Saturday, April 27, 2024
Homeसाप्ताहिककोलाजHindu Culture : हिंदू संस्कृती आणि प्रकृती

Hindu Culture : हिंदू संस्कृती आणि प्रकृती

  • निसर्गवेद : डॉ. महालक्ष्मी वानखेडकर

प्राचीन काळात दिवाळीमध्ये आपण पणत्या लावत असू, होमहवन करत असू. त्यामुळे वातावरणात ऊबदारपणा येण्यास मदत होत असे. विशिष्ट देवाची विशिष्ट दिवशीच पूजा करण्याचे उद्देश हे त्या ऋतूत होणाऱ्या आजारांपासून आपल्याला दूर ठेवत. खरं तर हे सर्व सण म्हणजे आपल्यावर होणारी एक उपचारात्मक पद्धती आहे जी मानवाला कधीच समजली नाही.

भारतीय संस्कृती आणि प्रकृती हा विषय खूपच गूढ, गहन आणि अध्ययनाचा आहे. खरंच कधी कधी आश्चर्य या गोष्टीच वाटतं की, पुरातन काळात या ऋषीमुनींनी किती विचारपूर्वक सर्व घटकांचा विचार करून या सणांची निर्मिती केलेली आहे. आपण गेल्या लेखात निसर्गाशी संबंधित असणाऱ्या संस्कारांबद्दल, सणांबद्दल थोडीशी माहिती घेतली होती. दिवाळीतच आपण तेलकट, तुपकट फराळ खात असतो, कारण त्या ऋतूमध्ये आपल्या शरीराला स्निग्धतेची, उष्णतेची आवश्यकता असते. म्हणून आपल्याला ते जड पदार्थ शरीरात उष्णता निर्माण करून पचवता येण्याची ताकद तेव्हा असते. प्राचीन काळात दिवाळीमध्ये आपण पणत्या लावत असू, होमहवन करत असू, त्यामुळे वातावरणात उबदारपणा येण्यास मदत होत असे.

विशिष्ट देवाची विशिष्ट दिवशीच पूजा करण्याचे उद्देश हे त्या ऋतूत होणाऱ्या आजारांपासून आपल्याला दूर ठेवत. कारण यावेळी होणाऱ्या प्रार्थना पूजा, मंत्रोच्चार यामुळे आपल्या शरीरात नाडीचक्र सशक्त होऊन आपल्याला आरोग्यवंत ठेवीत असत. प्रत्येक मंत्र हा शरीरातील नाडीचक्र उद्दीपित करतात. आपल्या शरीरात असणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर करून ऑक्सिजन लेव्हल वाढवून आपल्याला रक्तदाब, मधुमेह अशा अनेक आजारांपासून मुक्त करतात. खरं तर हे सर्व सण म्हणजे आपल्यावर होणारी एक उपचारात्मक पद्धती आहे जी मानवाला कधीच समजली नाही.

मानवाच्या स्वभावामुळे त्याच्यावर संस्कार केले जाऊन ही संस्कृती टिकावी म्हणून आणि या पर्यावरणाचे संतुलन व्हावे म्हणून कळत-नकळतपणे या सृष्टी सौंदर्याच्या संवर्धनासाठी, मानवाची विध्वंसक वृत्ती तात्पुरती का होईना थांबवून त्याला याच्यात समाविष्ट केले गेले. आपली भारतीय संस्कृती ही अत्यंत उच्च प्रतीची आहे. त्यात आलेले सण आणि उत्सव हे आपल्या भल्यासाठीच आहेत. त्यामुळे सर्वांनी आवर्जून सर्व उत्सव पारंपरिक पद्धतीनेच साजरे करावे. या उत्सवांचा उद्देश फक्त सर्व मानवांनी एकत्र येऊन आनंद साजरा करणे एवढाच नाही तर त्याच्याबरोबर या पर्यावरणाचे संतुलन व्हावे हासुद्धा आहे. मुख्य म्हणजे या सण, उत्सवाच्या निमित्ताने एक गोष्ट लक्षात येते की, आपण सण साजरे करताना आपले पूर्णपणे मानसिक आणि शारीरिक शुद्धीकरण होत असते आणि हाच मूळ उद्देश या सणांमध्ये आहे. कारण जर मानसिक आणि शारीरिक शुद्धीकरण असेल, तरच मानवाची विध्वंसक वृत्ती थांबू शकते. हेच मर्म आपल्या विद्वान ऋषीमुनींना माहीत होते. त्याच्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांपैकी हा एक. पण सध्याच्या काळात मुलांना गीता, महापुराण, श्लोक किंवा मंत्र काहीच माहीत नाही. याचे मूळ कारण कोण? पालक आणि सामाजिक घटक, की सर्व प्रगती प्रकल्प. भारतीय संस्कृती आणि संस्कार एवढे उच्च कोटीचे असताना आपण इतर संस्कृतीचे अनुकरण का करतो? कधी विचार केलाय का की, आज आपण हेच सर्व सण आपल्या परंपरेनुसार साजरे करतो का? सर्व प्रकारचे प्रदूषण आपण किती वाढवतो. सण म्हणजे प्रदूषण, इतरांना होणारा मानसिक त्रास, पशुपक्ष्यांची होणारी कुचंबना, पर्यावरणाची होणारी हानी एवढीच व्याख्या राहिली आहे. परंपरेनुसार सण साजरे करण्यामागे अजून एक मूळ उद्देश होता की, पर्यावरणाचे संतुलन टिकून राहावे म्हणजे काय? प्रत्येक सण हा त्या त्या ऋतूनुसारच येणार; परंतु आज मानवाच्या विध्वंसक प्रवृत्तीमुळे याची दिशासुद्धा बदलली गेली आहे. कालांतराने हे सगळे सण विस्कटले जातील. त्याची सुरुवात झालीच आहे. मूळ ऋतूत येणारे सण कोणत्याही ऋतूत येतील. मग तुमच्या शरीर शास्त्रानुसार होणाऱ्या परिणामाला तयार राहा.

निसर्गच माझा धर्म आणि कर्म आहे हे जेव्हा मानवाला समजेल, तेव्हाच हे पंचतत्त्व संतुलन आपोआपच होईल. जेव्हा तुम्ही या निसर्गाला, पंचतत्त्वाला गुरू म्हणाल तेव्हाच या निसर्गाचे संवर्धन आणि संरक्षण होईल. परमेश्वराचे प्रत्येक रूप हे या निसर्गातच दडलेले आहे. हे तुम्हाला सुद्धा समजेल. परमेश्वर चराचरात आहे याचाच अर्थ परमेश्वर निसर्गातील प्रत्येक घटकात आहे. यजुर्वेदात या सर्वांचा उल्लेख केलाच आहे. या विश्वातील प्रत्येक जीवसृष्टीचा या स्थूलरूपी शरीराचा श्वास म्हणजे जीवन. हे पूर्णपणे या निसर्गावरच अवलंबून आहे आणि त्यामुळेच या प्रत्येक घटकासाठी सणांची झालेली ही निर्मिती या निसर्गाशीच गुंफलेली आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक सण हा निसर्गाशी निगडित आहे. वैज्ञानिक, अध्यात्मिकदृष्ट्या फक्त आपल्या हृदयापर्यंत नकळतपणे पोहोचण्यासाठी असणारे हे सण. निसर्गातील होणारे बदल त्यानुसार मानवावर होणारा त्याचा परिणाम याच्या अानुषंगाने पूर्णपणे ही सणांची निर्मिती गहण संशोधनानंतर करण्यात आली आहे.

मुळातच भारतात सण, उत्सव जास्त आहेत त्याचे कारण समाजाची सुदृढता आणि निसर्गाशी जवळीक करणे. आपोआपच पर्यावरणाचे संतुलन होण्यासारखे होते. मानवाला आनंदी वातावरण आवडत असल्यामुळे कुठेतरी त्याची आनंदाची योग्य दिशा त्याला या सणांमधून मिळते. सणांच्या निमित्ताने एकत्रित आल्यामुळे मानसिक आणि शारीरिक शक्ती वाढते; परंतु आज काळ बदलला आहे की आपण बदलवला आहे? आपल्या विचारांची दिशा आपण पूर्णपणे बदलली आहे. सणांमध्ये खूप जोर जोरात ढोल- ताशे- बँड वाजविणे म्हणजे आनंद साजरा करण्यासारखे आहे. बरं हे वाजवण्याच्या वेळासुद्धा रात्री बारा किंवा रात्रभर असतात. कधी या ध्वनिप्रदूषणामुळे निसर्गाची हानी काय होते याचा विचार केलाय का? बरं आपल्या भारतामध्ये सततच काही ना काही सण, उत्सव होत असतात. यामध्ये आपण किती पर्यावरणाची हानी करतो याचा विचार केलाय का? निसर्ग नियमानुसार सात वाजता झोपणाऱ्या या पक्ष्यांनी जायचं कुठे? या ध्वनिप्रदूषणामुळे आबाल वृद्धांना किती त्रास होत असेल याचा कधी विचार केला का? ध्वनिप्रदूषण, वायू प्रदूषण आणि जलप्रदूषण हे या सणांमध्ये अतिशय प्रचंड प्रमाणात होते. परिणामी आपल्याला अनेक आजार होत आहेत. मग हे सांगा सण साजरे करण्याचा उद्देश सफल होतोय का? या सर्वांचा विचार आपण करायला पाहिजे. आपल्या पूर्वजांनी आखून रेखून दिलेल्या संयोजनाप्रमाणेच आपल्याला सण साजरे करावयास हवे. खरं तर माईक, बॅन्जो, लाइटिंग अशा प्रदूषणाची गरजच नाहीये. त्यापेक्षा का नाही होम हवन करून मंत्रोच्चार करत? मंदिरात होणारा घंटानाद, आरती करताना होणाऱ्या टाळ, मृदंगाचा आवाज हा नेहमीच आल्हाददायक असतो आणि मानवावर उपचारात्मक करवून सकारात्मकता आणतो. मंदिरात वाजणाऱ्या घंटा या आजूबाजूला असणाऱ्या उपद्रवी जीवजंतूंचा नाश करतात. वातावरणात शुद्धता आणतात. या सर्वांचा कधी विचार केलाय का? प्राचीन काळातील सण साजरा करण्याच्या पद्धती आणि आताच्या पद्धती यात जमीन-आसमानाचा फरक आहे याची जाणीव होते का आपल्याला?

बैलपोळा, नागपंचमी, वटपौर्णिमा गणेशोत्सव, दिवाळी यांसारख्या अनेक सणांमध्ये निसर्गाच्या घटकांचा सतत समावेश दिसतो. आपला बैल पोळा म्हणजे फक्त बैलांना आराम देणे असं नाही तर त्यांनी आपल्यासाठी केलेले कष्ट त्याची पूजा करून आभार मानण्यासाठी आहे. आपल्याकडे प्रत्येक सणांच्या मागे सजीव सृष्टीतील प्रत्येक घटकाचे आभार मानून, कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी वेळोवेळी केलेली आठवण म्हणजेच ही सणांची निर्मिती. याचा उल्लेख आपल्याला वेदांमध्ये मिळतो.

परमेश्वररूपी नद्या, पर्वत, पशुपक्षी यांचा पुराणांमध्ये असलेला सहभाग, कोणती फुल कुठल्या देवीला, कुठल्या परमेश्वराला आवडते, कोणता प्रसाद देवांना आवडतो, कोणते मंत्र कोणत्या परमेश्वरासाठी योग्य आहेत, कोणत्या वृक्षांमध्ये कोणता परमेश्वर आहे, कोणते फळ कोणत्या देवाला आवडते, कुठल्या परमेश्वराची पूजा कुठल्या ऋतूत करावी अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत या सर्व गोष्टी निसर्गाशी कशा निगडित आहेत हे सर्व आपल्या संस्कृती आणि संस्कारांमध्ये आहे. तर चला आता आपण निर्धार करूया की, आपण आपले सर्व सण आपल्या ऋषीमुनींनी दिलेल्या संयोजनानुसारच, परंपरेनुसारच, आपल्या संस्कार आणि संस्कृतीनुसारच साजरे करूया. जेणेकरून आपणही सुदृढ होऊ आणि हा निसर्ग, ही पंचतत्त्वसुद्धा सुदृढ होतील.

dr.mahalaxmiwankhedkar @gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -