Monday, June 8, 2026

Virat Kohli : विराटभोवती विणला विजयाचा धागा

Virat Kohli : विराटभोवती विणला विजयाचा धागा

आयपीएल 2026 साठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने संघरचनेत महत्त्वाचे बदल करत भविष्यातील यशाचा मजबूत पाया रचण्याचा प्रयत्न केला आहे. विराट कोहलीच्या अनुभवाभोवती युवा जोश, आक्रमक फलंदाजी आणि प्रभावी गोलंदाजी यांचा सुरेख मेळ घालण्यात आला आहे. लिलावात संघाने गरजेनुसार खेळाडूंची निवड करत फलंदाजी, गोलंदाजी आणि अष्टपैलू विभागात संतुलन साधण्यावर भर दिला. त्यामुळे संघाची खोली वाढली असून विविध परिस्थितींमध्ये सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता आरसीबीला प्राप्त झाली आहे. अनेक वर्षांपासून हुलकावणी देणाऱ्या जेतेपदाच्या स्वप्नाला यंदा वास्तवाचे रूप देण्याची संधी बंगळुरूच्या संघासमोर आहे. नव्या दमाचे खेळाडू, अनुभवी नेतृत्व आणि स्पष्ट रणनीती यांच्या जोरावर आरसीबीचा संघ आगामी हंगामात विजेतेपदाच्या शर्यतीतील प्रमुख दावेदार ठरण्याची चिन्हे आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला त्यांचे पहिले आयपीएल विजेतेपद मिळवण्यासाठी तब्बल १८ वर्षे वाट पाहावी लागली. दरवर्षी अनेक संघांची उदाहरणे समोर येतात, जिथे कागदावर सर्व काही योग्य असूनही त्यांना मैदानावर यश मिळवता येत नाही. आपल्या विजेतेपदाचे रक्षण करताना, चेन्नई सुपर किंग्सने एका नव्या युगाची सुरुवात केली होती. पाचवेळा विजेतेपद मिळवलेले चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ या शर्यतीत होते, पण त्यांना एका बलाढ्य आणि संघटित संघाविरुद्ध खेळावे लागले.

आरसीबीने या संपूर्ण हंगामात केवळ अप्रतिम कामगिरीच केली नाही, तर रविवारी अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध एकतर्फी विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. गुणतालिकेत सर्वात तळाशी असलेल्या संघाने अवघ्या काही आठवड्यांत विजेतेपद मिळवणे, हे संघाच्या विविध विभागांतील उत्कृष्ट कामगिरीचे प्रतीक आहे. पात्रता फेरीत आणि बाद फेरीत आरसीबीच्या फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा केला, तर दुसऱ्या बाजूला अंतिम सामन्यात गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे रोखून धरले. संघ व्यवस्थापनाने खेळाडूंच्या पाठीशी उभे राहून दिलेला विश्वास हेच या यशाचे मुख्य कारण होते. मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर आणि क्रिकेट संचालक मो. बबात यांच्या मार्गदर्शनाखाली हे शक्य झाले. विराट कोहली आणि रजत पाटीदार या खेळाडूंची जोडी मैदानात जमली, तर गोलंदाजीमध्ये अनुभवी खेळाडूंनी मोठी भूमिका बजावली.

कठीण काळातून नव्या पर्वाची सुरुवात

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक ट्रोल झालेला संघ कोणता, असा प्रश्न विचारला तर काही वर्षांपूर्वीपर्यंत सर्वांच्या तोंडून एकच नाव यायचं ते म्हणजे 'आरसीबी'. "ई साला कप नाम्दे" ही त्यांची घोषणा केवळ सोशल मीडियावरील मीम्सचा विषय बनली होती. पण, गेल्या दोन मोसमांनी (२०२५ आणि २०२६) संपूर्ण चित्रच पालटले आहे. आज आरसीबीचा संघ केवळ आयपीएल विजेता राहिलेला नाही, तर आरसीबीची कामगिरी इतर सर्व संघांसाठी हेवा वाटावा अशीच ठरली आहे. २०२५ मधील आरसीबीचे पहिले विजेतेपद हे एका भुकेलेल्या शिकारीसारखे होते, ज्यांना स्वतःला सिद्ध करायचे होते. पण २०२६ मधील विजेतेपद हे त्यांच्या प्रगल्भ आत्मविश्वासाचे प्रतीक होते. आरसीबीने आता अशी एक व्यवस्था निर्माण केली आहे, जिथे ट्रॉफी जिंकणे हे अंतिम ध्येय नसून, 'सतत सर्वोत्तम कामगिरी करणे' हे त्यांचे ध्येय बनले आहे. म्हणूनच, आज आरसीबी आयपीएलमधील सर्वात यशस्वी आणि आदर्श संघ बनला आहे.

सतत अपयशी ठरणारा हा संघ अचानक सलग दोनवेळा चॅम्पियन कसा बनला? आरसीबीने आपल्या संस्कृतीत असा काय बदल केला की त्यांनी थेट यशाचे 'ध्येय' गाठले? या प्रश्नाचे उत्तर आयपीएलच्या २०२४ च्या हंगामात दडले आहे. आरसीबीच्या या ऐतिहासिक यशाची पाळेमुळे २०२४ च्या हंगामात रुजली होती. त्या मोसमात पहिल्या ८ सामन्यांपैकी ७ सामने हरल्याने आरसीबीचा संघ गुणतालिकेत सर्वात तळाशी होता. तिथून कोणताही संघ स्पर्धेतून बाहेर पडला असता; मात्र मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हार न मानता नवी रणनीती आखली. त्यानंतर अक्षरश: चत्मकार घडला. संघाने सलग ६ सामने जिंकून प्ले-ऑफ गाठले. यामुळे आरसीबीच्या मानसिकतेतला सर्वात मोठा बदल ठरला. तिथून सुरू झालेली विजयी घोडदौड २०२६ पर्यंत कायम राहिली.

"तुम्ही लिलावात स्पर्धा जिंकू शकत नाही, पण लिलावात ती नक्कीच हरू शकता," असे आरसीबीचे क्रिकेट संचालक मो बोबाट यांचे मत आहे. त्यामुळे आरसीबीने २०२४ च्या लिलावात आपले जुने तंत्र बदलले. त्यांनी फक्त मोठ्या नावांमागे न धावता दबाव झेलू शकतील अशा अनुभवी खेळाडूंवर भर दिला. भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, क्रुणाल पंड्या, फिल साल्ट आणि देवदत्त पडिक्कल यांसारख्या खेळाडूंना संघात आणणे हा गेम-चेंजर निर्णय ठरला. यासोबतच मो बोबाट आणि मालोलन रंगराजन यांनी मिळून एक अशी मजबूत नवे खेळाडू शोधण्याची यंत्रणा तयार केली, ज्याने संघाची बेंच स्ट्रेंथ मजबूत झाली.

आरसीबीची संस्कृती किती बदलली आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे व्यंकटेश अय्यर. कोलकाता नाईट रायडर्सकडून दोन आयपीएल ट्रॉफी जिंकलेला आणि भारतासाठी खेळलेला हा खेळाडू संघात आला, पण सुरुवातीला त्याला अंतिम ११ मध्ये जागा मिळाली नाही. अशा वेळी खेळाडू नाराज होऊ शकतात, पण व्यंकटेशने संयम राखला. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली, तेव्हा त्याने मॅच-विनिंग कामगिरी केली. संघ आधी आणि स्वतः नंतर ही भावना आरसीबीच्या प्रत्येक खेळाडूमध्ये रुजली आहे. याच भावनेचा अभाव सध्या मुंबई इंडियन्समध्ये दिसत आहे. अंतर्गत कलहामुळे मुंबईचा संघ यंदाही अपेक्षित कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे संघ बांधणीवर दिलेला भर हेच आरसीबीच्या यशाचे सूत्र ठरले.

डेटा आणि मानवी कौशल्याचा अप्रतिम मेळ

आरसीबी हा डेटा आणि अॅनॅलिटिक्सचा सर्वाधिक वापर करणारा संघ मानला जातो. पण ते केवळ कॉम्प्युटरच्या आकड्यांवर विसंबून राहत नाहीत. त्यांचे डेटा अॅनलिस्ट फ्रेडी वाइल्ड हे आकडे आणि प्रशिक्षकांचे क्रिकेट ज्ञान या दोघांचा योग्य ताळमेळ घालतात. स्वतः कर्णधार रजत पाटीदारने सांगितले की, "मला स्पिनर्सविरुद्ध खेळताना काही अडचणी येत होत्या. तेव्हा फ्रेडीने मला गोलंदाजांचे हात पाहून बदल ओळखायला शिकवले." यामुळेच पाटीदार मधल्या ओव्हर्समध्ये जगातील सर्वोत्कृष्ट स्पिन-हिटर बनू शकला.

विराटमुळे मैदानावर ऊर्जा

आरसीबीमध्ये १९ वर्षे घालवल्यानंतरही विराट कोहलीची धावांची भूक आणि मैदानावरील ऊर्जा तशीच आहे. २०२६ चा हंगाम विराटच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम स्ट्राईक रेट असलेला हंगाम ठरला. आम्हाला खेळाडूंना मैदानावरील शिस्तीबद्दल सांगायला कोणत्याही कोचची गरज पडत नाही, कारण विराट कोहली स्वतः ती ऊर्जा आणि शिस्त दररोज मैदानात जगत असतो. एक नवीन कर्णधार म्हणून रजत पाटीदारने देखील मान्य केले की, जेव्हा जेव्हा त्याला मैदानात नेतृत्वाबाबत शंका यायची, तेव्हा तो थेट विराटकडे जायचा. विराटच्या या मार्गदर्शनामुळे रजत पाटीदारला एक परिपक्व कर्णधार बनण्यास मदत झाली.

धावांचा पाऊस आणि १५ ऐतिहासिक विक्रम!

आयपीएल २०२६ चा हंगाम गोलंदाजांसाठी एखाद्या दुःस्वप्नासारखा, तर फलंदाजांसाठी सुवर्णकाळ ठरला. यंदाच्या मोसमात चौकार-षटकारांचा असा काही पाऊस पडला की क्रिकेटच्या इतिहासातील जुने सर्व विक्रम मोडीत निघाले. ककुबुरा बॉल आणि सपाट खेळपट्ट्या यामुळे हा हंगाम पूर्णपणे फलंदाजांनी गाजवला. 'आरसीबी'चा सांघिक खेळ आणि 'वैभव सूर्यवंशी'चे वादळ हे या आयपीएल २०२६ चे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले.

१. भारतीय फलंदाजांचा सर्वाधिक 'स्ट्राईक रेट'

यंदाच्या आयपीएलचा एकूण फलंदाजी स्ट्राईक रेट १५६.३४ होता. जो आयपीएल इतिहासात सर्वाधिक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय फलंदाजांनी (१५७.१०) परदेशी फलंदाजांपेक्षा (१५४.७१) अधिक वेगाने धावा केल्या.

२. वैभव सूर्यवंशीचा धुमाकूळ

राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीने यंदाच्या हंगामात ७७६ धावा केल्या. ज्यात त्याने सर्वाधिक ७२ षटकार ठोकले आणि त्याचा स्ट्राईक रेट तब्बल २३७.३० होता. आयपीएलच्या एकाच हंगामात सर्वाधिक धावा, सर्वाधिक षटकार आणि सर्वोत्तम स्ट्राईक रेट राखणारा तो ख्रिस गेलनंतर (२०११) केवळ दुसराच फलंदाज ठरला. त्याला 'मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर' आणि ऑरेंज कॅपचा पुरस्कार मिळाला.

३. ६५ वेळा २०० हून अधिक धावांचा डोंगर

या एकाच हंगामात तब्बल ६५ वेळा २०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा बनल्या. २०२५ मधील ५२ वेळा २०० हून अधिक धावांचा विक्रम आरसीबी, एसआरएच, पीबीकेएस आणि आरआर या संघांनी प्रत्येकी ९-९ वेळा २०० हून धावा करून मोडीत काढला.

४. १४२६ षटकारांचा नवा विक्रम

२०२६ च्या मोसमात एकूण १,४२६ षटकार मारले गेले, जे मागच्या वर्षाच्या (१,२९४ षटकार) तुलनेत १०.२ टक्के जास्त आहेत. राजस्थान रॉयल्सने एकाच टी२० स्पर्धेत सर्वाधिक १८१ षटकार मारण्याचा नवा विक्रम केला.

५. फिरकीपटूची धुलाई

यंदाच्या आयपीएलमध्ये गोलंदाजांची प्रचंड धुलाई झाली. टॉप १० विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये राशिद खान (२१ विकेट्स, चौथे स्थान) हा एकमेव फिरकीपटू होता. २०१६ नंतर पहिल्यांदाच टॉप १० मध्ये केवळ एकच स्पिनर पाहायला मिळाला.

६. पंजाब किंग्सचा 'अजब' प्रवास

पंजाब किंग्सने हंगामाची सुरुवात सलग ७ सामन्यांत अपराजित (६ विजय, १ अनिर्णित) राहून दणक्यात केली होती. कोणत्याही संघाची ही सर्वोत्तम सुरुवात होती; मात्र त्यानंतर त्यांनी सलग ६ सामने गमावले आणि ते प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले.

७. चॅम्पियन आरसीबीची 'सांघिक' कामगिरी

विजेत्या आरसीबी संघाने खेळवलेल्या १६ खेळाडूंपैकी तब्बल १४ खेळाडूंनी २०० हून अधिक धावा, ७ हून अधिक विकेट्स किंवा १० हून अधिक कॅचेस घेत अव्वल कामगिरी केली. जगातील कोणत्याही टी२० संघात एकाच मोसमात एवढ्या खेळाडूंनी हा टप्पा गाठलेला नाही. तसेच आरसीबीच्या ८ वेगवेगळ्या खेळाडूंना 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार मिळाला.

८. २२०+ धावांचे टार्गेट ९ वेळा चेझ!

या मोसमात २२० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य तब्बल ९ वेळा यशस्वीरीत्या चेझ करण्यात आले. २०२५ पर्यंत संपूर्ण आयपीएलच्या इतिहासात केवळ ५ वेळा असे घडले होते. तसेच २००+ चे टार्गेट १७ वेळा चेझ झाले, ज्यामध्ये टी२० इतिहासातील सर्वात मोठ्या रन-चेझचा समावेश आहे.

९. पॉवरप्लेमध्ये आरसीबी आणि गुजरातचा थरार

आरसीबी आणि गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी सामन्याच्या पहिल्या ६ ओव्हर्समध्ये प्रत्येकी ३५ विकेट्स घेतल्या, जो एका मोसमातील विक्रम आहे. गुजरातच्या कागिसो रबाडाने पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक २० विकेट्स घेतल्या.

१०. ऑरेंज कॅपसाठी चुरस

यंदाच्या हंगामात ऑरेंज कॅप नक्की कोणाकडे जाणार यावरून प्रचंड चुरस होती. एका डावानंतर दुसऱ्या डावात अशी तब्बल ३१ वेळा ऑरेंज कॅपने आपली जागा बदलली, अखेर ती वैभव सूर्यवंशीकडे स्थिरावली.

११. टॉस जिंकून फलंदाजी घेणे ठरले 'शाप'

यंदाच्या हंगामात टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या संघांची अवस्था कमालीची दयनीय होती. टॉस जिंकून बॅटिंग निवडणाऱ्या संघांच्या पदरी १२ सामन्यांत अवघे २ विजय आणि तब्बल १० पराभव आले. या संपूर्ण मोसमात केवळ दोनच वेळा असे घडले, जेव्हा संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आणि सामना जिंकला. यात अहमदाबादमध्ये गुजरातविरुद्ध राजस्थान रॉयल्सने, तर हैदराबादमध्ये आरसीबीविरुद्ध सनरायझर्स हैदराबादने बाजी मारली.

१२. जॅकोब डफी आरसीबीसाठी 'लकी चार्म'

आरसीबीने न्यूझीलंडच्या जॅकोब डफीला खेळवलेले सर्व ६ सामने जिंकले. दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्सचा मोहसिन खान त्याने खेळलेले सर्व ७ सामने हरले. मजेशीर बाब म्हणजे यात त्याने एका सामन्यात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.

१३. अवघ्या ३२ चेंडूत ५० धावा

२०२६ मध्ये संघ सरासरी ३१.९७ चेंडूंमध्ये (साधारण ५ व्या ओव्हरमध्ये) ५० धावांचा टप्पा गाठत होते. एकूण १४६ डावांपैकी ७४ डावांमध्ये ५ व्या ओव्हरच्या आत संघाने पन्नाशी पार केली होती.

१४. ३७ शतकी भागीदाऱ्या

या हंगामात एकूण ३७ शतकी भागीदाऱ्या झाल्या, ज्या मागच्या कोणत्याही हंगामापेक्षा १० ने जास्त आहेत. विशेष म्हणजे, या सर्व पार्टनरशिप्स ९ पेक्षा जास्त रनरटने आणि ३५ पार्टनरशिप्स १० पेक्षा जास्त रनरटने झाल्या. ...................................................................

चौकार - षटकारांचा बादशाह

खेळाडू आणि संघ एकूण चौकार एकूण षटकार

वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स) १३५ ७२

शुभमन गिल (गुजरात टायटन्स) १०७ ३३

साई सुदर्शन (गुजरात टायटन्स) १०५ ३०

विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू) ९८ २५

अभिषेक शर्मा (सनरायझर्स हैदराबाद) ९३ ४३

ईशान किशन (सनरायझर्स हैदराबाद) ९२ ३२ .............................................

धावगती आणि इकॉनॉमी ग्राफ

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू

१ ते ६ षटके: धावगती १०.४ | इकॉनॉमी ९.०

७ ते १४ षटके: धावगती १०.० | इकॉनॉमी ९.३

१५ ते २० षटके: धावगती ११.६ | इकॉनॉमी १०.२

गुजरात टायटन्स

१ ते ६ षटके: धावगती ९.६ | इकॉनॉमी ९.३

७ ते १४ षटके: धावगती ९.२ | इकॉनॉमी ९.०

१५ ते २० षटके: धावगती १०.० | इकॉनॉमी ११.३

राजस्थान रॉयल्स

१ ते ६ षटके: धावगती १०.४ | इकॉनॉमी ९.६

७ ते १४ षटके: धावगती ९.६ | इकॉनॉमी १०.३

१५ ते २० षटके: धावगती ११.७ | इकॉनॉमी १०.७

सनरायझर्स हैदराबाद

१ ते ६ षटके: धावगती ११.१ | इकॉनॉमी ९.६

७ ते १४ षटके: धावगती ११.१ | इकॉनॉमी १०.१

१५ ते २० षटके: धावगती १०.७ | इकॉनॉमी ९.६

Comments
Add Comment