Tuesday, June 16, 2026

Nashik : बाप-लेकीची पहिली अन् शेवटची भेट; रजेवर आलेल्या जवानाचा भीषण अपघातात मृत्यू

Nashik : बाप-लेकीची पहिली अन् शेवटची भेट; रजेवर आलेल्या जवानाचा भीषण अपघातात मृत्यू

Nashik : नाशिक जिल्ह्यातील खंबाळे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या १३ दिवसांपूर्वी कन्यारत्न प्राप्त झाल्याचा आनंद साजरा करणाऱ्या भारतीय जवानाचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. प्रवीण भाऊसाहेब आव्हाड, वय २७, असे मृत जवानाचे नाव आहे. घडलेल्या वेदनादायी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त आहे.

'रजा' शेवटची ठरली

प्रवीण आव्हाड हे जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथे भारतीय सैन्यात देशसेवेचे कर्तव्य बजावत होते. मुलीच्या जन्मानंतर चिमुकलीला पाहण्यासाठी आणि कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण घालवण्यासाठी आव्हाड हे काही दिवसांच्या रजेवर त्यांच्या गावी म्हणजेच खंबाळे येथे आले होते. मात्र, नियतीला काही वेगळंच मंजूर होतं.

भीषण अपघातात मृत्यू

कामानिमित्त नांदूरशिंगोटे येथे गेलेले प्रवीण रविवारी रात्री मोटारसायकलने घरी परतत असताना नाशिक-पुणे महामार्गावरील दोडी पाटी परिसरात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, प्रवीण यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर खंबाळे गावात शोककळा पसरली. जवान प्रवीण आव्हाड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सैन्याच्या जवानांनी मानवंदना दिली, तर पत्नी पूजा, आई जिजाबाई आणि वडील भाऊसाहेब आव्हाड यांनी अश्रुपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप दिला. दोडी पाटीजवळील दुभाजक हा अपघातप्रवण ठरत असून, या ठिकाणी सातत्याने अपघात घडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे येथे सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे.

दोन वर्षांपूर्वी विवाह

आठ वर्षांपूर्वी भारतीय सैन्यात दाखल झालेले प्रवीण यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. संसारवेलीवर नुकतीच उमललेली कन्यारत्नाची कळी आणि घरातील आनंद क्षणात दुःखात बदलला. एका बाजूला मुलीच्या जन्माचा आनंद, तर दुसऱ्या बाजूला जवानाच्या निधनाने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >