Sunday, April 28, 2024
Homeताज्या घडामोडीविविध मागण्यांसाठी वाडा तालुका आदिवासी संघर्ष समितीचा भव्य मोर्चा

विविध मागण्यांसाठी वाडा तालुका आदिवासी संघर्ष समितीचा भव्य मोर्चा

वाडा : आदिवासी, शेतमजूर, शेतकरी, स्थानिक भूमिपुत्र यांना आपल्या जागा-जमिनी व व्यवसायापासून बेदखल करुन त्यांना हद्दपार करण्याचे धोरण सरकारने आखले आहे. भारतीय संविधानाने सर्वसामान्य व तळागाळातील सर्वसामान्य लोकांना समान अधिकार दिले असताना शासन आपले मनमानी धोरण राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. आज न्यायव्यवस्थेवर लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे. अनेक जाती-जमातींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून समाजा समाजामध्ये वेग-वेगळ्या जातीधर्माच्या नावाने आरक्षणाचे मुद्दे घेऊन आपापसांत भांडणे लावली जात आहेत. या सर्व शासनाच्या मनमानी धोरणाप्रमाणे लोकांच्या विरोधात कायदे करण्याचा शासन भडीमार करीत आहे. जो कायदा सर्वसामान्य लोकांच्या हिताचा असणे आवश्यक असताना मुठभर धनदांडग्या लोकांच्या हितासाठी त्या कायद्यामध्ये बदल केला जात आहे. याचा निषेध करण्यासाठी वाडा तालुका आदिवासी संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी (दि.२५) खंडेश्वरीनाका येथे रास्ता रोको करून तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

धनगर (धनगड) समाजाला आदिवासी समाजाच्या कोट्यातून आरक्षण देण्यात येऊ नये. पेसा भरती त्वरीत अंमलबजावणी करावी. महाराष्ट्र शासनाने ६ सप्टेंबर २०२३ चा कंत्राटी नोकर भरती करण्यासाठी काढलेला शासन निर्णय त्वरीत रद्द करणे. महाराष्ट्र राज्यातील ६२००० सरकारी शाळांचे खाजगीकरण पूर्णपणे बंद करा. दि. ६ जुलै २०१७ च्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांचा सन्मान राखून १७ पदांची सरकारी नोकरभरती त्वरीत करणे. बोगस आदिवासींची चौकशी करुन तात्काळ निलंबन करावे. भूमिहीन कुटूंबाच्या घराखालील जागा त्वरीत त्या कुटूंबाच्या नांवे करणे, भूमिहीन आदिवासी कुटूंबाला ५ एकर जागा जमिन त्वरीत वाटप करणे. वनदावे आदिवासींच्या नांवे करणे, न नोंदविलेल्या कुळांची पिक पाहणी सदरी नोंद करण्यात यावी. पेसा कायद्याची अंमलबजावणी त्वरीत करावी, बिंदुनामावलीची अंमलबजावणी त्वरीत करावी, एमएसईबीचा भोंगळ कारभार थांबवून जनतेला न्याय द्यावा तसेच खोटी बिले आकारणी त्वरीत थांबवावी, अशा विविध मागण्या घेऊन आदिवासी संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाला धडक दिली.

एक तीर एक कमान, खरे आदिवासी एक समान… आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाचे बापाचे… आदिवासी बांधवा जागा हो, संघर्षाचा धागा हो… आदिवासी एकतेचा विजय असो… अशा विविध घोषणांनी शहर दुमदुमले होते. याप्रसंगी संतोष साठे, अनंता वनगा, मृणाली नडगे, पूजा चव्हाण, अर्चना भोईर, बाळा बराठे, यतीन राऊत, योगेश गवा, भास्कर दळवी, सुरेश पवार, राजू दळवी यांच्यासह भास्कर दळवी यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेवटी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे व पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी व्यासपीठावर येऊन मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारून पुढील कारवाईसाठी निवेदन वरिष्ठ्यांना पाठविण्याचे आश्वासन तहसीलदार अंधारे यांनी दिले.

दरम्यान, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी स्वतः वाड्यात हजर राहून मोर्चावर नियंत्रण ठेवले. पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्यासह इतर दहा अधिकरी, ६५ पोलीस कर्मचारी, २० वाहतूक निरीक्षक, २२ होमगार्ड, १० स्ट्राईकिंग असा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चा दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -