Saturday, April 27, 2024

obsession : ध्यास…

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर

आपण सर्वसामान्य माणसं आयुष्यभर सामान्य का राहातो? याचे एकच प्रमुख कारण म्हणजे आपण कोणत्याही गोष्टीचा ध्यास घेत नाही. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी लागणारी जिद्द आणि त्याकरिताचे कष्ट करण्याची आपली तयारी नसते. आपल्याला सगळ्या गोष्टी सहजतेनं हव्या असतात.

साधारण साठ-सत्तर वर्षांपूर्वी राजस्थानात घडलेली ही सत्यघटना…
कामधंद्यासाठी मुंबईत येऊन भरभराटीला आलेले उद्योगपती जनार्दन अगरवालशेट. मुंबईत स्थिरावून देखील जनार्दनशेट वर्षातून दोनदा-तीनदा मूळ गावी जायचे. गावातलं त्यांचं घर म्हणजे एक प्रशस्त वाडाच होता. मुंबईतल्या बहुतेक सगळ्या सुखसोयी त्यांनी राजस्थानातील आपल्या वाड्यावर उपलब्ध करून घेतल्या होत्या.

राजस्थानात बहुतेक ठिकाणी पाण्याचं दुर्भीक्ष होतं. पंचक्रोशीत एकच तलाव होता. गावातली माणसं दोन दोन मैलाची पायपीट करून घागरीतून पाणी भरून आणायची. पण अगरवाल शेटजींनी मात्र तलावापासून वाड्यापर्यंत स्वतंत्र पाइपलाइन टाकून वाड्याजवळ पाण्याची टाकी बसवून घेतली होती. पंपाने टाकीत पाणी चढवलं जायचं आणि नळाची चावी फिरवली पाण्याची धार वहायला सुरुवात व्हायची.

एकदा मात्र वाड्यावरच्या टाकीत पाणी चढण्याचं प्रमाण मंदावलं. टाकी रिकामी होत आली. पाण्याचं प्रेशर कमी झालं आणि शेटजींचं प्रेशर मात्र वाढलं. चार दिवसांनंतर शेटजींचे काही खास पाहुणे मुंबईहून राजस्थानला येणार होते. त्यांच्या राहण्या-खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था वाड्यावर केली जाणार होती. त्यासाठी सगळी तयारी केली होती. पण मध्येच हा पाण्याचा प्रश्न उद्भवला. शेटजी भडकले.

‘प्रेशर कमी का झालं? शोधून काढा.’ शेटजींचा हुकूम सुटला.

पाणी चढवणारी मोटार बदलण्यात आली. पण तरीही प्रेशर वाढण्याचं चिन्ह दिसेना. जवळच्या शहरातून तज्ज्ञ इंजिनीअर आणि इतर मंडळी आली. तलावाकडे धावली. तलावात, तर पाणी मुबलक होतं. याचा अर्थ पाइपलाइनमध्ये काहीतरी दोष होता.

बहुधा जमिनीखालचा पाइप फुटला असावा.‘पण असं कसं होईल? भक्कम सिमेंटचा पाइप. मध्येच जमिनीत कसा फुटेल?’

इंजिनीअरच्या पथकानं काही मशिन्स मागवल्या आणि जमिनीखालून नेलेली पाइपलाइन तपासायला सुरुवात केली. वाड्यापासून साधारण मैलभर अंतरावर पाइपलाइनला मोठी गळती लागल्याचं आढळलं. तिथली जमीन खणण्यास सुरुवात केली. त्यांचा अंदाज खरा ठरला. जमिनीखाली आठ-दहा फूट खोल असलेल्या त्या सिमेंटच्या पाइपला कुठल्याशा झाडाच्या मुळांनी घट्ट विळखे घालून, आवळून तो पाइप फोडला होता. साऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

ही मुळं कोणत्या झाडाची?
पुन्हा शोध सुरू झाला. मुळांचा मागोवा घेत शोध घ्यायला सुरुवात केल्यानंतर आढळलं की, पाइप जिथं फुटला होता, त्या जागेपासून साधारण तीन मैल अंतरावर उत्तर दिशेला एक वडाचं झाड होतं आणि त्या झाडाची मुळं पाण्याचा शोध घेत घेत इथवर पोहोचली होती. त्यांनी जमिनीखालचा सिमेंटचा भक्कम पाइप फोडला होता.

सारेजण थक्क झाले. पाइपलाइनचा मार्ग बदलून नवीन पाइपलाइन टाकून शेटजींनी वाड्यावरच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. पण त्याचबरोबर त्या वडाच्या झाडाला पाणी मिळावं म्हणून जुनी पाइपलाइन तशीच कायम ठेवली.

पुढे त्या वडाच्या झाडाजवळ शेटजींनी एक मंदिर बांधलं. अद्यापही ते मंदिर आणि तो वटवृक्ष दिमाखात तिथं उभा आहे.

दगडधोंड्यातून मार्ग काढीत, खडतर प्रवास करून वटवृक्षाच्या मुळांनी जसा पाण्याचा मागोवा घेतला, तसा आपल्या मागोवा घेत अनेक संकटांना सामोरे जात यश प्राप्त करणारे अनेक तपस्वी या देशात झाले आहेत.

शाळेत जाताना वाटेत लागणारी नदी पार करण्यासाठी नावाड्याला द्यायला पैसे नाहीत म्हणून पोहत शाळेत जाणारे लालबहाद्दूर शास्त्री.

शास्त्रीय संगीताचा ध्यास घेऊन घरातून पळून गेलेले, अनेक हालअपेष्टांना तोंड देत जिद्दीनं गाणं शिकणारे आणि त्यानंतर स्वतःची स्वतंत्र शैली विकसित करणारे संगीतसूर्य भीमसेन जोशी.

शिवाजी या तीन अक्षरी मंत्राने भारावले गेलेले आणि संपूर्ण हयात छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र संशोधन करून जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारे बाबासाहेब पुरंदरे.

कॅन्सरसारख्या दुर्धर रोगावर जिद्दीनं मात करून भारतीय क्रिकेट संघात यशस्वी पुनरागमन करणारा युवराज सिंग.

घरच्यांनी हाकलून दिल्यानंतर अनेक हालअपेष्टा सहन करून अनेक अनाथांची माय झालेली विश्वमाऊली सिंधूताई सकपाळ अशी अनेक क्षेत्रांतील अनेक नामवंतांची उदाहरणं सांगता येतील.

ही देखील आपल्यासारखीच सामान्य माणसं होती. पण केवळ आणि केवळ एका ध्येयानं प्रेरित होऊन यांनी सामान्यापासून असामान्यत्वाचा प्रवास केला. आपण सर्वसामान्य माणसं आयुष्यभर सामान्य का राहातो? याचा विचार केला, तर एकच प्रमुख कारण आढळेल. ते म्हणजे आपण कोणत्याही गोष्टीचा ध्यास घेत नाही. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी लागणारी जिद्द आणि त्याकरिता करावे लागणारे कष्ट करण्याची आपली तयारी नसते… आपल्याला सगळ्या गोष्टी सहजतेनं आणि आयत्या हव्या असतात. भव्य यश असं आयतं कधीच मिळत नाही. एक श्लोक आठवला म्हणून सांगतो.
उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः।
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविश्यन्ति मुखे मृगाः।

भावार्थ : कोणतंही कार्य हे केवळ मनात इच्छा धरून साध्य होत नाही. त्यासाठी उद्यम म्हणजेच योग्य प्रकारचे प्रयत्न करावे लागतात. सिंह जरी जंगलाचा राजा असला तरी कोणतंही हरिण स्वतःहून त्याच्या तोंडात प्रवेश करीत नाही. त्याला देखील शिकारीसाठी धावावेच लागते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -