Tuesday, July 14, 2026

Beed Cyber Crime : IT इंजिनिअरच ठरला सायबर क्राईमची शिकार; ‘SEBI’चे बनावट प्रमाणपत्र पाठवून IT इंजिनियरची लाखोंची फसवणूक

Beed Cyber Crime : IT इंजिनिअरच ठरला सायबर क्राईमची शिकार; ‘SEBI’चे बनावट प्रमाणपत्र पाठवून IT इंजिनियरची लाखोंची फसवणूक

बीड : बीड जिल्ह्यात सायबर फसवणुकीची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तंत्रज्ञानाची चांगली माहिती असलेल्या एका आयटी इंजिनियरलाच सायबर ठगांनी शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली तब्बल ७ लाख ८० हजार रुपयांचा गंडा घातला. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी चक्क 'SEBI'चे बनावट नोंदणी प्रमाणपत्र पाठवल्याचेही तपासात उघड झाले आहे. (Beed Cyber Crime)

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडिताने बीड सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, दोन अज्ञात सायबर भामट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

'ट्रेडिंगमध्ये मोठा नफा'चे आमिष :

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेवराई येथील आयटी इंजिनियर दत्तात्रय सूर्यभान खराद यांना काही दिवसांपूर्वी एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून कॉल आणि संदेश आला. स्वतःचे नाव 'सुनील' असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीने आपण ट्रेडिंग अॅडव्हायझरी सेवा देत असल्याचा दावा करत कमी कालावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यानंतर 'विवेक' नावाच्या कथित ब्रोकरमार्फत ट्रेडिंग खाते उघडण्यास सांगण्यात आले. विश्वास बसल्याने दत्तात्रय यांनी आवश्यक कागदपत्रे पाठवून सुरुवातीला ३० हजार रुपयांची गुंतवणूक केली. (Beed Cyber Crime)

नुकसान भरपाईच्या नावाखाली लाखोंची उकळपट्टी :

त्यानंतर आरोपींनी 'मार्केट प्लीज इन्व्हेस्टमेंट लिमिटेड' आणि 'भवानी स्टॉक ब्रोकर' या नावाने विविध खात्यांमध्ये व्यवहार करण्यास सांगितले. काही दिवसांनी शेअरमधील नुकसान भरून काढण्याचे आणि मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ६ लाख ८० हजार रुपये ऑनलाइन जमा करण्यास भाग पाडले. त्यानंतर नफ्यातील हिस्सा देण्याच्या नावाखाली आणखी ४० हजार रुपये उकळण्यात आले. (Beed Cyber Crime)

SEBI प्रमाणपत्र निघाले बनावट :

सतत पैशांची मागणी सुरूच राहिल्याने दत्तात्रय यांना संशय आला. त्यांनी संबंधित कंपनीचे अधिकृत SEBI नोंदणी प्रमाणपत्र मागितले. आरोपींनी तत्काळ एक प्रमाणपत्र पाठवले; मात्र त्याची पडताळणी केल्यानंतर ते पूर्णपणे बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बीड सायबर पोलिसांकडे धाव घेतली. (Beed Cyber Crime)

सायबर पोलिसांचे नागरिकांना आवाहन :

सायबर पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. शेअर ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीच्या नावाखाली अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या कॉल, मेसेज किंवा सोशल मीडिया ऑफर्सवर विश्वास ठेवू नका. कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी ती संस्था SEBIकडे नोंदणीकृत आहे की नाही, याची अधिकृत संकेतस्थळावर जाऊन खात्री करा, असे आवाहन सायबर सेलने केले आहे. (Beed Cyber Crime)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >