Wednesday, May 1, 2024
Homeताज्या घडामोडीG20 Summit 2023 : जी - २० परिषदेत 'भारत' आपल्या सगळ्यांचे स्वागत...

G20 Summit 2023 : जी – २० परिषदेत ‘भारत’ आपल्या सगळ्यांचे स्वागत करत आहे…

स्वागतपर भाषणात मोदींकडून देशाचा उल्लेख ‘भारत’

नवी दिल्ली : दिल्लीतील प्रगती मैदानावर उभारण्यात आलेल्या ‘भारत मंडपम’मध्ये जी – २० शिखर परिषदेला (G20 Summit 2023) सुरुवात झाली आहे. यावेळी जी – २० परिषदेत ‘भारत’ आपल्या सगळ्यांचे स्वागत करत आहे, अशी सुरुवात करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi) यांनी जगाला आपल्या देशाची ओळख करुन दिली. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकृतरित्या भारत हेच नाव वापरले जाणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. केवळ संविधानिक प्रक्रिया बाकी राहिली आहे.

स्वागतपर भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी मोरोक्को येथे झालेल्या भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली तसेच ही आपत्ती लवकर टळावी यासाठी प्रार्थना केली. पुढे ते म्हणाले, ज्या ठिकाणी आपण एकत्रित आहोत इथून काही किमी अंतरावर सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीचा एक स्तंभ उभारण्यात आला आहे. या स्तंभावर प्राकृत भाषेत लिहिलंय की, मानवतेचं कल्याण आणि सुख हे कायम प्राथमिकता असायला पाहिजे. अडीच हजार वर्षांपूर्वी भारताच्या भूमीनं हा संदेश संपूर्ण विश्वाला दिला होता. या संदेशाची आठवण करुन आपण या जी २० संमेलनाला सुरुवात करुयात.

एकविसाव्या शतकाचं महत्त्व पटवून देताना पंतप्रधान म्हणाले, २१ व्या शतकाचा हा काळ संपूर्ण जगाला नवी दिशा दाखवणारा आणि नवी दिशा देणारा महत्वाचा काळ आहे. हा तो काळ आहे ज्यात अनेक वर्षांपासून आपल्या समोर असलेली आव्हानं आपल्याकडं नवा तोडगा मागत आहे. यासाठी आपल्याला मानवकेंद्रीत राहून आपली प्रत्येक जबाबादारी पार पाडत पुढे जायचं आहे.

जागतिक अविश्वासाला विश्वासात रुपांतरित करुयात

कोविड १९ च्या काळात जगावर सर्वात मोठं एकमेकांवरील विश्वासाचं संकट आलं होतं. युद्धानं या विश्वासाला गेलेला तडा अधिक वाढवला आहे. जर आपण कोविडला हरवू शकतो तर आपण परस्पर विश्वासावरच्या या संकटावर देखील विजय मिळवू शकतो. आज जी २० च्या अध्यपदावरुन भारत संपूर्ण जगाला आवाहन करतो आहे की, आपण मिळून सर्वात आधी या जागतिक अविश्वासाला विश्वासात रुपांतरित करुयात.

‘सबका विश्वास, सबका प्रयास’

ही सगळ्यांनी मिळून एकत्र चालायची वेळ आहे आणि यासाठी ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’चा मंत्र आपल्या सर्वांसाठी एक मार्गदर्शक बनू शकतो. जागतिक अर्थव्यवस्थेत उलथापालथ असेल, उत्तर-दक्षिण अशी विभागणी असेल, पूर्व-पश्चिमेती दूरी असेल, अन्न-इंधन आणि खतांची व्यवस्था असो, दहशवाद आणि सायबर सुरक्षा असो, आरोग्य-ऊर्जा-पाणी सुरक्षा असेल वर्तमानासह येणाऱ्या पिढ्यांसाठी या आव्हानांना तोंड देण्याकरता आपल्याला ठोस उपायांकडं जावंच लागेल, असं मोदीजी म्हणाले.

अफ्रिकन युनियनचा जी-२० मध्ये समावेश

यावेळी मोदींनी जी-२० मधील देशांकडे अफ्रिकन युनियनला जी-२० मध्ये स्थायी सदस्यत्व मिळावं असा प्रस्ताव ठेवला होता. याला सर्वांची सहमती आहे का? असा प्रश्न मोदींनी विचारला. याला सर्वांनी संमती दिल्यानंतर मोदींनी आपल्याजवळील ‘गॅवल’ तीन वेळा वाजवून याला सर्वांची संमती असल्याचं जाहीर केलं. यानंतर संमेलनाच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी मोदींनी अफ्रिकन युनियनच्या अध्यक्षांना जी-२० तील स्थायी सदस्य म्हणून स्थान ग्रहण करण्याचं निमंत्रण दिलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -