Wednesday, May 1, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखUPSC Exam: यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्राचा चढता आलेख

UPSC Exam: यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्राचा चढता आलेख

असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे…’ या उक्तीप्रमाणे जर एखादी गोष्ट साध्य करायची असेल, तर त्यामागील एकमेव कारण म्हणजे अभ्यासात सातत्य ठेवणे होय. ही संतवाणी आजच्या व्यवहारी जगतात आपल्याला खरी ठरताना दिसते. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर यूपीएससीच्या परीक्षेत यंदा महाराष्ट्रातील ८७ हून अधिक उमेदवारांनी घवघवीत यश संपादन केले आहे. महाराष्ट्रात सर्व स्तरावर त्याचे कौतुक होत आहे.

यूपीएससीच्या परीक्षेसाठी देशातील एकूण १०१६ उमेदवार यशस्वी झाले आहेत. त्यात महाराष्ट्रातील यशस्वी उमेदवारांची संख्या समाधानकारक मानायला हरकत नाही. २०२२ मध्ये झालेल्या परीक्षेत महाराष्ट्रातील ७० उमेदवार यशस्वी ठरले होते. यंदाच्या निकालात राज्यातून समीर प्रकाश खोडे प्रथम आले असून देशात त्यांनी ४२ वा क्रमांक पटकाविला आहे. या निकालात पहिल्या १०० उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. नेहा राजपूत यांनी ५१वा, तर अनिकेत हिरडे यांनी ८१ वा क्रमांक पटकावला आहे. केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी सप्टेंबर २०२३ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली.जानेवारी – एप्रिल २०२४ दरम्यान परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परीक्षेच्या निकालातील उत्तीर्ण १०१६ उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. या निकालात यावेळी मराठीचा टक्का वाढलेला दिसून येत आहे, हे त्यात अधोरेखित करायला हरकत नाही.

यशस्वी उमेदवारांची लवकरच वर्णी लागेल. त्यापैकी भारतीय प्रशासन सेवा (आयएएस) या सेवेत शासनाकडे एकूण -१८० जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) – ७३, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) – १७, इतर मागास वर्ग (ओबीसी)-४९, अनुसूचित जाती (एससी) – २७, अनुसूचित जमाती (एसटी) – १४ जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाईल, तर भारतीय विदेश सेवा (आयएफएस) या सेवेत शासनाकडे एकूण-३७ जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन)-१६, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) ४, इतर मागास वर्ग (ओबीसी) – १०, अनुसूचित जाती (एससी) – ५, अनुसूचित जमाती (एस.टी.) – २ जागा रिक्त आहेत. त्याचप्रमाणे, भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) या सेवेमध्ये एकूण – २०० जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – ८०, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) २०, इतर मागास प्रवर्गातून – ५५, अनुसूचित जाती प्रवर्गातून – ३२, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – १३ उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.

यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस होणे हे प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. मात्र यासाठी द्याव्या लागणाऱ्या दिव्य परीक्षेची तयारी करण्यासाठी मराठी विद्यार्थी आजवर कमी पडत होते. मात्र, प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत राज्यातील उमेदवारांनी यूपीएससी परीक्षेचे चक्रव्यूह तोडले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

यूपीएससीच्या परीक्षेची तयारी सुरुवातीपासून करून या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी एकाग्र मन, जिद्द, चिकाटी आणि कष्ट उपसण्याच्या शर्यतीत महाराष्ट्रीय उमेदवार कमी पडत होते, असा समज केला गेला आहे. मात्र आता महाराष्ट्रसुद्धा मागे राहिला नाही, हे यूपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाèऱ्या मराठी विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे.

कुठल्याही सोयी उपलब्ध नसताना किंवा शिकवणी नसतानाही यातील काही विद्यार्थ्यांनी केवळ स्वत:च्या बळावर ही परीक्षा उत्तीर्ण करून दाखवली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आत्मविश्वास दृढ असणे, शिस्त बाळगणे, संयम ठेवणे आणि चिकाटी या गुणांच्या भरवशावर आपण यूपीएससी उत्तीर्ण होऊ शकतो, हे या निकालातून राज्यातील विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. कोणतीही परीक्षा लहान किंवा मोठी नसते. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना केवळ आपल्या लक्ष्यावर नजर टिकवून ठेवावी लागते. यूपीएससी परीक्षा ही सनदी नोकरीसाठी महत्त्वपूर्ण परीक्षा असून या नोकरीत येऊ पाहणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांनी आता यूपीएससी परीक्षेत आपला टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची आणि या परीक्षेचे चक्रव्यूह तोडण्याची गरज आहे. त्यासाठी घाबरून न जाता आपल्या मनगटातील आणि मनातील ताकदीवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी यावेळी लागलेल्या निकालावर फोकस करून आपल्या परिश्रमाची दिशा ठरविण्याची गरज आहे. एकदा दिशा ठरविली की आपली दशा बदलविण्यासाठी कुणाचीच वाट बघावी लागणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -