Saturday, April 27, 2024
Homeताज्या घडामोडीमुंबईत स्नो फॉल नसून पावडर-फॉल्ट

मुंबईत स्नो फॉल नसून पावडर-फॉल्ट

मुंबई : मुंबईत (Mumbai) गारवा जाणवू लागला आहे. अशातच शनिवारी रात्री चेंबूरमधील (Chembur) काही लोकांना स्नो-फॉल (Snow fall) सारखा भास होईल, अशा प्रकारचा अनुभव आला. पण हा स्नो फॉल नसून पावडर-फॉल्ट असल्याचे अखेर समोर आले. यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. दरम्यान, पावडर (Powder) सदृश्य पावसाचे घटक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असल्याचेही पोलिसांनी (Mumbai Police) सांगितले.

चेंबूरच्या वाशीनाका येथील गव्हाणगावात एचपीसीएलच्या प्लांटमधून शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणात कॅटालिस्ट पावडरची गळती झाली. त्यामुळे पूर्ण गावात पांढऱ्या रंगाची पावडर पसरली आहे. विशेष म्हणजे शनिवारी दत्त जयंतीनिमित्त भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यादरम्यान ही पांढऱ्या रंगाची पावडरही भाविकांच्या जेवणात गेली. त्यामुळे इथल्या नागरिकांची एकच घाबरगुंडी उडाली होती. पावडरमुळे शरीरास धोका निर्माण होईल, अशी भीती नागरिकांमध्ये पसरली होती. गव्हाणगावातील रिक्षा, गाड्या आणि दुचाक्यांवरही बर्फासारखा वाटावा असा एक पांढरा थर तयार झाला होता. पण हा बर्फाचा थर नसून पावडर असल्याचं नंतर समोर आलं.

दरम्यान, भयभीत झालेल्या लोकांनी लगेचच पोलिसांना याबाबत कळवलं. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलीस प्रशासन, फायर ब्रिगेड, स्थानिक नगरसेवक, पालिका प्रशासनाची माणसं तत्काळ दाखल झाली. त्यांनी या सगळ्याची प्राथमिक पाहणी करुन नेमकं असं कशामुळे झालंय, याचा शोध घेतला. तेव्हा एचपीसीएलच्या एका प्लांटमधून कॅटालिस्ट पावडरची गळती झाल्यानं हा प्रकार घडल्याचं समोर आलं. दरम्यान, ही पावडर विषारी नसल्याची प्राथमिक माहितीही पोलिसांनी दिली. तरिही खबरदारी म्हणून या पावडरची चाचणी केली जाईल, असंही पोलिसांनी म्हटलंय. तसंच गळतीबाबत जर हलगर्जीपणा झाला असेल, तर त्यासाठी जबाबदार असलेल्यांवर कायदेशीवर कारवाई केली जाईल, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. तर दुसरीकडे कंपनीनं झाल्या प्रकाराबाबत माफी मागावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -