Tuesday, June 16, 2026

Nashik : आडगाव येथे अत्याधुनिक ट्रक टर्मिनस उभारणार

Nashik : आडगाव येथे अत्याधुनिक ट्रक टर्मिनस उभारणार

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा, वाढती मालवाहतूक आणि शहरातील वाहतूक व्यवस्थेवरील ताण लक्षात घेऊन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आडगाव येथे अत्याधुनिक ट्रक टर्मिनस उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत (Mumbai-Agra National Highway) प्रस्तावित हा प्रकल्प सार्वजनिक–खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकसित करण्यात येणार असून, तो मालवाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

२८ एकर क्षेत्रावर अत्याधुनिक प्रकल्प

सुमारे २८ एकर क्षेत्रावर हा प्रकल्प विकसित केला जाणार आहे. त्यापैकी सुमारे ६० टक्के क्षेत्र ट्रक टर्मिनससाठी तर ४० टक्के क्षेत्र वे-साईड अ‍ॅमेनिटीज (प्रवासी व वाहनचालक सुविधा) यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग, बस डेपो आणि प्रमुख वाहतूक मार्गांशी सुसंगत जोडणी असल्याने हे ठिकाण लॉजिस्टिक्ससाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या टर्मिनसमध्ये किमान ३०० ट्रक पार्किंग बेची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच माल साठवण, लोडिंग-अनलोडिंग सुविधा, वाहन दुरुस्ती कार्यशाळा, चालकांसाठी डॉर्मिटरी आणि लॉजिस्टिक्ससाठी आवश्यक पूरक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.

प्रवासी व चालकांसाठी स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, फूड कोर्ट, ढाबे, किरकोळ विक्री केंद्रे, प्राथमिक उपचार केंद्र, एटीएम, इंधन केंद्र, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, पर्यटक माहिती केंद्र, अल्पकालीन निवास व्यवस्था, सेल्फ लॉन्ड्री आणि ओपन जिम अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पर्यावरणीय बाबींनाही या प्रकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे. किमान १५ टक्के क्षेत्र हरित पट्टा म्हणून विकसित करण्यात येणार असून, अग्निसुरक्षा, पर्यावरण, आरोग्य व सुरक्षा मानकांचे पालन बंधनकारक राहणार आहे. पाणीपुरवठा, वीज, मलनिस्सारण आणि दूरसंचार यांसारख्या मूलभूत सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जातील.

याशिवाय वजन काटा, ट्रक सर्व्हिस सेंटर, शो-रूम, ट्रान्सपोर्ट कार्यालये आणि मोटेल/हॉटेल यांसारख्या अतिरिक्त सुविधांनाही प्रकल्पात वाव देण्यात आला आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ ट्रक पार्किंगपुरता मर्यादित न राहता लॉजिस्टिक्स हब म्हणून विकसित होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. आडगाव ट्रक टर्मिनस प्रकल्पामुळे शहरातील अव्यवस्थित ट्रक पार्किंगला पर्याय मिळणार असून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आडगाव ट्रक टर्मिनस हा केवळ पार्किंग प्रकल्प नसून नाशिकच्या भविष्यातील वाहतूक व लॉजिस्टिक्स व्यवस्थेचा महत्त्वाचा पाया आहे. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम होईल आणि औद्योगिक विकासालाही चालना मिळेल. असे नाशिक मनपा आयुक्त मनीषा खात्री यांनी म्हटले आहे.

प्रमुख सुविधा

डॉर्मिटरी व चालक विश्रांतीगृह

फूड कोर्ट व ढाबे

पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहे

प्राथमिक आरोग्य केंद्र

वाहन दुरुस्ती सुविधा

इंधन व ई-चार्जिंग स्टेशन

माल साठवण व लोडिंग-अनलोडिंग सुविधा

एटीएम व किरकोळ विक्री केंद्रे

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा