Saturday, August 8, 2026

अधांतरी हे झुले नभांगण...

अधांतरी हे झुले नभांगण...

नॉस्टॅल्जिया - श्रीनिवास बेलसरे

एखाद्या मराठी कवीच्या फक्त एका गाण्याच्या गौरवार्थ दरवर्षी एखादा पुरस्कार देण्यात येतो हे कुणाला खरे वाटेल का? अर्थात ठाण्याबाहेरच्या कुणाला बरं का? कारण असा ‘गंगा जमुना’ नावाचा अद्वितीय पुरस्कार ठाणे महापालिका आणि ‘जनकवी पी. सावळाराम कला समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिला जातो हे ठाणेकरांना माहीत आहे. कविवर्य निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ पी. सावळाराम यांनी लिहिलेल्या वसंत प्रभूंनी संगीत दिलेल्या लतादीदींच्या आवाजातल्या भावगीताच्या गौरवार्थ हा पुरस्कार दिला जातो. अनेक पिढ्यांच्या मनात अजरामर झालेल्या त्या गाण्याचे शब्द होते, ‘गंगा जमुना डोळ्यात उभ्या का? जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा.’ या गाण्यात त्यांनी चितारलेले भारतीय कुटुंबसंस्थेच्या प्रेममय नात्यांचे दर्शन अतिशय मनोहारी आहे. कविवर्यांनी हे गाणे, पुणे स्टेशनवर आपल्या नवविवाहित मुलीला निरोप देणाऱ्या आईच्या तोंडचे ‘दिल्याघरी तू सुखी रहा’ हे वाक्य ऐकून लिहिले होते असे त्यांनीच सांगितले आहे. लहानपणी आपल्याला अतिशय आवडलेले अमूक गाणे कवी पी. सावळाराम यांनी लिहिले आहे हे आपल्याला माहीतही नसते. मात्र त्यांच्या गाण्यांनी जसे अनेक पिढ्यांना उच्च दर्जाचे मनोरंजन दिले तसेच कुटुंबसंस्थेच्या लोभस धाग्यांचे वर्णन करून चांगले संस्कारही केले हे त्यांची निवडक गाणी पाहिली की सहज पटते. ‘जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते’, ‘यश हे अमृत झाले, (पुत्र व्हावा ऐसा), ‘कोकीळ कुहूकुहू बोले, तू माझा तुझी मी झाले’, ‘माझिया नयनांच्या कोंदणी, उमलते शुक्राची चांदणी, ‘लेक लाडकी या घरची’ (कन्यादान), ‘गोडगोजिरी लाजलाजरी ताई तू होणार नवरी (धर्मकन्या), ‘आली हासत पहिली रात’ (शिकलेली बायको), ‘गंध फुलांचा गेला सांगून,’ (भालू), ‘कुणी न मालक, कुणी न सेवक, जनता तेथे राज्य करी’ (मायमाऊली), ‘तुजसाठी शंकरा भिल्लीण मी झाले, (चिमुकला पाहुणा), ‘देव जरी मज कधी भेटला’ (मोलकरीण), ‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला’, ‘घट डोईवर, घट कमरेवर’, ‘जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला’, ‘तूच कर्ता आणि करविता, मी शरण तुला भगवंता’, ‘मानसीचा चित्रकार तो’, ‘मुली तू आलीस आपुल्या घरी’, ‘रघुपती राघव गजरी गजरी, तोडीत बोरे शबरी’, ‘राधा कृष्णावरी भाळली’, ‘रिमझिम पाऊस पडे सारखा यमुनेलाही पूर चढे,’ ‘विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला’, ‘असावे घर ते आपुले छान’, ‘ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता’ ही गाणी महाराष्ट्राच्या मनात कोरलेली आहेत. पी. सावळाराम यांना ‘जनकवी’ हा किताब ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ विजेते कुसुमाग्रज यांनी दिला होता. त्यावरून त्याच नावाचा एक पुरस्कार दरवर्षी दिला जातो. यापूर्वी तो इसाक मुजावर, श्रीधर फडके, यशवंत देव, लीना भागवत, मधुराणी गोखले-प्रभुलकर, शिवाजी साटम, उदय सबनीस, सुरेश वाडकर यांना दिला गेला आहे. पी. सावळाराम यांच्या गीतलेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कुटुंबातील प्रेमाची नातीगोती चित्रित करणारी, धार्मिक भावना जपणारी, भक्तिरसात न्हालेली गाणी लिहिली. ती त्यावेळच्या कुटुंबवत्सल, पापभिरू समाजाला खूप भावली. कविवर्यांनी एक गाणे १९६७ साली आलेल्या श्रीकांत सुतार यांच्या ‘सुखी संसार’ या चित्रपटासाठी लिहिले होते. यशवंत देवांच्या संगीत दिग्दर्शनातले सुधीर फडके यांनी ते गायले. चित्रपटात होते सुलोचना लाटकर, सीमा देव आणि रमेश देव. युगानुयुगे सुरू असलेले ह्या जगदव्याळ विश्वाचे सूत्रबद्ध व्यवहार कसे अव्याहतपणे सुरू आहेत ते पाहिले की सामान्य माणसाला नेहमीच आश्चर्य वाटत आले आहे. काहींनी त्याचा विचार वैज्ञानिक पद्धतीने तर काहींनी प्रामाणिक श्रद्धा ठेवून केला. पी. सावळाराम यांनी साध्यासरळ सुसंस्कारी, सश्रद्ध भारतीय माणसाच्या दृष्टीतून याचे वर्णन आपल्या गीतात केले होते. शब्द होते - “सारी भगवंताची करणी अधांतरी हे झुले नभांगण, शेषफणावर धरणी.” संताच्या श्रद्धेप्रमाणे कवी म्हणतात, जो तो त्याच्या पूर्वसुकृताप्रमाणे जीवनाचा उपभोग तरी घेत असतो किंवा आपले भोग भोगत असतो! मात्र परमेश्वराला त्याची सर्वच लेकरे प्रिय असतात. तो श्रीमंतांना अभिमानास्पद असे महाल बांधून देतो तरी गरिबाच्या झोपडीतही वास करतो. जे पापात बुडाले आहे त्यांच्या उद्धारासाठी त्यांच्याबरोबर अनवाणीही चालतो. ‘लक्ष्मीसाठी घर गर्वाचे उंच बांधुनि देतो, गरिबासाठी गरीब होऊन झोपडीतही रमतो, पतिता संगे पतीतपावन चालतसे अनवाणी.’ वरून दिसणारे सत्य आणि प्रत्यक्षातले वास्तव यातील गंमतीशीर भेद सांगताना कवी म्हणतात, आपण समुद्राला सर्वात मोठा जलनिधी म्हणतो. पण माणसाची तहान भागवण्यासाठी त्याचा काहीही उपयोग होत नाही. माणसाची तहान भागवायला, त्याला जिवंत ठेवायला, आकाशातून पडणारे पाणीच लागते. जीवसृष्टीला आवश्यक असे अन्न आपण कवडीमोल समजतो त्या मातीतूनच वर येते. त्याला आपण ‘अन्नब्रम्ह’ म्हणतो. केवळ माणसासाठीच नव्हे तर अवघ्या जीवसृष्टीसाठी इतके योजनाबद्ध जग निर्माण करणाऱ्या परमेश्वराचे आपण ऋण मानले पाहिजेत. त्याच्याशी कृतज्ञ राहिले पाहिजे. कवी म्हणतात, ‘प्रभूच्या चरणी भक्ती अर्पण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.’ ‘समुद्रात जरी अथांग पाणी, तहान शमवी श्रावणधार, अन्न ब्रम्ह ते अखंड घेते, काळ्या मातीतून अवतार, जगण्यासाठी तरी मानवा, लाग प्रभूच्या चरणी.’ श्रीमद भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाचे एक वचन आहे, ते म्हणतात, ‘मी सर्व सृष्टीत, प्राणीमात्रात समावलेलो आहे.’ (गीता अध्याय ६/२९,३०, १०/२०, १५/१५, १८/६१) संतानी अशा श्लोकांचा अर्थ लावताना त्याला मोठे रंजक रूप दिलेले आहे. तसेच कवी म्हणतात, ‘जिथे जिथे पायातला घुंगुरवाळा वाजतो आहे, जिथे एखादे बालक रांगते आहे, तिथे देव आहेच, जो स्वत: जगाचा मायबाप तो आईचे प्रेमळ वात्सल्य अनुभवण्यासाठी कौसल्या, देवकी किंवा तशाच कुणा स्त्रीच्या पोटी जन्म घेतो. मानवी देह धारण केल्यावर या जगाचे सर्व नियमही पाळतो. आपल्या मातेला ईश्वराचे प्रतिरूप मानून तिला वंदनही करतो. ‘जिथे वाजतो घुंगुरवाळा, बालक होऊन तिथे रांगतो, मायबाप तो सर्व जगाचा आईसाठी जगात येतो, हात जोडुनी देव बोलतो शरण तुला गे जननी. सारी भगवंताची करणी...’ अनेकदा गूढ तत्त्वज्ञानापेक्षा अशी साधीसरळ, भावुक गाणी मनाला केवढी शांती आणि आजच्या जगातले हरवलेले समाधान परत मिळवून देतात!

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा