स्मृतीगंध - लता गुठे
मला समजायला, उमजायला लागल्यापासून विविध वाटांचे विशेष आकर्षण निर्माण झाले. लहानपणीपासून शेतातून जाणारी पायवाट, डोंगरावर चढणारी पाऊलवाट तसेच नदीच्या किनाऱ्यावरून जाणारी नदीत गुप्त होणारी वाट. या वाटांवर माझ्या लहान पावलांचे ठसे उमटले त्या वाटा कायम स्मरणात राहिल्या. गावाकडची मातीची पाणंदीतून जाणारी पायवाट आजही आठवली, की मन नकळत बालपणात हरवून जाते. त्या पायवाटेवरून जाता-येता बालपण संपले. फांदीच्या दोन्ही बाजूने गर्द झाडी, त्यावर पसरलेल्या हिरव्यागार वेली. चिंचा, बोरीची झाडे. दगड मातीची ती पाऊलवाट पावसाळ्यात मात्र घसरडी व्हायची आणि त्या वाटेवरून जाताना एकदा तरी आपटी खाल्ल्याशिवाय पुढचा प्रवास व्हायचा नाही. त्या फांदीतून सरसर आवाज करत झाडीतून झिम्माडत येणारा पाऊस अंगावर घेताना मन पाऊस होऊन नाचू लागे. पावसाचे ते रूप कायमच मनात राहिले. पाणंदीच्या पाऊलवाटे सोबत. शाळेत जाणारी जराशी रुंद वाट म्हणजे गाडी रस्ता... या वाटेवर प्रचंड खाचखळगे असायचे. पावसाळ्यात त्या खड्ड्यांमध्ये पाणी साठायचे. एकमेकांच्या अंगावर पाणी शिंपडत त्या वाटेने जाताना पावसाळ्यात चिखलात उमटलेले पावलांचे ठसे, उन्हाळ्यात धुळीने भरलेले पाय आणि वाटेत भेटणारी झाडे, पक्षी, ओढे – हे सारे आजही स्मरणात जिवंत आहे. त्या वाटा साध्या होत्या, पण त्यांच्यात आपलेपणाचा गंध होता.
आयुष्याच्या प्रवासात आपण अनेक वाटांवरून किंवा रस्त्यांवरून गेलेलो, आलेलो असतो. काही रस्त्यांवरून जाताना त्याच्या बाजूचे अनुपम निसर्गसौंदर्य आपण डोळ्यांनी टिपतो. ती हिरवाई बघताना सुखाची अनुभूती होते. आपण सर्व रोजच्या जीवनातील व्याप-ताप विसरून जातो आणि त्या निसर्गसौंदर्याशी एकरूप होतो. तो रस्ता संपूच नये असे वाटते. अशा रस्त्याने जाताना आवडलेले ठिकाण थांबून पाहावे, त्याचे निरीक्षण करून आनंद घेता आला पाहिजे; परंतु आपण नेहमीच घाई गडबडीत असतो आणि आपल्याला हव्या त्या ठिकाणी घेऊन जायला तो रस्ता आपल्यासारखाच उतावीळ असतो. त्याच्याबरोबर आपण धावत सुटतो.
खरं तर रस्ता म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा मार्ग नव्हे; तो आपल्या आयुष्याच्या प्रवासाचा साक्षीदार असतो. प्रत्येक रस्त्याला इतिहास तसेच भूगोल असतो. रस्त्याची एक कथा असते, त्यानुसार त्याला नावे दिलेली असतात. ती त्यांची ओळख असते. त्या त्या मातीनुसार त्याला रंग-रूप आलेले असते. प्रत्येक वाटेचा एक स्वभाव असतो. वाकड्यातिकड्या वळणावरून गुंडाळलेल्या वाटा मला आवडतात. कारण प्रत्येक वळण एखादा नवा अनुभव देऊन जाते. काही रस्ते गजबजलेले असतात, काही एकाकी; तर काही निर्जन असतात. काही धुळीने माखलेले, तर काही डांबरी चकाचक उजळलेले. काही निरुंद तर काही ऐसपैस पसरलेले असतात. प्रत्येक रस्ता माणसाला पुढे चालत राहण्याची प्रेरणा देत असतो.
लहान-मोठ्या शहरातील रस्ते रात्रंदिवस धावत असतात शहरातील माणसासारखेच. निवांतपणा असा नसतोच त्यांना. आजूबाजूच्या झाडांशी गप्पा मारायलाही वेळ नसतो त्यांना. उसंत नसलेले रस्ते त्या रस्त्यावरून दिवस-रात्र धावणारी वाहने, घाईत चालणारी माणसे, सिग्नलवर थांबलेली गर्दी आणि सतत ऐकू येणारे गाड्यांचे हॉर्न, वाहनांची घरघर, प्रदूषण यामुळे त्यांच्या आजूबाजूची झाडेही त्रस्त झाल्यासारखी दिसतात. त्यामुळे अशा रस्त्याचे सौंदर्य कोणी न्याहळत नाही. ट्राफिकमुळे त्रस्त झालेल्या प्रत्येकाला कुठेतरी वेळेत पोहोचायचे असते; पण अनेकदा या धावपळीत माणूस स्वतःलाच मागे सोडून पुढे निघून जातो. त्यामुळे हरवलेला आनंद शोधण्यासाठी कधी ट्रेकिंगला, तर कधी अनवट वाटांनी जंगलात भटकायला जातो.
डोंगरातून जाणाऱ्या निमुळत्या नागमोडी वाटा मात्र वेगळाच अनुभव देतात. मोठमोठाली जुनी झाडे दाटीवाटीने उभी असलेली त्यांना बिलगून वर गेलेल्या हिरव्यागार शुभ्र पांढऱ्या, निळ्या, पिवळ्या फुलांचे घोश, लगडलेल्या वेली वाटसरूंचे लक्ष आकर्षित करतात. त्या आपल्याला आधाराचे महत्त्व सांगतात. डोंगर चढत उंचावर गेलं की, तिथून खालचे सौंदर्य अप्रतिम दिसते. वरती निळेशार आकाश, भराऱ्या घेणारे पक्षी आणि खालती हिरवा गालिचा अंथरलेली धरती. प्रत्येक वळणानंतर नवे दृश्य दिसते. कधी धुक्याची शाल, कधी हिरवाईचा नजराणा, कधी खोल दरी, तर कधी आकाशाला स्पर्श करणारे शिखर. या वाटा सांगतात की माणसाचे आयुष्य हे सरळ रेषेसारखे नसते, तर ते सुख-दुःखाच्या वळणवाटांनी व्यापलेले असते म्हणूनच आयुष्य सुंदर असते.
जंगलातील पाऊलवाटा निसर्गाशी संवाद साधायला उसंत देतात. तिथे अनुभवायला येणारी पक्ष्यांची किलबिल, पानांची सळसळ, वाऱ्याची थंडगार झुळूक यामुळे मन शांत होत जाते. त्या वाटांवर चालताना माणूस सुखाचा अनुभव करतो. तसेच स्वतःच्या आतल्या आवाजालाही ऐकू लागतो. म्हणूनच पूर्वी ऋषी मुनी जंगलात जाऊन तपश्चर्या करायचे. कधी संध्याकाळच्या वेळेला नदी किनाऱ्याच्या वाटेने गेला आहात का? नसाल गेला तर निवांत वेळ काढून नक्की जा. सूर्य मावळण्याची वेळ, नदीवर पसरलेलं उन्हाचं केशर आणि नदीकिनाऱ्याची वाट मनाला विलक्षण प्रसन्न करते. वाहणाऱ्या पाण्याबरोबर विचारही वाहू लागतात. नदीचा तो खळखळ आवाज सारा परिसर मोहून टाकतो. नदी शिकवते थांबू नकोस. वाटेत दगड भेटतील, वळणे येतील, अडथळे उभे राहतील, ऊन, वारा, पाऊस या सर्वांना सामावून घेत जीवनाचा आनंद शोधत चालत राहा.
याबरोबरच जीवनाच्या प्रवासात अनेक वाटा भेटतात. संस्काराची वाट घरातून सुरू होते, शाळेपासून सुरू झालेली शिक्षणाची वाट साद्यापर्यंत पोहोचविते, कर्तव्याची वाट चांगल्या वाईटाचा परिचय करून देते. संघर्षाची वाट यशाचा आनंद देते आणि अध्यात्माची वाट संकटातून मार्ग काढायला मदत करते. प्रत्येक वाट आपल्याला वेगळे घडवते. काही वाटा फुलांनी सजलेल्या असतात, काही काट्यांनी भरलेल्या असतात. या वाटाही पायांना बळ देऊन जातात. ध्येयाच्या वाटेवर चालताना कधी दोन रस्ते समोर येतात तेव्हा कोणता मार्ग निवडावा हा प्रश्न पडतो. निवडलेला रस्ता योग्य आहे की अयोग्य हे ध्येय साध्य केल्यानंतरच समजते. योग्य मार्ग तोच निवडतो ज्याला माहिती असते आपल्याला कुठे पोहोचायचे आहे. ज्यांच्याकडे सारासार विचार करण्याची शक्ती व सकारात्मक विचार आणि धैर्य असते तोच आयुष्याचा खरा प्रवासी ठरतो.
मी आधी म्हटलं त्याप्रमाणे रस्त्यालाही इतिहास असतो. आपले थोर संत, महात्मे आणि समाजसुधारकांनीही पुढील पिढीसाठी त्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या वाटा दाखवल्या. संत ज्ञानेश्वरांनी भक्तीची वाट दाखवली, तर संत तुकारामांनी नामस्मरणाची, महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेची, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण आणि समतेची वाट दाखवली. या वाटा आजही समाजाला दिशा देत आहेत. या वाटेवरून जाणाऱ्याचे कल्याण होते. आयुष्यभर आपण कोणत्या ना कोणत्या वाटेवरून चालत असतो. रस्ते कधीच संपत नाहीत, संपतो तो फक्त एक टप्पा. पुढे पुन्हा एक नवा रस्ता उभा असतो, नवी वाट खुणावत असते. म्हणूनच जीवन म्हणजे चालत राहण्याची अखंड प्रक्रिया आहे. पाय थकतील, पण वाटा थांबत नाही. अशा या आपल्या जीवनाशी अतूट नाते सांगणाऱ्या वाटा मनाला विलक्षण मोहून टाकतात.






