Sunday, April 28, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सइंस्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून महिलेची चार कोटींची फसवणूक

इंस्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून महिलेची चार कोटींची फसवणूक

गोलमाल : महेश पांचाळ

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी पैसे गुंतवण्याची जाहिरात एका महिलेने इंस्टाग्रामवर पाहिली. त्यावर क्लिक केल्यावर, तिला दुसऱ्या खात्यावर पुनर्निर्देशित केले गेले. तिला दुसऱ्या गटात जोडले गेले, जेथे ‘डमी’ सदस्यांनी तिला चांगले परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. पीडित महिलेला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून दुप्पटपेक्षा जास्त नफा मिळवून देण्याची आमिष दाखवण्यात आले होते; परंतु नफा जास्त देणार असल्याचे सांगूनही तो हस्तांतरित केला जात नव्हता; परंतु तिच्या गुंतवणुकीत फायदा होऊनही ती पैसे काढू शकली नाही, तेव्हा काहीतरी चुकत आहे, असे वाटले. त्यामुळे या महिलेला संशय आला. कौटुंबिक सदस्यांशी सल्लामसलत केल्यावर तिला समजले की, तिला फसवले गेले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर क्राईम विभागाला १९३० हेल्पलाइनवर संपर्क साधला. त्यनंतर तिने वांद्रे येथील बीकेसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली एका इंस्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून सायबर पोलिसांनी तत्काळ संबंधित बँक खात्यातील पैसे गोठवले.

सायबर गुन्हेगारांनी महिलेची एकूण चार कोटी ५६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. त्यापैकी ३ कोटी ८० लाख इतकी रक्कम ४८ तासांच्या आत गोठवण्यात सायबर पोलिसांना यश आले. सायबर सेलच्या अधिकाऱ्यांना असे आढळून आले की, विविध बँकांमधील विविध खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित केले गेले. अंदाजे ७० ते ८० लाख रुपये या घोटाळेबाजांनी आधीच काढून घेतले. इंदिरा सिक्युरिटीजच्या नावाखाली हे बनावट अॅप होते. त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या घोटाळ्यातील सहभाग नाकारला होता; परंतु महिलेने सायबर फसवणुकीची तक्रार तत्काळ दाखल केल्याने, पोलिसांना पीडितेच्या पैशाचे रक्षण करण्यासाठी अधिक वेळ मिळाला.

यासंदर्भात सायबर पोलीस सांगतात की, त्या महिलेला इंस्टाग्रामवर शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारी जाहिरात दिसली, त्यासोबत लिंक होती. लिंकने शेअर बाजारातील गुंतवणुकीद्वारे वाढीव नफ्याचे आमिष दाखवण्यात आले होते. सुरुवातीला, महिलेने अंदाजे ४.५६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आणि नंतर ती तिच्या गुंतवलेल्या भांडवलावर नफा स्वरूपातील पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिला समजले की, ती सायबर फसवणुकीला बळी पडली आहे. अनेक बँक खात्यांमध्ये फसवणूक केलेले पैसे ट्रान्सफर केले असल्याचे तपासात उघड झाले.

तक्रारदार महिलेने ४ जानेवारी ते ६ जानेवारी या कालावधीत पैसे गुंतवले होते. ७ जानेवारीला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती हेल्पलाइन क्रमांक १९३० वर दिल्यानंतर सायबर सेलने वेगाने तपास सुरू केला. चौकशी दरम्यान, फसवणूक केलेले पैसे वेगवेगळ्या बँकांमधील विविध खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आल्याचे पोलिसांना आढळले. तसेच आरोपींनी २६ बँकांमधील ७१ खात्यांमध्ये १७१ व्यवहार केले आहेत. लाभार्थ्यांच्या संदर्भात इतर तपशीलांचा पोलीस शोध घेत आहेत.अहमदाबाद, नवी मुंबई आणि दुबईमधील बँक खात्यातून पैसे काढण्याचे तपशील पोलिसांसमोर आला आहे. याबाबत अधिक माहिती देताना मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांनी सांगितले की, सोशल मीडियावर फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. शेअर मार्केटमधील गुंतवणूक दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन तिला भुरळ घातली. फसव्या आश्वासनांवर आधारित व्यवहार झाल्याचे पोलीस न्यायालयात सिद्ध करतील आणि तक्रारदार महिलेला पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
maheshom108@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -