Saturday, August 8, 2026

श्वेत भूपतीची कथा

श्वेत भूपतीची कथा

महाभारतातील मोतीकण - भालचंद्र ठोंबरे

स्कंध पुराणानुसार सत्य युगामध्ये श्वेत भूपती नावाचा राजा राज्य करीत होता. तो अत्यंत धार्मिक, न्यायप्रिय, सत्यप्रिय व महान शिवभक्त होता. त्याच्या काळात प्रजा धर्मपरायण व सुखी होती. त्याच्या राज्यात दारिद्र्य, रोग व अनाचार नव्हता. तो प्रजावत्सल होता, तर प्रजेचे सुद्धा राजावर अत्यंत प्रेम होते. राजा शिवभक्त होता. तो दररोज शिवपूजन केल्याशिवाय अन्नग्रहण करीत नसे. त्याच्या राज्यात महाशिवरात्रीचा उत्सव धूमधडाक्यात साजरा होत असे. एके दिवशी राजा शिवालयात महादेवाच्या पूजेसाठी गेला व पूजा झाल्यावर ओम नमः शिवाय! चा जप करू लागला. त्याचे आयुष्मान संपले होते, म्हणून चित्रगुप्ताच्या आज्ञेने यमदूत त्याला नेण्यासाठी आले; परंतु ओम नमः शिवाय! चा नाम उच्चार ऐकून ते थबकले. दूतांना वेळ झाल्याचे पाहून प्रत्यक्ष यमराज तेथे आले. शिवनामाचा उच्चार ऐकून तेही घाबरून गेले. काय करावे हे काहीही न कळल्याने यमराज स्तब्ध उभे राहिले.

काही वेळाने प्रत्यक्ष काळ तेथे आला. यमदूत व यमदेवाला केवळ स्तब्ध उभे पाहून त्याने यमराजाला श्वेतराजाचे प्राण का हरण केले नाही? त्याचे आयुष्य संपून बराच वेळ झाला असल्याचे सांगितले. तेव्हा यमराजाने ‘श्वेत राजा शिवाची आराधना करीत असताना त्याचे प्राण हरण केल्यास महादेव कोपिष्ट होतील व त्यांचा क्रोध अतिशय भयंकर आहे याची सर्वांनाच कल्पना आहे,’ असे सांगितले. तेव्हा क्रोधित होऊन काळ श्वेत राजावर चालून गेला. ते पाहून आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी प्रत्यक्ष भगवान शंकर तेथे आले. त्यांनी तिसरा नेत्र उघडून काळाला भस्म केले.

तपाराधनेतून बाहेर येताच श्वेत राजाने समोर महादेवाला पाहताच त्यांना नमन केले. तोच त्याची नजर समोर असलेल्या भस्मावर पडली. त्याने महादेवाला विचारले, “देवा तुम्ही कोणाला जाळले का? त्याने कोणता अपराध केला होता?” तेव्हा भगवान शंकर म्हणाले, “तू माझे नामस्मरण करीत असताना काळ तेथे आला व त्याने तुझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी त्याला तिसरा डोळा उघडून भस्म केले”. तेव्हा श्वेतराजा म्हणाला, “भगवान, काळही तुमच्या आज्ञेनेच जगत पालन करतो. म्हणून तर जन्म-मृत्यूचे चक्र बरोबर सुरू आहे; परंतु आता तुम्ही काळालाच भस्म केल्याने कोणत्याही मानवाला कधीही मृत्यू येणार नाही व मृत्यूची भीतीच न राहिल्याने लोक निर्धास्त होतील. जगात असमतोल वाढेल. मृत्यूच्या भीतीने लोक ईश्वर आराधना तरी करतात. पण मृत्यूचीच भीती न राहिल्याने लोक देवधर्म करणार नाहीत. सर्वत्र हाहाकार माजेल. तेव्हा हे सर्व लक्षात घेऊन काळाला परत जिवंत करण्याची विनंती श्वेत राजाने महादेवाला केली. श्वेतराजाच्या विनंतीवरून महादेवाने काळाला जिवंत केले. काळाने भगवंताला नमन करून त्यांची स्तुती केली व स्वलोकी गमन केले. यमराजाने आपल्या दूतांना, “आपल्या जीवनामध्ये शिवाचा जप करणारे, मस्तकावर जटा व कपाळावर त्रिपुंड लावणारे, महाशिवरात्रीचे व्रत करणारे, शिवलीलामृताच्या ११ व्या अध्यायाचे पठण व स्मरण करणारे, शिवाची मनोभावे पूजा करणारे, अशा सर्व भक्तांपासून नेहमी दूर राहा, अन्यथा तुमचीही गत काळाप्रमाणे होईल. अशा प्रकारच्या सूचना दिल्या. महादेवाच्या कृपेने श्वेत राजा शंकराच्या चरणकमलाशी लीन झाला, असा उल्लेख स्कंद पुराणात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा