Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेस्मार्ट सिटी योजनेतील गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश

स्मार्ट सिटी योजनेतील गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश

ठाणे महापालिकेत खळबळ

ठाणे : ठाणे शहरात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. ‘स्मार्ट सिटी मिशन’चे संचालक कुणालकुमार यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना ६ जानेवारी रोजी पत्र पाठविले आहे. त्यात ठाणे स्मार्ट सिटीतील गैरव्यवहारांची चौकशी करून २७ जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष कृती अहवाल (अॅक्शन टेकन रिपोर्ट) पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, स्मार्ट सिटी प्रकल्पातील कामांची प्रत्यक्षात चौकशी सुरू झाल्यामुळे ठाणे महापालिकेत खळबळ उडाली आहे. स्मार्ट सिटी योजनेतील काही कामांमध्ये गैरव्यवहार व बहुसंख्य कामे मंदगतीने सुरू असल्याबाबत ठाणे शहर भाजपने केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याकडे तक्रार करून विशेष बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार केंद्रीय नगर विकास खात्यातर्फे ७ डिसेंबर रोजी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला स्मार्ट सिटी मिशनचे संचालक कुणालकुमार यांच्याबरोबरच नगर विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, भाजपचे राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे, आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे, शहर उपाध्यक्ष सुजय पतकी यांचीही उपस्थिती होती. या बैठकीत चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिले होते. त्यानुसार ६ जानेवारी रोजी प्रत्यक्ष चौकशीचे आदेश काढण्यात आले.

स्मार्ट सिटी योजनेतून ठाणे शहरात ३८७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. प्रकल्पाच्या कामातील गैरव्यवहारासंदर्भात राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली आहे. त्यावरून स्मार्ट सिटीतील गैरव्यवहाराची चौकशी करून कारवाई करावी. तसेच स्मार्ट सिटी मिशनला २७ जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष कृती अहवाल पाठवावा, असे पत्रात म्हटले आहे.

भ्रष्ट कारभाराच्या चौकशीची ही पहिली फेरी : निरंजन डावखरे

स्मार्ट सिटी योजनेत करण्यात आलेल्या भ्रष्ट कारभाराच्या चौकशीची ही पहिली फेरी आहे. या चौकशीतून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार उघड होईल, अशी सुचक प्रतिक्रिया भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -