Sunday, April 28, 2024
Homeताज्या घडामोडीRashtravadi Congress Party : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही ठीक की पक्षांतर्गत दबाव...

Rashtravadi Congress Party : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही ठीक की पक्षांतर्गत दबाव गट?

अजित पवारांना प्रदेशाध्यक्ष करण्यासाठी समर्थक आमदारांचा दबाव

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Rashtravadi Congress Party) कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांची निवड झाल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याची चर्चा रंगली होती. तेव्हा यामध्ये काहीच तथ्य नाही, असं म्हणत अजित पवारांनी या बातम्या धुडकावून लावल्या होत्या. मात्र काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदाऐवजी पक्षांतर्गत महत्त्वाचे पद देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार आता अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करा, अशी मागणी अजित पवार यांच्या समर्थक आमदारांनी केल्याने पक्षांतर्गत दबाव गट निर्माण होतोय का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या सभेत अजित पवारांना देश पातळीवर कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती. यावर विरोधी पक्षनेत्याची राज्य पातळीवर खूप मोठी जबाबदारी माझ्यावर असल्याचे अजित पवार म्हणाले होते. मात्र मला विरोधी पक्षनेते पदामध्ये काही इंटरेस्ट नव्हता, आता मला संघटनेत कोणतही पद द्या, मी त्या पदाला न्याय देईल, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी केलं. त्यानुसार आता त्यांच्या समर्थक आमदारांनी देखील त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी करत दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली. मराठा समाजाकडे एक पद असेल तर दुसरे पद हे इतर समाज किंवा ओबीसी समाजाला देण्याची मागणी छगन भुजबळ यांनी केली. त्यानुसार मला संधी दिली तर मला हे काम करायला आवडेल, असे देखील छगन भुजबळ म्हणाले होते. त्यामुळे अजित पवार यांची पक्षांतर्गत कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच आता अजित पवारांना प्रदेशाध्यक्ष करण्याच्या समर्थकांच्या मागणीने जोर धरल्याने पक्षांतर्गत दबाव गट निर्माण होत असल्याची चिन्हे आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मदत

संबंध

- Advertisment -