नवी दिल्ली : भारताची ऑलिम्पियन कुस्तीपटू विनेश फोगट हिचे २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न अखेर भंगले आहे. इंदिरा गांधी क्रीडांगण येथे शनिवारी झालेल्या महिला ५३ किलो गटाच्या निवड चाचणीतील उपांत्य फेरीत मीनाक्षीकडून ४-६ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागल्याने तिची स्पर्धेबाहेर गच्छंती झाली.निवड चाचणीच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये विनेशने दमदार कामगिरी करत पुनरागमनाची चिन्हे दाखवली होती. पहिल्या लढतीत तिने ज्योतीचा ७-१ अशा एकतर्फी फरकाने पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या फेरीत निशूवर मात करून तिने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. मात्र, निर्णायक लढतीत मीनाक्षीने चुरशीच्या संघर्षात विजय मिळवत विनेशच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील आशा संपुष्टात आणल्या. दरम्यान, भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) यापूर्वीच विनेश फोगाटला ५३ किलो गटातील निवड चाचणीत सहभागी होण्यास मंजुरी दिली होती. नियोजित वेळापत्रकानुसार सर्व वजन गटांसाठी वजनमापन प्रक्रिया पार पडली असून विनेशसह सर्व पात्र खेळाडूंनी आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्याचे महासंघाने स्पष्ट केले.वजनमापनावेळी विनेशचे वजन ५३.९ किलो नोंदविण्यात आले आणि तिला ५३ किलो गटाच्या ड्रॉमध्ये स्थान देण्यात आले. त्यामुळे तिच्या सहभागाबाबतचा वाद काही काळासाठी तरी निवळला होता.या निवड प्रक्रियेला न्यायालयीन वादाचीही पार्श्वभूमी होती. दिल्ली उच्च न्यायालयाने २२ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार विनेशला ३० आणि ३१ मे रोजी होणाऱ्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. निवड प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी चाचण्यांचे चित्रिकरण करण्याचे तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाने नियुक्त केलेल्या स्वतंत्र निरीक्षकांच्या देखरेखीखाली स्पर्धा घेण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते.
दुहेरी फटका ! निर्यात प्रक्रिया अधिक कडक करण्याची गरज नवी दिल्ली :भारतीय आंबा निर्यातदारांना यंदाच्या हंगामात अत्यंत वाईट बातमीचा सामना करावा लागत ...






