Friday, May 10, 2024
Homeमहामुंबईआता योग आला आहे; मुख्यमंत्री शिंदे यांचे सूचक वक्तव्य

आता योग आला आहे; मुख्यमंत्री शिंदे यांचे सूचक वक्तव्य

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शिवाजी पार्कावर गेले १० वर्षे हा दीपोत्सवाचा कार्यक्रम होत आहे. परंतु मनात इच्छा असूनही येता येत नव्हते. आता योग आला आहे, असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी संध्याकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच तीनही पक्षांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. दीपोत्सवाचा हा कार्यक्रम संध्याकाळी साडेसहा वाजता सुरू होणार होता. मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस, दोघेही वेळेवर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. तेथे या तीनही नेत्यांमध्ये सुमारे १५ मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर हे तीनही नेते पायी समारंभाच्या ठिकाणी आले. तेथे सुवासिनींकडून त्यांचे औक्षण करण्यात आले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी दीपोत्सवाचे उद्घाटन केले. शिवाजीपार्क ते कॅडल रोडपर्यंत करण्यात आलेला रोषणाईचा हा दीपोत्सव तुलसी विवाहापर्यंत चालणार आहे.

राज ठाकरे यांच्या प्रस्तावनेनंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दीपोत्सवाच्या निमित्ताने सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या. दीपोत्सवातल्या लख्ख प्रकाशाने सर्व जनतेचे आयुष्य उजळून निघावे, असे ते म्हणाले.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छोटेखानी भाषण झाले. गेल्या दोन वर्षांनंतर यंदा आपण निर्बंधमुक्त सण साजरे करत आहोत. गणपती साजरा झाला. नवरात्र साजरी झाली. आता दिवाळी साजरी होत आहे. गेल्या दहा वर्षांपासून येथे दीपोत्सव साजरा होत आहे. परंतु मनात इच्छा असूनही येथे येता येत नव्हते. परंतु आता तो योग आला आहे, असे ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -