Monday, May 6, 2024
Homeक्रीडामहाराष्ट्राला विजयी हॅटट्रिकची संधी

महाराष्ट्राला विजयी हॅटट्रिकची संधी

आज केरळशी गाठ; विजय हजारे वनडे चषक

राजकोट (वृत्तसंस्था): विजय हजारे वनडे चषकातील गटवार साखळीमध्ये शनिवारी (११ डिसेंबर) ‘ड’ गटात महाराष्ट्राची गाठ केरळशी पडेल. फॉर्मात असलेल्या महाराष्ट्राला सातत्य राखताना सलग तिसरा विजय नोंदवण्याची संधी आहे.

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राने दोन्ही सामने जिंकताना आठ गुणांसह अव्वल स्थान राखले आहे. छत्तीसगडसह मध्य प्रदेशला आरामात हरवणाऱ्या महाराष्ट्राची फलंदाजी उल्लेखनीय ठरली आहे. त्याचे क्रेडिट कॅप्टन ऋतुराजला जाते. दोन्ही सामन्यांत शतके ठोकताना त्याने कमालीचा फॉर्म राखला आहे. केरळची संमिश्र सुरुवात झाली आहे. सलामीला मध्य प्रदेशविरुद्ध पराभव पाहावा लागला तरी चंडिगडविरुद्ध त्यांनी चुका सुधारल्या तरी सर्व आघाड्यांवर चमकदार खेळ करणाऱ्या महाराष्ट्राविरुद्ध केरळचा कस लागेल. उभय संघांमधील मागील दोन सामन्यांतही महाराष्ट्राने वर्चस्व राखले आहे. सध्याचा फॉर्म आणि मागील इतिहास पाहता महाराष्ट्राचे पारडे जड आहे.

विदर्भसमोर ओदिशाचे आव्हान

ठाणे : ‘अ’ गटात शनिवारी विदर्भसमोर ओदिशाचे आव्हान आहे. दोन्ही संघांनी गटवार फेरीतील पहिले दोन्ही सामने जिंकल्याने सलग तिसरा विजय कोण नोंदवतो, याची उत्सुकता आहे.

विदर्भने दोन्ही सामने जिंकून अव्वल स्थान राखले आहे. मागील सामन्यात त्यांनी हिमाचल प्रदेशवर विजय मिळवला. त्याआधी, आंध्र प्रदेशचा मोठ्या फरकाने पराभव केला. ओदिशानेही चांगला फॉर्म राखला आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने चुरशीची लढत अपेक्षित आहे.

मुंबईसह कर्नाटक वरचे स्थान मिळवण्यास उत्सुक

‘ब’ गटात गतविजेता मुंबई आणि कर्नाटक आमनेसामने आहेत. दोन्ही संघांना सुरुवातीच्या दोन सामन्यांत प्रत्येकी एक विजय आणि एक पराभव पाहावा लागला. खेळ उंचावत उभय संघ गुणतालिकेत वरचे स्थान मिळवण्यास उत्सुक आहेत.
मुंबईची कामगिरी संमिश्र आहे. बडोद्याला हरवत मुंबईने विजयी सलामी दिली तरी तामिळनाडूविरुद्ध पराभव पाहावा लागला. कर्नाटकला सलामीला तामिळनाडूविरुद्ध मात खावी लागली. मात्र, कमकुवत पाँडिचेरीविरुद्ध त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. मुंबई आणि कर्नाटकमधील मागील पाच सामन्यांचा विचार केल्यास मुंबईने ३-२ अशी बाजी मारली आहे. त्यात शेवटचा विजय मुंबईचा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -