Monday, May 6, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सछे, हसून गेलो गाव

छे, हसून गेलो गाव

नंदकुमार पाटील : कर्टन प्लीज

कोकणातल्या माणसांनी पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून शेती आणि मासेमारी या दोन गोष्टींना जास्त प्राधान्य दिले आहे. फावल्या वेळेत काय करायचे तर निव्वळ आनंद देणाऱ्या लोककला, नाटकाला त्यांनी स्वीकारले आहे. जत्रा, उत्सव म्हटला की, ही नाट्यवेडी कोकणी कलाकार एकत्र येतात. नाटकाच्या कथेला भूमिकेची काय गरज आहे. याहीपेक्षा गावकऱ्यांच्या समोर आपण कसे ठसठशीत दिसू, याकडे प्रत्येक कलाकाराचा कल असतो. रंगभूषा, वेशभूषा आणि उत्स्फूर्त संवाद सारे काही अकलनीय असते. विशेषत: त्याची पूर्वतयारी हीच मुळात मनोरंजन करणारी असते. गंगाराम गव्हाणकर हेच मुळात कोकणातले असल्यामुळे त्यांनाही सारी कसरत जवळून पाहता आली आहे. ते स्वतः नाटककार असल्यामुळे त्यांनीही सर्व नमुनेदार माणसे प्रथम हेरली आणि त्यातून ‘वस्त्रहरण’ हे नाटक जन्माला आले. कामगार स्पर्धेत ते सादर झाले, त्यांचे कौतुक झाले पण मराठी रंगभूमीवर विक्रमी प्रयोगाची थेट झेप घेईल असे कोणालाही वाटले नव्हते. ज्या नाटकांना प्रेक्षक गर्दी करतात तसे काहीसे दुसरे नाटक प्रेक्षकांना हवे असते. मालवणी नाटकांची लाट आली तेव्हा अनेकांनी तसा पौराणिक पात्र घेऊन प्रेक्षक मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पण कोणालाही त्यात सातत्य टिकवता आले नाही. परिणामी मालवणी नाटकाची लाट ओसरली. निर्माते प्रसाद कांबळी वेळ, काळ लक्षात घेऊन वस्त्रहरणचे प्रयोग करीत असतात.

संतोष पवार नवनवीन संकल्पना लढवून रंगमंचावर सातत्याने काही ना काहीतरी करण्याचा ध्यास घेत असतात. तरी पण प्रेक्षक शंभर टक्के मनोरंजनाची हमी देणाऱ्या नाटकाच्या शोधात असतात. टेन्शन फ्री, निव्वळ करमणूक, अभिनय आणि तांत्रिकदृष्ट्या दर्जा सांभाळणारी नाटके हवी असतात. सध्या तरी ही गुणवत्ता ‘करून गेलो गाव’ या धमाल विनोदी नाटकात पाहायला मिळते. एक तर स्वतः महेश वामन मांजरेकर यांनी या नाटकाची निर्मिती केलेली आहे. तडजोड हा शब्द त्यांच्या डायरीत नाही. नाटकात दोन नामवंत कलाकार आहेत म्हटल्यानंतर प्रेक्षक मिळवण्यासाठी हे पुरेसे असते म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे त्यांना माहीत नाही. लेखक, दिग्दर्शक या नात्याने मराठी रंगभूमीवर हुकमी एक्का असलेल्या राजेश देशपांडे यांच्याकडून त्यांनीही अस्सल, धमाल नाटक करून घेतले आहे. त्यातले कलाकार बदलले पण प्रेक्षकांवर अधिराज्य करणे या नाटकाचे काही थांबलेले नाही. अद्वैत थिएटर्सच्या वतीने राहुल भंडारे आणि अश्विमी थिएटर्सच्या वतीने मांजरेकर यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे‌. या नाटकाच्या बाबतीत ‘करून गेलो गाव‘, छे, ‘हसून गेलो गाव’ असेच म्हणावे लागेल.

यडगाव बुद्रुक कोकणातलं एक गाव. गाव तंटामुक्त झाले म्हणून आमदार एका विशेष सोहळ्याला मुख्यमंत्री यांना निमंत्रित करीत असतात. लावणी नृत्यांगणा बिजली यांचा कार्यक्रम ठेवायचा. मुख्यमंत्र्यांसोबत बिजलीलाही खूश करायचे असे आमदारांचे नियोजन असते. पण नाट्यवेड्या ग्रामस्थांना ते काही मान्य नसते. सरपंच हे मास्तराला विश्वासात घेऊन काही झाले तरी गावच्या कलाकारांचे नाटक झाले पाहिजे असा आग्रह धरत असतात. पण आमदाराबरोबर पंगा कोण घेणार हा सुद्धा एक प्रश्न असतो. आमदार हा बाईवेडा आणि गुंडवृत्तीचा असतो. त्यामुळे गावात दोन गट निर्माण होतात. यात सरपंच आणि मास्तर यांची शक्कल, अक्कल कामी आली असली तरी अनेक धाडसी गोष्टी कथासूत्रातल्या कलाकारांना कराव्या लागतात. बिजली या नृत्यांगणाचे अचानक गायब होणे, आमदाराच्या जीवनात एका ख्रिश्चन मुलीचे डोकावणे, सतत विरोधाच्या पवित्रात असलेली काकू नाटकाच्या अखेरीस शहाणपणा दाखवणे हा घटनाक्रम आता पुढे काय होणार? याची उत्सुकता वाढवणारा असला तरी दिग्दर्शकांने मनोरंजनाचा धागा काही सोडलेला नाही. गंभीर प्रसंगातही अनेक मजेदार किस्से दडलेले आहेत. याची साक्ष देणारे हे नाटक आहे. पैशाच्या हव्यासापोटी आपली हक्काची संपत्ती कोणा अमराठी माणसाच्या स्वाधीन करू नका. मुंबईत अमराठी लोकांची वस्ती वाढली पुढे कोकणाच्या बाबतीतही तसेच होईल. वेळीच जागृत व्हा असे सांगणारे हे नाटक आहे‌. नृत्य, गायन, मजेदार-मार्मिक विनोद आणि नमुनेदार भूमिका हा या नाटकाचा मुख्य गाभा आहे. लेखक, दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी त्याची छान जुळवाजवळ केलेली आहे. त्यामुळे बाहेर पडताना ‘पैसा वसूल’ म्हणण्यापलीकडे फार काही उरत नाही.

‘वस्त्रहरण’ यशस्वी होण्यासाठी पु. ल. देशपांडे यांचे एक पत्र कारणीभूत ठरले होते. ‘करून गेलो गाव’ हे नाटक सुरुवातीपासून चर्चेत राहिले. त्याला कारण म्हणजे निर्माते महेश मांजरेकर यांचा सहभाग सांगता येईल. चित्रपट, मालिकेत व्यस्त असणाऱ्या पण नाटकावर निष्ठा असणाऱ्या कलाकारांना त्यांनी प्रत्येक वेळी नाटकात सक्रिय केले आहे. त्यामुळे या नाटकात सरपंचाच्या भूमिकेत भाऊ कदम आणि मास्तराच्या भूमिकेत ओंकार भोजने पाहायला मिळतात. विनोदवीर म्हणून प्रेक्षकांनी त्यांना फक्त स्वीकारले नाही, तर डोक्यावर घेतलेले आहे. रंगमंचावर राहून प्रेक्षकांना ताब्यात घेणे तसे अवघड असते कारण हे नाटक फक्त संवाद साधणारे नाही, तर हजरजबाबी, प्रचलीत विनोदाची बरसात करणारे आहे. रोजच्या जीवनात, समाजात, राजकारणात याचे ज्ञान ज्या अभिनेत्याकडे आहे तो कलाकार येथे मर्मज्ञ ठरतो. भाऊ आणि ओंकार हे दोघे सहज सुंदर अभिनय करताना मिश्कील, मार्मिक संवादातून समाजातल्या स्थितांतराचे दर्शन घडवतात. प्रेक्षक खळखळून हसत राहातात. त्याला हे दोघे हास्ययोद्धे कारणीभूत आहेत. अनुष्का बोऱ्हाडे यांनी साकार केलेली नखरेल बिजली म्हणजे अभिनय आणि नृत्य यांची समज असलेली ती एक अभिनेत्री सांगता येईल. उषा साटम (काकू), सचिन शिंदे (धुतराष्ट्र), प्रणव जोशी (आमदार) झकास म्हणावे असा या कलाकारांचा वावर आहे. या शिवाय नूपुर दुदवडकर, सौरभ गुजले, कैलास कणकेकर, सुमित सावंत, दीपक लांजेकर यांचा यात कलाकार म्हणून सहभाग आहे. गाव आणि गावातली माणसं प्रभावी होण्याच्या दृष्टीने अंकुश कांबळी (नेपथ्य), शीतल तळपदे (प्रकाशयोजना) उमेश जाधव, कुंदन अहिरे (नृत्य), आदित्य आणि अनिरुद्ध शिंदे (पार्श्व संगीत), लक्ष्मण गोल्हार (वेशभूषा), अशोक राऊत ( रंगभूषा) यांचे काम महत्त्वाचे वाटते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -