Monday, May 6, 2024
Homeताज्या घडामोडीमतदारांमध्ये उत्साहाचा अभाव

मतदारांमध्ये उत्साहाचा अभाव

दीपक मोहिते

पालघर : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तलासरी, विक्रमगड व मोखाडा या तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले आहे. या तिन्ही नगरपंचायतींच्या निवडणुका येत्या २१ डिसेंबर रोजी होत आहेत. या निवडणुकांसाठी प्रचाराची धामधूम मंगळवारपासून सुरू झाली असून उमेदवारांना प्रचारासाठी केवळ ५ दिवस मिळाले आहेत.

मोखाडा येथे सध्या शिवसेनेची सत्ता असून ती हिसकावून घेण्यासाठी राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी (बविआ) व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हे तिघे एकत्र आले आहेत. राज्यस्तरावर सेनेसह हे तीन पक्ष महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष असूनही या निवडणुकीत सेनेला पराभूत करण्यासाठी एकवटले आहेत. दुसरीकडे, भाजप व जिजाऊ संघटनेनेही सेनेसमोर आव्हान उभे केले आहे. येथील राजकीय वातावरण लक्षात घेता सेना व भाजप / जिजाऊ या दोघांमध्ये सरळ लढत होण्याची शक्यता आहे.

गेल्या पाच वर्षांत नगरपंचायत क्षेत्रात विकासकामांना गती मिळू शकली नाही. त्याचा फटका सत्ताधारी सेनेला बसू शकतो. एकूण ६५ उमेदवार रिंगणात आहेत. प्रचारात विरोधीपक्षाचे उमेदवार सत्ताधारी पक्षाच्या अपयशावर भर देत आहेत. आजही हा परिसर विकासाच्या बाबतीत मागसलेलाच आहे. आरोग्य, स्वच्छता व नागरी सोयी-सुविधांपासून नागरिक वंचित आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये या निवडणुकीसंदर्भात फारसा उत्साह दिसून येत नाही. मतदानाची टक्केवारी घसरल्यास त्याचा फायदा सेनेला होऊ शकतो.

तलासरी येथे ७२ उमेदवार रिंगणात आहेत सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून सत्ता हस्तगत करण्यासाठी इतर पक्ष प्रयत्नशील असले तरी खरी लढत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व भाजपमध्ये होईल. आजवर झालेल्या अनेक लढतींमध्ये हे दोन्ही पक्ष कायम एकमेकांसमोर उभे ठाकले. पण प्रत्येक वेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने बाजी मारली आहे. या भागात काँग्रेस, सेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व नगण्य आहे. त्यामुळे भाजप-मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या दोघांमध्ये सरळ सरळ लढत होईल.

गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून भरीव विकासकामे झाली नाहीत. वाढते नागरीकरण, नागरी सुविधांचा अभाव व लोकप्रतिनिधींची उदासीनता अशा कारणांमुळे मतदानावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरोग्य, साफसफाई, रोडलाईट्स व डंपिंग ग्राऊंड असे ज्वलंत प्रश्न आजही ‘जैसे थे’ स्थितीत आहेत.

विक्रमगड नगरपंचायत क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत लोकसंख्येच्या वाढीला प्रचंड वेग आला आहे. पूर्वी ग्रामपंचायत काळात निधी अभावी अपेक्षित विकासकामे होऊ शकली नाहीत. पण पाच वर्षांपूर्वी नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर पुरेसा आर्थिक निधी मिळूनही विकासकामे करण्यात आली नाहीत. रस्त्याची दुरवस्था, वाहतूककोंडी, रस्त्यालगत दोन्ही बाजूंना भरणारा बाजार, रस्तेसफाई अशा समस्या विक्रमगडवासीयांच्या पाचवीला पूजल्या आहेत. त्यामुळे पूर्वी होती ती ग्रामपंचायत बरी होती, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

एकूण ७८ उमेदवार आजमावत आहेत नशीब

या निवडणुकीत एकूण ७८ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. काही प्रभागांतील उमेदवार तांत्रिक कारणावरून अपिलात गेले आहेत. येथे जिजाऊ संघटना सर्वाधिक जागा जिंकण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली आहे. वरवर युती झाली असली तरी स्थानिक नेत्यांची मने मात्र जुळलेली नाहीत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -