Wednesday, May 1, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखविदर्भाचा पहिला टप्पा, भाजपाचे पारडे जड

विदर्भाचा पहिला टप्पा, भाजपाचे पारडे जड

विदर्भातील पाचही लोकसभा मतदारसंघांत चुरशीच्या लढती दिसत असून, प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत आहेत. मागील लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश धानोरकर हे एकच उमेदवार निवडून आले होते. आता त्यांच्या पत्नी प्रतिभा धानाेरकर रिंगणात आहेत, तर नागपूर या लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उभे आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे हे रिंगणात आहेत.सांस्कृतिक वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे. अशा प्रकारे विदर्भात दिग्गजांमध्ये चुरस पाहावयास मिळत आहे.

विदर्भ वार्तापत्र – नरेंद्र वैरागडे, नागपूर

चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांचे पती खासदार होते. त्यांच्या अकाली निधनामुळे ही जागा रिक्त झाली. काँग्रेसच्या दृष्टीने सुरेश धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देऊन भावनिक मतदान मिळेल, अशी काँग्रेसला आशा आहे. या जागेसाठी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या मुलीसाठी खूप प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही. या मतदारसंघात इतर पक्षांचे उमेदवार तुल्यबळ दिसत नाहीत. वंचितने बेले यांना उभे केले आहे. ते तेली समाजाचे आहेत. या मतदारसंघात तेली समाज आहे. पूर्वीचे उमेदवार ॲडव्होकेट महाडोळे हे भाजपामध्ये गेल्याने, या वेळेस बेले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघांमध्ये चंद्रपूर, राजुरा, वरोरा, वणी, आरणी, आणि बल्लारपूर हे विधानसभा मतदारसंघ आहेत. येथे या मतदारसंघात धनोजी कुणबी समाजाचे मतदार मोठ्या प्रमाणात आहेत आणि या समाजाचे मतदान नेहमीच निर्णय ठरत राहिले आहे. वणी मतदारसंघात जवळपास सव्वालाख कुणबी मतदार आहेत. काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर या मतदान आपल्याकडे आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत.

त्याच दृष्टीने त्यांनी कुणबी समाजाच्या अनेक बैठका सुद्धा घेतल्या होत्या, जातीय राजकारणाची समीकरणे आता जोरात वाहू लागली आहेत. विकासावर मत द्या, असे सुधीर मुनगंटीवार सांगत आहेत, तर माझ्या पतीचे अपुरे राहिलेले स्वप्न आणि कामे मला पूर्ण करण्यासाठी निवडून द्या, असे प्रतिभा धानोरकर सांगत आहेत, तर जय विदर्भ पार्टीचे ॲडव्होकेट चटप यांनी अशोक राठोड यांना पाठिंबा दिला आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक सभा घेतली. त्या मानाने काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांची सभा झाली नाही. प्रियंका गांधी आणि आदित्य ठाकरे यांची सभा होणार होती; पण ती झाली नाही. काही चित्रपट कलाकारही प्रचारात आहेत. शेवटी आता मतदार कुणाला झुकते माप देतात यावर सगळं अवलंबून आहे. विकासाच्या कामावर जर मतदान झाले तर सुधीर मुनगंटीवार यांचा फायदा होऊ शकतो. पण जर जातीवर निवडणूक झाली, तर याचा फटका सुधीर मुनगंटीवार यांना बसू शकतो. शिवाय हंसराज यांचे कार्यकर्ते आजही सुधीर मुनगंटीवार यांचे काम करताना दिसत नाहीत, ते काँग्रेसचे काम करत आहेत.

नागपूर मतदारसंघ :

नागपूर या लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उभे आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे हे रिंगणात आहेत. नितीन गडकरी जास्त मतांनी निवडून येतील, असे भाजपाच्या लोकांना वाटत आहे. मात्र नितीन गडकरी यांचा जसा स्वभाव आहे तसाच स्वभाव ठाकरे यांचा आहे. त्यांचीही सर्वांसोबत मैत्री आणि सख्य आहे. शिवाय महानगरपालिकेपासूनच ते राजकारणात असल्यामुळे सर्व लोकांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. यावेळेस आपल्याला काँग्रेसचे सर्व गट एकत्र काम करताना दिसत आहेत. त्यांचा सर्वजण प्रचार करत आहेत. याशिवाय प्रकाश आंबेडकर यांनी आपला पाठिंबाही विकास ठाकरे यांना दिला आहे. त्यामुळे दलित, मुस्लीम आणि काँग्रेसची परंपरागत मते विकास ठाकरे यांना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नितीन गडकरी जातीचे राजकारण करत नाहीत. त्यामुळे गडकरींनाच जास्त मतदान मिळेल, असे अनेक लोकांना वाटत आहे. नागपूरचा जर विकास करायचा असेल, तर गडकरी यांच्याशिवाय पर्याय नाही, असे लोकांचे म्हणणे आहे. विदर्भाचा विकास आणि केंद्रातील कामे, शिवाय नागपुरातील कामे हे गडकरींचे प्लस पॉइंट आहे. भाजपाचे सर्व कार्यकर्ते, नेते गडकरींसोबत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस गडकरींच्या प्रचारात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक सभा त्यांच्यासाठी घेतली आहे. आरएसएसचे हेडक्वार्टर नागपूरला आहे. त्यांच्या सर्व संघटना गडकरींसोबत आहेत, शिवाय आंबेडकरी चळवतील दोन दिग्गज, एक प्राध्यापक जोगेंद्र कवाडे आणि ॲडव्होकेट सुलिके कुंभारे त्यांच्यासोबत आहेत आणि रामदास आठवले यांचेही कार्यकर्ते गडकरी यांच्यासोबत आहेत. त्यामुळे या समाजाची मते त्यांना मिळण्याची शक्यता आहे.

नागपूर मतदारसंघ :

या मतदारसंघांमध्ये सध्या तरी दुहेरीच लढत दिसत असली तरीही अपक्ष किशोर गजभिये यांची उमेदवारी नाकारता येत नाही. काँग्रेसने उमेदवार म्हणून रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली आहे, तर शिवसेनेने शिंदे गटाकडून राजू पारवे रिंगणात आहेत. या मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून माजी आयएएस अधिकारी किशोर गजभिये रिंगणात आहेत. ते मागील निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार होते. ते दुसऱ्या क्रमांकावर होते. यावेळेस काँग्रेसने त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे ते अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यांनाही प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला आहे. जिल्हा परिषदचे अध्यक्ष रश्मी बर्वे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती; पण त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांची उमेदवारी रद्द झाली. त्यामुळे त्यांचे पती शामकुमार बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सध्या तरी पारवे आणि बर्वे यांच्या दुहेरी लढत दिसत असली तरीही किशोर गजभिये यांचेही पारडे जड दिसत आहे.

भंडारा-गोंदिया मतदारसंघ :

गोंदिया-भंडारा मतदारसंघात चुरशीची लढत होते. या मतदारसंघात भाजपाने विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनाच उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात इतर पक्षांचा खूप प्रभाव दिसत नाही. पण बसपाला मानणारा काही मतदार आहे, संजय कुंभलकर यांना बसपाने रिंगणात उभे केले आहे. काँग्रेसचे नेते नाना पडोळे आणि प्रफुल पटेल राष्ट्रवादीचे यांचा हा खास भाग आहे. या दोघांचेही लक्ष या मतदारकडे मतदारसंघाकडे लागले आहे. प्रफुल पटेल हे तर गोंदियाचेच आहेत आणि शिवाय त्यांचा मतदारसंघ पण आहे, तर नाना पटोले यांचाही हाच मतदारसंघ आहे. त्यांचा गाव पण याच मतदारसंघात येतो. त्यामुळे हे दोघेही आपला उमेदवार कसा विजय होतील, यासाठी प्रयत्न करत आहेत. या मतदारसंघांमध्ये अमित शहा यांची एक सभा झाली आहे, तर देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांच्याही भाजपासाठी सभा झालेल्या आहेत.

राहुल गांधींची ही सभा या मतदारसंघात झालेली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आता प्रतिष्ठेचा झालेला आहे. या मतदारसंघांमध्ये १८ उमेदवार रिंगणात असले तरीही दुहेरीच लढत दिसत आहे. भाजपाने विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना पुन्हा उमेदवारी देऊन त्यांच्याकडे पुन्हा सूत्र दिली आहेत. या मतदारसंघात काँग्रेस ३० वर्षांनंतर पहिल्यांदा पक्ष चिन्हावर लढत आहे. या मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. लोकांची नाराजी आहे. विकास नाही असे म्हणणारे पण आहेत. तरी मतदारांचा खूप उत्साह दिसत नाही; पण नेत्यांना आपण निवडूनच येईल असे दोघांनाही वाटत आहे. त्यामुळे नाना पटोले खूप मेहनत घेत आहेत. या मतदारसंघांमध्ये दुहेरी लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे आपल्याला लवकरच कळेलच.

गडचिराेली मतदार संघ :

गडचिरोली नक्षलवाद्यांच्या कारवायांमुळे चर्चेत असलेल्या या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गडचिरोलीचा अजूनही विकास मोठ्या प्रमाणात झाला नाही. मागासलेला जिल्हा म्हणून याची ओळख आहे. गडचिरोली चिमूर मिळून हा राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघात सरळ दुहेरी लढत दिसत आहे. भाजपाने विद्यमान खासदार अशोक नेते यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने सर्वांचा विरोध घेऊन डॉक्टर नामदेव कीरपान यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना उमेदवारी देऊ नये, म्हणून काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी खूप प्रयत्न केले, पण शेवटी उमेदवाराची माळ किरपान यांच्या गळ्यात पडली. त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक काँग्रेसचे लोकं नाराज झाले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हा मतदारसंघ आहे. त्यांचे खास लक्ष या मतदारसंघाकडे आहे. अशोक नेते हे विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या पाठीमागे भाजपा नेत्यांची फौज आहे. कोणी गडचिरोलीचा विकास करू असे ते बोलत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -