Monday, July 13, 2026

Jalgaon Accident : संसाराची नवी स्वप्न धुळीस! लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच नवविवाहितेचा भीषण अपघातात मृत्यू

Jalgaon Accident : संसाराची नवी स्वप्न धुळीस! लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच नवविवाहितेचा भीषण अपघातात मृत्यू

माहेरी जाताना २१ वर्षीय नवविवाहितेचा भीषण अपघातात मृत्यू

जळगाव : जळगाव (Jalgaon) शहरात सोमवारी घडलेल्या भीषण अपघातात २१ वर्षीय नवविवाहितेचा मृत्यू झाला. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच माहेरी जात असताना भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात तिच्यासोबत असलेले काका गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. (Bride Dies In Accident)

मृत तरुणीचे नाव वैशाली भाऊसाहेब पाटील (रा. कोळपिंप्री, ता. अमळनेर) असे आहे. त्यांचा विवाह 7 जुलै रोजी जळगावातील पोलीस कर्मचारी विजय काशिनाथ पाटील यांच्याशी झाला होता. विवाहानंतर देवदर्शनाचा कार्यक्रमही पार पडला होता. (Jalgaon Road Accident)

सोमवारी वैशाली यांना माहेरी घेऊन जाण्यासाठी त्यांचे काका जळगाव येथे आले होते. दुपारचे जेवण झाल्यानंतर दोघेही दुचाकीवरून कोळपिंप्रीकडे निघाले. दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास विद्यापीठासमोरील रस्त्यावरून जात असताना मागून भरधाव आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात वैशाली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर काका गंभीर जखमी झाले. (Road Accident)

घटनेची माहिती मिळताच सासरचे आणि माहेरचे नातेवाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. काही दिवसांपूर्वी लग्नाचा आनंद साजरा करणाऱ्या दोन्ही कुटुंबांवर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या चारचाकी वाहनाचा आणि चालकाचा शोध सुरू आहे. संबंधित चालकाला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >