीरीत्या केली जिवंत हृदयाची वाहतूक

अहमदाबाद: भारताच्या वैद्यकीय आणि रेल्वे इतिहासात एका सुवर्णपानाची भर पडली आहे. देशात प्रथमच रेल्वेच्या माध्यमातून जिवंत हृदयाची (Live Heart) अत्यंत सुरक्षित आणि यशस्वी वाहतूक करण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल–गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक २०९०१) द्वारे हे जिवंत हृदय सुरतहून अवघ्या २ तास २७ मिनिटांत अहमदाबाद येथे पोहोचवण्यात आले.

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत हृदयविकाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला वाचवण्यासाठी तातडीने हृदय प्रत्यारोपण करणे आवश्यक ठरते. मात्र, जिवंत हृदय कमीत कमी वेळेत रुग्णालयात पोहोचवणे हे मोठे आव्हान असते. यासाठी यापूर्वी एअर ॲम्ब्युलन्स किंवा रस्ते मार्गावर 'ग्रीन कॉरिडॉर'चा वापर केला जायचा. परंतु, आता भारतीय रेल्वेने नवीन पर्याय उपलब्ध करून देत इतिहास रचला आहे.

हे हृदय अहमदाबादमधील नामांकित यू. एन. मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरमधील रुग्णावर प्रत्यारोपित केले जाणार आहे. ही अत्यंत संवेदनशील आणि जीव वाचवणारी मोहीम यशस्वी करण्यासाठी भारतीय रेल्वे, गुजरात राज्य पोलीस, रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) आणि वैद्यकीय पथकाने अत्यंत उत्कृष्ट समन्वय साधला होता.

या यशस्वी मोहिमेमुळे वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी अवयव वाहतुकीसाठी रेल्वे हा एक वेगवान, सुरक्षित आणि अत्यंत प्रभावी पर्याय म्हणून समोर आला आहे. या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा