मागोवा-वैष्णवी भोगले
प्रेम... हा शब्द उच्चारला की डोळ्यांसमोर विश्वास, आपुलकी, त्याग आणि एकमेकांसाठी जगण्याची भावना उभी राहते. मात्र आजचे चित्र अनेकदा अस्वस्थ करणारे आहे. ज्या डोळ्यांत एकत्र आयुष्याची स्वप्ने असायला हवीत, त्याच डोळ्यांत कधीकधी सूड आणि द्वेषाची आग पेटताना दिसते. प्रेमाची व्याख्या इतकी कशी बदलली? लोहगडाचे नाव काही दिवसांपूर्वी इतिहास, पर्यटन आणि वारसा संवर्धनामुळे चर्चेत होते. पण आज लोहगडावर झालेल्या प्रकरणामुळे भयावह ओळख निर्माण केली आहे. यावेळी जे घडले, तो अपघात नव्हता; तो एका थंड डोक्याने आखलेला कट असल्याचा आरोप तपासात समोर आला आहे.
पुण्याजवळच्या लोहगड किल्ल्यावर घडलेली केतन अग्रवाल याच्या मृत्यूची घटना सुरुवातीला एक दुर्दैवी अपघात वाटली होती. अवघ्या काही महिन्यांवर आलेलं लग्न, आयुष्याची नवी स्वप्नं पाहणारा एक तरुण अचानक दरीत पडून मृत्यूमुखी पडल्याची बातमी स्क्रोल झाली आणि सगळ्यांनाच वाईट वाटलं. पण जसजसा तपास पुढे सरकत गेला तसतसं या प्रकरणाचं स्वरूप बदलत गेलं. पोलिस तपासात समोर आलेल्या आरोपांनुसार ही घटना अपघात नसून पूर्वनियोजित कटकारस्थान रचल्याचं समोर आलं. त्याहून धक्कादायक म्हणजे या कटात त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांचा सहभाग असल्याचा आरोप झाला. या एका घटनेने सर्वांनाच हादरवून सोडलं. कोण दोषी आणि कोण निर्दोष हे कायदा ठरवेल. मात्र या प्रकरणाने समाजासमोर काही गंभीर प्रश्न उभे केले आहेत. हे केवळ कटकारस्थानच नाही तर प्रेमाच्या नावाखाली वाढणाऱ्या मालकीहक्काच्या भावनेची, संवाद हरवत चाललेल्या कुटुंबांची, भावनिकदृष्ट्या असुरक्षित होत चाललेल्या तरुण पिढीची आणि आधुनिकतेच्या शर्यतीत मागे पडलेल्या संस्कारांची. प्रेम ही माणसाला जगायला शिकवणारी भावना आहे. पण जेव्हा प्रेमामध्ये विश्वासाऐवजी संशय, समजूतदारपणाऐवजी हट्ट आणि स्वातंत्र्याऐवजी मालकीहक्क येतो तेव्हा त्याचं रूपांतर विनाशात होतं. तू माझीच झाली पाहिजेस, तू मला सोडून जाऊ शकत नाहीस, माझ्या मनासारखं नाही झालं तर परिणाम भोगावे लागतील अशा भावना प्रेमाच्या नसतात. त्या अहंकाराच्या असतात. केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचं लग्न नोव्हेंबरमध्ये होणार होतं. दोन्ही कुटुंबांनी मोठ्या उत्साहाने तयारी देखील केली होती. राजस्थानमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून महाल बुक करण्यात आला होता. बाहेरून सगळं स्वप्नवत दिसत होतं. पण या चमकदार चित्रामागे वास्तव वेगळंच होतं. आरोपांनुसार सियाचे चेतन चौधरीसोबत प्रेमसंबंध होते आणि तिला हे लग्न मान्य नव्हतं. इथे पहिला प्रश्न निर्माण होतो. जर एखाद्या मुलीला लग्न मान्य नसेल, तर तिने ते स्पष्टपणे सांगितलं का नाही? तिला तसं सांगण्याचं स्वातंत्र्य होतं का नाही? आणि जर होतं, तर तिने खोटेपणाचा मार्ग का निवडला? या प्रश्नांची उत्तरं शोधताना आपल्याला आपल्या समाजाकडे पाहावं लागेल.
आजही अनेक घरांमध्ये मुलांच्या भावना ऐकून घेण्यापेक्षा त्यांच्यासाठी निर्णय घेण्याची पद्धत आहे. मुलगा किंवा मुलगी प्रेमात आहे हे समजलं की, अनेक पालक संतापतात. संवाद करण्याऐवजी बाहेर पडण्यास बंदी घालतात. त्यामुळे मुलं सत्य सांगण्याऐवजी गोष्टी लपवायला शिकतात. सुरुवातीला छोटं वाटणारं खोटं नंतर मोठ्या संकटाचं कारण ठरतं. आई-वडील मुलांच्या शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करतात. चांगली शाळा, चांगलं कॉलेज, चांगली नोकरी यासाठी अहोरात्र कष्ट करतात. पण मुलांच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी वेळ काढतात का? मुलं कोणासोबत फिरतात, कोणावर विश्वास ठेवतात, कोणत्या भावनिक संघर्षातून जात आहेत याबद्दल किती पालक बोलतात? हा प्रश्न प्रत्येक पालकांनी स्वतःला विचारण्याची गरज आहे. आजकाल घरात सगळे एकत्र राहतात, पण संवाद मात्र कमी झाला आहे. एका घरात राहणाऱ्या माणसांना एकमेकांच्या आयुष्यात काय चाललंय हेच माहीत नसतं. मुलं सोशल मीडियावर अनेकांशी बोलतात, पण आई-वडिलांशी दोन मनमोकळे शब्द बोलू शकत नाहीत. हीच आजची सर्वात मोठी शोकांतिका आहे.
या प्रकरणाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे भावनिक अपरिपक्वता. आजची पिढी अत्यंत हुशार आहे. तंत्रज्ञान हाताळण्यात ती जगात कुठेही मागे नाही. पण नकार स्वीकारण्याची ताकद किती जणांमध्ये आहे? प्रेमभंग सहन करण्याची क्षमता किती जणांमध्ये आहे? एखादं नातं संपलं तर त्यातून सावरून पुढे जाण्याची मानसिकता किती जणांमध्ये आहे? आपल्या शिक्षण व्यवस्थेत गणित, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन आणि करिअर यावर भर दिला जातो. पण भावनिक शिक्षणाचं काय? विद्यार्थ्यांना नातेसंबंध कसे सांभाळायचे, अपयश कसं स्वीकारायचं, रागावर नियंत्रण कसं ठेवायचं, मानसिक तणावाशी कसं लढायचं हे शिकवलं जातं का? दुर्दैवाने याचं उत्तर बहुतेक वेळा ‘नाही’ असंच आहे. आज सोशल मीडियाने प्रेमाचं एक अवास्तव चित्र उभं केलं आहे. या प्रकरणात आणखी एक बाब म्हणजे खून करूनही सत्य लपवता येईल असा झालेला भ्रम. आजच्या डिजिटल युगात परफेक्ट क्राईम नावाची गोष्ट जवळजवळ अस्तित्वात नाही. मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही, कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया संदेश, आर्थिक व्यवहार आणि इतर तांत्रिक पुरावे तपास यंत्रणांना सत्यापर्यंत पोहोचवतात. कितीही नियोजन केलं तरी गुन्हा कायमचा लपून राहत नाही. एकदा गुन्हा केला की त्याचं ओझं आयुष्यभर वाहावं लागतं. न्यायालयीन खटले वर्षानुवर्षे चालतात. तरूणाई एवढी हतबल कशी होते. सियाने चेतनच्या सोबत जे केलं, त्यामुळे एकाच वेळी तिघांची वाताहात झाली. तीन कुटुंब उद्ध्वस्त झाली. वीस वर्षाच्या एका कोवळ्या मुलीच्या मनात असे विचार आले तरी कसे असतील? समाजात मानहानी होते. आणि शेवटी शिक्षा टळली तरी आयुष्य पूर्वीसारखं राहत नाही. या घटनेत सर्वात मोठं नुकसान झालं ते केतन अग्रवालच्या कुटुंबाचं. ज्यांच्या डोळ्यांसमोर मुलाचं लग्न होणार होतं, ज्यांनी त्याच्या भविष्यासाठी स्वप्नं रंगवली होती, त्या कुटुंबाने एका क्षणात सर्व काही गमावलं. पैसा, प्रतिष्ठा आणि यश यापैकी काहीही त्यांचं दुःख भरून काढू शकत नाही.
पण याचबरोबर समाजानेही काही धडे घेण्याची गरज आहे. मुलं प्रेमात पडली म्हणून ती चुकीची ठरत नाहीत. प्रेमसंबंध असणं हा गुन्हा नाही. पण प्रेमाच्या नावाखाली खोटेपणा, फसवणूक आणि हिंसा स्वीकारणं नक्कीच चुकीचं आहे. एखादं लग्न मान्य नसेल तर स्पष्टपणे नकार देता येतो.नातं टिकत नसेल तर ते सन्मानाने संपवता येतं. पण एखाद्याचा जीव घेणं हा कोणत्याही समस्येचा उपाय असू शकत नाही. या घटनेने प्रत्येक पालक, प्रत्येक तरुण, प्रत्येक शिक्षक आणि प्रत्येक नागरिकाला एक प्रश्न विचारला आहे तो म्हणजे आपण आपल्या मुलांना यशस्वी बनवत आहोत, पण त्यांना भावनिकदृष्ट्या सक्षम बनवत आहोत का? आपण त्यांना स्पर्धा शिकवतो, पण अपयश स्वीकारायला शिकवतो का? आपण त्यांना करिअर घडवायला मदत करतो, पण आयुष्य घडवायला शिकवतो का? या प्रश्नांची उत्तरं जर आपण प्रामाणिकपणे शोधली, तर कदाचित भविष्यात एखादा केतन वाचेल, एखादं कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचेल आणि समाज म्हणून आपण अधिक समंजस आणि अधिक माणूसकी जपणारे बनू.






