Saturday, April 27, 2024
Homeदेशओमायक्रॉनला रोखायचे असेल, तर पावले उचला

ओमायक्रॉनला रोखायचे असेल, तर पावले उचला

डब्ल्यूएचओ संचालकांचा गंभीर इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमायक्रॉनला रोखायचे असेल, तर अजून रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याआधी पावले उचलायला हवीत, असे सांगत (डब्ल्यूएचओ) जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक डॉ. टेड्रॉस यांनीच ओमायक्रॉन व्हेरिएंटविषयी जगातील सर्व देशांना गंभीर इशारा दिला आहे.

जगभरात ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची भीती पसरू लागली आहे. एकीकडे काही शास्त्रज्ञ ओमायक्रॉन आधीच्या व्हेरिएंटइतका घातक नसल्याचे सूत्र मांडत आहेत, तर दुसरीकडे काहीजण अधिक काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत, पण या सर्वांनीच ओमायक्रॉनबाबत अधिक सखोल संशोधन होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर आता “ओमायक्रॉनला रोखायचे असेल, तर हीच योग्य वेळ आहे”, अशा शब्दांत डॉ. टेड्रॉस यांनी जगाला सतर्क केले आहे.

“जागतिक पातळीवर ओमायक्रॉन व्हेरिएंट ज्या वेगाने पसरतोय, ते पाहता त्याचा एकूणच कोरोनाच्या साथीबाबत मोठा परिणाम जाणवू शकतो हे दिसून येत आहे. त्यामुळे ओमायक्रॉनला रोखायचे असेल, तर अजून रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याआधी पावले उचलायला हवीत.”, असे टेड्रॉस यांनी म्हटले आहे.

आर काऊंटमुळे वाढली चिंता

कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव देशात झाला असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा ‘आर काऊंट’ १च्या अगदी जवळ पोहोचला आहे. ही बाब चिंता वाढविणारी आहे. मुंबई-पुणे-ठाण्यात, तर हा काऊंट १पेक्षा पुढे गेला आहे. आर व्हॅल्यू किंवा आर काउंट हा कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने संक्रमित झालेल्या लोकांची संख्या सांगते. देशात महामारी संपण्यासाठी आर काउंट १ पेक्षा कमी असला पाहिजे.

ओमायक्रॉनची भीती? लसीकरणात १६ टक्क्यांनी वाढ

जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉनच्या भीतीमुळे नागरिक लसीकरण केंद्रात जाऊन लस घेत आहेत. ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होतो, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली असली तरी त्याबद्दल अद्याप संशोधन सुरू आहे, मात्र ओमायक्रॉनबद्दल विविध बातम्या येऊ लागल्या तेव्हापासून देशात लसीकरणात वाढ झाली आहे. लसीकरण डेटावर नजर टाकल्यास असे दिसून येते की, गेल्या १३ दिवसांत त्याच्या मागच्या १३ दिवसांच्या तुलनेत दुसऱ्या डोसच्या वापरामध्ये जवळपास १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. १२-२४ नोव्हेंबरदरम्यान ८,५४,८७,७६९ वरून २५ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरदरम्यान ९,९५,५४,१९२ पर्यंत वाढली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -