Tuesday, May 7, 2024
Homeदेशबाप रे! महाराष्ट्रात ७ तर गुजरातमध्ये ओमायक्रॉनचे आणखी २ रुग्ण आढळले

बाप रे! महाराष्ट्रात ७ तर गुजरातमध्ये ओमायक्रॉनचे आणखी २ रुग्ण आढळले

मुंबईत ३, पिंपरी-चिंचवडमध्ये ४ रुग्ण सापडल्याने टेन्शन वाढले

मुंबई/अहमदाबाद : आज महाराष्ट्रात ७ तर गुजरातमधील जामनगर येथे ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आणखी २ रुग्ण आढळले आहेत. ९ नवे रुग्ण आढळल्याने देशातील ओमायक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या आता ३२ झाली आहे. तर राज्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचे ४ तर मुंबईत ३ रुग्ण सापडले आहेत. राज्यात दिवसभरात ओमायक्रॉनचे ७ रुग्ण सापडल्याने ही संख्या १७ वर गेली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे.

मुंबईवरील ओमायक्रॉनचे संकट दिवसेंदिवस गडद होताना दिसत असून आज एकूण ३ नव्या ओमायक्रॉन रुग्णांची नोंद पालिकेकडून करण्यात आली आहे. तर, राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १७ वर पोहोचली आहे. मुंबई महानगर पालिका क्षेत्रात आज ३ रुग्णांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे‌ निदान झाले त्यामुळे, एकूण रुग्ण संख्या ५ झाली आहे.

वाचा – मुंबईतील धारावीत पूर्व आफ्रिकेतील टांझानिया येथून आलेल्या एका व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाली आहे.

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने ही माहिती दिली आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवडमध्ये आढळलेले चारही रुग्ण नायजेरियावरून आलेल्या ओमायक्रॉन बाधित महिलेचे नातेवाईक आहेत. या ७ पैकी ४ रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले होते. एका रुग्णाने लसीचा एकच डोस घेतला होता. तर एका रुग्णाचे लसीकरण झालेले नाही. लसीकरण न झालेला बालक साडेतीन वर्षाचा आहे. विशेष म्हणजे यातील चारही रुग्णांना कोणतेही लक्षण आढळून आले नाहीत. तर तीन रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळले आहेत.

तर तिकडे गुजरातमध्ये ओमायक्रॉनचा एकच रुग्ण होता. त्याच्या संपर्कातील त्याची पत्नी आणि मेहुणा अशा दोन जणांच्या जीनोम सीक्वेन्सिंगचा अहवाल आला असून त्यात दोघांनाही ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या आठवड्यात झिम्बाब्वे येथून जामनगर येथे आलेल्या ७२ वर्षीय अनिवासी भारतीयाला ओमायक्रॉनने गाठले होते. त्यानंतर त्यांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली होती. त्यात त्याची पत्नी आणि मेहुणा अशा दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या दोघांचे नमुने जीनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज आला असून त्यात या दोघांनाही ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आल्याचे सांगण्यात आले. ओमायक्रॉन बाधित तिन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यात कोणतीही लक्षणे नाहीत. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे अहमदाबाद महापालिका आयुक्त विजयकुमार खराडी यांनी सांगितले.

पुण्यात चौघांना डिस्चार्ज

आज चार रुग्ण सापडल्याने पिंपरी-चिंचवडमधील ओमायक्रॉन रुग्णाचा आकडा दहावर जाऊन पोहचला आहे. यापैकी चार रुग्ण निगेटिव्ह झाले आहेत. त्यांना आज रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे सध्या ओमायक्रोनच्या सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर २२ रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

मुंबईत तिघांना लागण

मुंबईत आढलेल्या तिन्ही रुग्णांपैकी एक ४८ वर्षीय रुग्ण टांझानिया येथून ४ डिसेंबर रोजी आला होता. ४ डिसेंबर रोजी त्याची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये सदर व्यक्ती बाधित असल्याचे निदर्शनास आल्याने सदर नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. सदर रुग्णाचे कोविड लसीकरण शिल्लक आहे. सदर रुग्णाला खबरदारीची उपाययोजना म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला सौम्य लक्षणे आहेत. सदर रुग्णाच्या अतिजोखमीच्या संपर्कातील दोघांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी कोणीही कोविड बाधित नाही.

दुसरा रुग्ण २५ वर्षीय व्यक्ती आहे. तो लंडन येथून १ डिसेंबर रोजी भारतात आला. त्याची कोविड चाचणी बाधीत आल्याने त्याचा वैद्यकीय नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. सदर रुग्णाच्या कोविड लसीचे दोन्हीही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. सदर रुग्णाला खबरदारीची उपाययोजना म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला कोणतीही लक्षणे नाहीत. सदर रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी कोणीही कोविड बाधित नाही. तिसरा व्यक्ती ३७ वर्षीय पुरुष (गुजरातचा रहिवासी) आहे. तो दक्षिण आफ्रिका येथून ४ डिसेंबर रोजी आला होता. ज्याची कोविड चाचणी केली असता रुग्णास कोविडची बाधा झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याचा सदर नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. सदर रुग्णाच्या कोविड लशीच्या दोन्हीही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. सदर रुग्णाला खबरदारीची उपाययोजना म्हणून विमानतळावरूनच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला सौम्य लक्षणे आहेत.

धारावीत सापडला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण

धारावीमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. धारावीत सापडलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णाला तातडीने सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेकडून देण्यात आली.

याआधी बऱ्याच प्रयत्नांअंती धारावीतील कोरोना नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आल्यानंतर आता धारावीमध्ये जगभर दहशत निर्माण केलेला ओमायक्रॉन व्हेरिएंटचा कोरोना रुग्ण आढळला आहे. त्यामुळे मुंबईतील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून तातडीने पावले उचलण्यात येत आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, ही व्यक्ती नुकतीच टांझानियामधून परतली होती. काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत सापडलेला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण देखील नुकताच टांझानियामधून परतला होता. त्यामुळे टांझानिया ओमायक्रॉनचं नवं केंद्र बनतंय की काय, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांत वाढ

ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचे आणखी १३१ रुग्ण आढळले असून रुग्णांची एकूण संख्या ५६८ झाली आहे. या पार्श्वभूमीवर; शक्य तेथे वर्क फ्रॉम होम, मास्कचा वापर, लसीकरण प्रमाणपत्राचा वापर यांसारख्या कठोर उपाययोजना पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी बुधवारी जाहीर केल्या आहेत. सोमवारपासून तुम्हाला शक्य असेल तर घरून काम करा आणि आवश्यक असेल तर कामावर जा, पण शक्यतो घरूनच काम करा’, असे आवाहन जॉन्सन यांनी केले. नाइटक्लब्ज आणि गर्दीच्या ठिकाणी एनएचएस कोविड पास अनिवार्य करण्याचेही जॉन्सन यांनी जाहीर केले.

राज्यात निर्बंध लावण्याची शक्‍यता टोपेंनी फेटाळली

राज्यात सध्या कोणतेही नवीन निर्बंध लावले जाणार नाहीत, असे स्पष्ट मत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. फ्रंट लाइन वर्कर्सना बूस्टर देण्यासाठी भूमिका घ्यावी, अशी मागणीही टोपे यांनी केली. या संदर्भात सकारात्मक निर्णय झाल्यास तो स्वागतार्हच राहील, असेही टोपे म्हणाले. परदेशातून राज्यात आलेल्यांचा शोध सुरू आहे. वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेऊन त्यांना शोधू आणि त्यांच्या चाचण्या करू. महाराष्ट्रात संक्रमित व्यक्तींकडून करोना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र, नागरिकांनी लसीकरण तातडीनं करून घ्यावे. करोनाबाबतच्या नियमांचे पालन करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -