Saturday, May 11, 2024
Homeअध्यात्मनाम घेताना मनात पाहिजे एक परमेश्वरच

नाम घेताना मनात पाहिजे एक परमेश्वरच

 ब्रह्मचैतन्य श्री गाेंदवलेकर महाराज

खरोखर, भगवंताला आपल्या प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही. ते प्रेम आतून यायला पाहिजे; परंतु परमेश्वराबद्दल खरे प्रेम उत्पन्न होत नाही, असा आपला अनुभव आहे. परमेश्वराला प्रेमाने हाक मारताच येत नाही आपल्याला. मग ती ऐकू कशी जाणार? सहवासाने प्रेम वाढते. आगगाडीच्या चार तासांच्या सहवासाने जर प्रेम उत्पन्न होते, तर नामस्मरणाने प्रेम का उत्पन्न होत नाही? देहाशी अनंत जन्मांचा सहवास असतो, म्हणून देहावर प्रेम जडून देहबुद्धी येते. नामाचा सहवासही पुष्कळ म्हणजे सतत करावा, म्हणजे विषयावरची आणि देहाची आसक्ती कमी होऊन नामावर प्रेम जडते. बायका-मुलांच्या प्रेमाकरिता आपण केवढा त्याग करतो! मग परमेश्वराच्या शाश्वत सुखाकरिता क्षुद्र वासनांचा त्याग आपण का करू नये? नाम घेत असताना मनात एक परमेश्वरच पाहिजे; दुसरी कोणतीच वृत्ती उठता कामा नये; तेच खरे नामस्मरण. विकार हे काही मुळात टाकाऊ नाहीत. ते भगवंतानेच दिले आहेत, म्हणून त्यांना जीवनात योग्य स्थान असेलच असेल. किंबहुना, व्यवहारामध्ये विकारांची जरूरी आहे. मात्र विकारांना आपण सत्ता गाजवून वापरायला शिकले पाहिजे, विकारांनी आपल्यावर सत्ता गाजविता कामा नये.

समजा, राजगिरा आणि भुईमुगाचे दाणे मिसळले आहेत; ते वेगळे करायचे असतील, तर त्यातले एक काढले की, दुसरे आपोआप शिल्लक राहते. शिवाय, त्यामध्ये बाहेर काढायला जे सोपे आहे, ते आपण काढतो. त्याप्रमाणे, घ्यायला सोपे असलेले भगवंताचे नाम आपण घेत गेल्याने विषय आपोआप बाजूला पडेल. दाणे निवडून काढताना थोडासा राजगिरा जरी लागला तरी आपण तो झाडून टाकतो. त्याप्रमाणे, भगवंताचे अनुसंधानामध्ये नको असला, तरी थोडा विषय येणारच. पण तो हवेपणाने भोगला नाही, तर तो आपल्याला बाधक होणार नाही. सर्व संतांचे सांगणे एकच आहे आणि ते असे की, “तू भगवंताचे अनुसंधान म्हणजे स्मरण ठेव, त्याने तुला सत्याचे ज्ञान होईल.” भगवंताचे अनुसंधान याचा अर्थ असा की, बाकीच्या गोष्टींमध्ये दुर्लक्ष झाले तरी चालेल, पण परमात्म्याचे विस्मरण होता कामा नये. भगवंताचे अनुसंधान कोण कसे ठेवील याचा नेम नाही. कोणी पूजा करून ते ठेवील, तर कोणी भजन करून ते ठेवील, कोणी नामस्मरण करून ठेवील, कोणी मानसपूजा करून ठेवील, तर कोणी चित्रकलेमध्ये सुद्धा ठेवील. भगवंताचे अनुसंधान हे आपले ध्येय ठेवावे आणि त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करू या. कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचे अखंड अनुसंधान हेच सर्व पोथ्यांचे सार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -