Sunday, May 12, 2024
Homeताज्या घडामोडीदिल्लीत आपचे ४० आमदार बेपत्ता!

दिल्लीत आपचे ४० आमदार बेपत्ता!

नवी दिल्ली : दिल्लीतील ऑपरेशन लोटसवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर आम आदमी पक्षाने (आप) गुरुवारी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे, मात्र बैठकीपूर्वी पक्षाचा अनेक आमदारांशी संपर्क होऊ शकलेला नाही.

आपचे आमदार दिलीप पांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, काल संध्याकाळपासून काही आमदारांशी संपर्क होऊ शकला नाही. आम्ही सतत बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. लवकरच सर्व आमदार बैठकीला पोहोचतील. आमचे ४० आमदार फोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

आम आदमी पक्षाने (आप) बुधवारी पत्रकार परिषद घेतली. आपचे नेते संजय सिंह म्हणाले की, आम्ही ऑपरेशन लोटसबाबत खुलासा केला. ते म्हणाले की, भाजपने आमच्या आमदारांना ऑफर दिली. ‘आप’ सोडल्यास २० कोटी आणि इतरांना सोबत आणले तर २५ कोटी देऊ, अशी ऑफर होती.

संजय सिंह म्हणाले, आमचे आमदार संजीव झा, सोमनाथ भारती, कुलदीप कुमार आणि आणखी एका आमदाराला भाजपने पक्ष सोडण्याच्या बदल्यात २० कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. संजय सिंह यांच्यासोबत सोमनाथ भारतीही पत्रकार परिषदेत होते. ते म्हणाले की, भाजपच्या लोकांनी मला सांगितले की ‘आप’चे आणखी २० आमदार आमच्या संपर्कात आहेत.

सीबीआयने उत्पादन शुल्क धोरणाबाबत दिल्लीत पहिल्यांदाच १९ ऑगस्ट रोजी मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकला. हा छापा सुमारे १४ तास चालला, त्यानंतर सीबीआयने याप्रकरणी पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. तेव्हापासून आप केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजपच्या विरोधात आवाज उठवत आहे. छापेमारीनंतर सिसोदिया म्हणाले होते की, भाजपने त्यांना ‘आप’ सोडण्याची आणि मुख्यमंत्री होण्याची ऑफर दिली होती.

दुसरीकडे भाजपने प्रत्युत्तरात म्हटले आहे की, भ्रष्टाचाराचे आरोप टाळण्यासाठी आम आदमी पार्टी खोटेपणाचे वातावरण तयार करत आहे. मनीष सिसोदिया यांना उत्तर द्यावे लागेल, असे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी बुधवारी सांगितले होते.

७० जागांच्या दिल्ली विधानसभेत ‘आप’ला ६२ आणि भाजपला ८ जागा आहेत. सरकार स्थापनेसाठी ३६ आमदारांची गरज आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -