Thursday, May 2, 2024
Homeकोकणरायगडमाथेरानमध्ये पर्यटकांची दिशाभूल

माथेरानमध्ये पर्यटकांची दिशाभूल

नकार देताच पर्यटकांना दाखवला जातो चुकीचा रस्ता

हॉटेल, लॉजिंग दलाल, कुलींचा पर्यटकांना गराडा

नेरळ (वार्ताहर) : प्रदूषणमुक्त पर्यटनस्थळ अशी बिरुदावली असलेल्या माथेरान शहरात दिवसेंदिवस पर्यटकांची दिशाभूल वाढत आहे. याप्रकरणी स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याची खंत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. मुंबई-पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माथेरानमध्ये वर्षाकाठी लाखो पर्यटक भेट देतात. प्रदूषणमुक्त, वाहनमुक्त अशा पर्यटनस्थळाला पर्यटक पहिली पसंती देतात. सध्या शाळेला सुट्टया पडल्यानंतर माथेरानचा उन्हाळी पर्यटन हंगाम सुरू झाला खरा मात्र पर्यटकांची संख्या रोडावली आहे.

माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी येथे पर्यटकांची दिशाभूल केली जात आहे. काही घोडेवाले, हॉटेल व लॉजिंग दलाल, कुली हे वाहन येत नाही तोच घाटातून गाडीमागे पळतात. परिणामी लूट करण्यासाठी हे धावतात का? या विचाराने पर्यटक घाबरतात. गाडीतून उतरताच गाडीला गराडा घालून वाहनतळातच जाहिरात करायला सुरुवात करतात. पर्यटकाने नकार देताच त्यांना चुकीचा रस्ता दाखवतात. प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. माथेरानबाहेरील काही लोक माथेरानला विनाकारण बदनाम करताना दिसतात. माथेरानच्या पर्यटनाच्या दृष्टीने हे घातक आहे, असेही स्थानिकांचे म्हणणे आहे.

नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनीसुद्धा घोड्यावाल्यांच्या मुजोरीबद्दल संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे दस्तुरी या ठिकाणी प्रीपेड सेवा सुरू करणे महत्वाचे आहे. ही सेवा सुरू करण्याआधी पोलीस प्रशासनासोबत चर्चा करणार आहोत. पालिका प्रशासनाकडून येथील सर्व तयारी पूर्ण झाली आहे. चर्चेनंतर संयुक्त निर्णय घेऊन पुढील कारवाई करू, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. दस्तुरी येथे बाहेरून येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांची होणारी दिशाभूल कमी करण्यासाठी पोलीस, नगरपालिकेने संयुक्तपणे नियोजन करण्याची गरज आहे. तेथील वाहनतळामधून घोडेवाले, रिक्षावाले, कुली आणि हॉटेल व लॉजचे दलाल यांना बाहेर काढले नाही, तर दिशाभूल मोठ्या प्रमाणात फोफावेल.

पोलीस प्रशासन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. पोलीस दररोज दस्तुरी येथे गस्तीसाठी असतात. पण तिथे फक्त पोलिसांकडून बघ्याची भूमिका घेतली जाते. त्यामुळे दस्तुरी येथे कायदा व सुव्यवस्था राहिली नाही. त्यामुळे माथेरानचे पर्यटन वाचविण्यासाठी माथेरान पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन यांनी संयुक्त कारवाई करण्याची गरज आहे. – अजय सावंत, माजी नगराध्यक्ष

नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई

पर्यटकांना घोडा हवा असल्यास त्यासाठी दस्तुरी नाका येथे प्रीपेड टॅक्सी सेवा सुरू करण्याबाबत नियोजन केले जात आहे. पोलीस, वन, महसूल विभाग यांच्या संयुक्त बैठकीत पोलीस उपअधीक्षक विजय लगारे, प्रशासक सुरेखा भणगे, सहायक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे, वनाधिकारी उमेश जंगम, अश्वपाल संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत घोडेवाल्यांच्या समस्या सोडवल्या जातील आणि आवश्यक ठिकाणी अश्वपाल यांच्या मागणीनुसार घोडा स्टॅण्ड बनविले जातील. मात्र आठ दिवसांत प्रीपेड सेवा सुरू झाल्यानंतर कोणताही अश्वपालने योजनेचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाईचे निर्देश मुख्याधिकारी आणि प्रशासक भणगे यांनी दिले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -