Tuesday, March 10, 2026

म्युनिसिपल बाँडच्या माध्यमातून नाशिकच्या विकासाला गती!

म्युनिसिपल बाँडच्या माध्यमातून नाशिकच्या विकासाला गती!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'महाराष्ट्राच्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा (ULB) ग्रीन म्युनिसिपल बाँड' या नाशिक महानगरपालिकेच्या पब्लिक इश्यूचे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये घंटानादाद्वारे लिस्टिंग केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महानगरपालिकांनी म्युनिसिपल बाँड मार्केटचा अधिकाधिक वापर करावा, यावर नेहमीच भर दिला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने योजना जाहीर करून पहिल्या टप्प्यात ₹२०० कोटींपर्यंतचे बाँड्स काढण्यास मान्यता दिली होती. या उपक्रमाच्या यशानंतर, नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महानगरपालिकांना ₹१००० कोटींपर्यंत म्युनिसिपल बाँड्स काढण्याची मुभा दिली आहे. त्याचबरोबर त्यासाठीचा इन्सेंटिव्हदेखील ₹२० कोटी पासून ₹२०० कोटीपर्यंत नेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

नाशिक महानगरपालिकेने अवघ्या एका वर्षात दुसऱ्यांदा म्युनिसिपल बाँड इश्यू करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पब्लिक इश्यूच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिका कुंभमेळ्याशी संबंधित प्रकल्पांसह नागरी विकासाच्या विविध उपक्रमांसाठी म्युनिसिपल बाँडद्वारे निधी उभारणी करत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

येत्या दीड वर्षांत नाशिक महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ₹२५,००० कोटींची विविध विकासकामे होणार आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उभारले जाणारे हे प्रकल्प केवळ तात्पुरते नसून, दीर्घकालीन स्वरूपात नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे ठरणार आहेत. त्यामुळे भविष्यात नाशिक हे गुंतवणुकीचे आकर्षण केंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नाशिक महानगरपालिकेने अशाच अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून शहर विकासात गुणात्मक आणि दर्जात्मक परिवर्तन घडवून आणत राहावे. या उपक्रमासाठी नाशिकच्या महापौर, कुंभमेळ्याच्या आयोजनाशी संबंधित सर्व अधिकारी आणि संपूर्ण टीमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले. तसेच या बाँड इश्यू प्रक्रियेत नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने सल्लागार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली असून विविध वित्तीय संस्थांनीही मोलाचे सहकार्य केले आहे.

यावेळी मंत्री गिरीष महाजन, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान व इतर मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा