Sunday, April 28, 2024
Homeताज्या घडामोडीमराठा आरक्षणाबाबत मुंबईत आज महत्त्वाची बैठक

मराठा आरक्षणाबाबत मुंबईत आज महत्त्वाची बैठक

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत मुंबईत आज संध्याकाळी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. यापूर्वी १४ ऑगस्ट २०२२ रोजी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे या बैठकीसाठी मुंबईत येत असताना त्यांचे अपघाती निधन झाले. मेटेंच्या मृत्यू नंतर ही बैठक रद्द करण्यात आली होती. आज पुन्हा या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

आज मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक बोलवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले, मराठा क्रांती मोर्चा पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १२ संघटना आणि ५० मराठा समन्वयकांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. मराठा मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्षपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्याचा मोठा निर्णय या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे. या आधी अशोक चव्हाणांकडे हे अध्यक्षपद होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे.

ओबीसींपाठोपाठ मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नव्या शिंदे-फडणवीस सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरू आहे. सुरूवातीला नारायण राणे यांच्या नेतृत्वात हा लढा उभारला गेला. त्यानंतर भाजप सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण दिले गेले. मात्र हे आरक्षण कोर्टात टिकले नाही. त्यानंतर सुप्रीम कोर्टातला संघर्ष सुरू झाला. मात्र गेले अनेक वर्षे प्रयत्न करूनही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सरकारला अपयश आले आहे. मात्र आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघताना दिसत असताना मराठा समाजालाही आरक्षण मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -