Saturday, March 21, 2026

माथेरान पर्यटन स्थळावरील मूलभूत सुविधांचा बोजवारा

माथेरान पर्यटन स्थळावरील मूलभूत सुविधांचा बोजवारा

सुविधांची पूर्तता करण्यात प्रशासन हतबल

माथेरान : पर्यटन नगरी माथेरान हे पर्यटनस्थळ म्हणून जगप्रसिद्ध असले तरी इथल्या स्थानिकांना आवश्यक मूलभूत सेवासुविधा त्याचप्रमाणे येणाऱ्या पर्यटकांना भेडसावत असणाऱ्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुणी वालीच नसल्याने स्थानिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

११ ऑक्टोबर २००८ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष मनोज खेडकर यांच्या सर्वस्वी प्रयत्नांमुळेच सुरू झालेली मिनीबस सद्यस्थितीत डबघाईला आलेली दिसत असून ही बस घाटरस्त्यात केव्हा बंद पडेल याची शाश्वती देता येत नाही. स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने शालेय विद्यार्थी असो, नियमितपणे व्यवसायासाठी जाणारे व्यापारी वर्ग असोत सर्वजण या सेवेचा लाभ घेत असतात. या बसच्या सेवेमुळे अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन उच्च शिक्षण घेता आल्याने हे विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत आणि पुढेही याच मिनीबसच्या आधारावर भावी पिढी घडणार आहे. अनेकदा तीव्र चढावावर या बसचा गियर पडण्यास विलंब होत असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कित्येक वेळा अर्ध्या मार्गावर ही बस तांत्रिक कारणास्तव बंद पडत असल्याने प्रवाशांना आपल्या लहान मुलांसह सामान घेऊन पायपीट सुद्धा करावी लागते. कर्जत-माथेरान दरम्यान या मार्गावर नवीन मिनीबस देण्याची फक्त आश्वासने दिली गेली आहेत; परंतु प्रत्यक्षात शासन आणि प्रशासनाकडून काहीच हालचाली झालेल्या दिसत नसल्यामुळे नागरिकांकडून संताप केला जात आहे. दुसरीकडे दस्तुरी ते माथेरान रेल्वे स्टेशनपर्यंत ई-रिक्षासारखी उत्तम सुविधा सुरळीत वाहतुकीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. या सेवेमुळे पर्यटकांची संख्या पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. एकूण ९४ परवानाधारक हातरिक्षांपैकी केवळ वीस जणांना ई-रिक्षा मिळाल्या आहेत. उर्वरीत ७४ परवानाधारकांना ई-रिक्षा मिळाल्यास पर्यटकांना रिक्षेसाठी ताटकळत उभे राहण्याची वेळ येणार नाही. ज्यांचा हातरिक्षाचा परवाना आहे त्या सर्वांना ई-रिक्षा मिळणे क्रमप्राप्त आहे.

नेरळ मार्गे माथेरान हाच एकमेव मार्ग असल्याने ऐन सुट्ट्यांच्या हंगामात दस्तुरी नाक्यावर अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे वाहनांची कोंडी होत असून घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. यामुळे पर्यटकांना तासनतास घाटात अडकून राहावे लागते. यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण होणे गरजेचे आहे; परंतु याकडे शासन आणि प्रशासन गांभीर्याने लक्ष केंद्रित करत नसल्याने या पर्यटन स्थळाला कुणी वाली आहे की नाही असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे.

Comments
Add Comment