Saturday, April 27, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वSugar Production : अर्थव्यवस्थेची वट, साखर उत्पादनात घट

Sugar Production : अर्थव्यवस्थेची वट, साखर उत्पादनात घट

  • अर्थनगरीतून… : महेश देशपांडे, आर्थिक घडामोडींचे अभ्यासक

देशाची अर्थव्यवस्था जागतिक क्रमवारीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू शकेल, असे मत व्यक्त करणारा अहवाल अलीकडेच समोर आला. याच सुमारास देशाच्या साखर उत्पादनात अडीच टक्के घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. दरम्यान, शेअर बाजारात हेराफेरी करणाऱ्यांना ‘एआय’द्वारे चाप बसवला जाणार असल्याची माहिती समोर आली. ईव्ही क्षेत्रात अदानी-उबर एकत्र येत असल्याचेही सरत्या आठवड्यात दिसून आले.

सध्या जगातील अनेक देश मंदीच्या गर्तेत आहेत. या देशांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो आहे. असे असताना भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरत आहे. अर्थव्यवस्था अशीच वाढत राहिली, तर भारत जगातील अव्वल अर्थव्यवस्थांमध्ये सामील होईल. २०२७ पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘जेफरीज’ या अमेरिकेच्या जागतिक ब्रोकरेज फर्मने अलीकडेच हा दावा केला. संस्थेने आपल्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक विकासदरात सतत होणारी वाढ, अनुकूल भू-राजकीय परिस्थिती, बाजार भांडवलातील वाढ आणि मजबूत कॉर्पोरेट संस्कृती यामुळे भारत २०२७ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार असल्याचे म्हटले आहे. आपल्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनेल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच केला. जगातील अनेक रेटिंग एजन्सी आणि इन्व्हेस्टमेंट बँकर्सनीही हे भाकीत केले आहे. ‘एस अँड पी’ ग्लोबल रेटिंग्जने डिसेंबर २०२३ च्या पहिल्या आठवड्यात हा दावा केला होता.

‘जेफरीज’च्या इंडिया इक्विटी विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दहा वर्षांपासून भारत ७ टक्के वार्षिक विकासदराने वाढत आहे. भारतीय अर्थव्यवस्था ३.६ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसह आठव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर गेली आहे. पुढील चार वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सची होईल. जर्मनी आणि जपानला मागे टाकून भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. भारताचे इक्विटी मार्केट गेल्या १० ते २० वर्षांपासून १०-१२ टक्के दराने सतत वाढत आहे. भारत आता जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी इक्विटी बाजारपेठ बनली आहे. २०३० पर्यंत भारताच्या शेअर बाजाराची मार्केट कॅप १० ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता ‘जेफरीज’ने वर्तवली आहे. सध्या, जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था अमेरिकेची आहे. तिचा आकार सुमारे २७ ट्रिलियन डॉलर्स आहे. सुमारे १७ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेसह चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. जपान ही अनेक वर्षांपासून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती; पण आता हा देश चौथ्या स्थानावर घसरला आहे. जर्मनीने एका स्थानाने वर झेप घेतली असून चौथ्याऐवजी तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. सुमारे ३.७५ ट्रिलियन डॉलर्सच्या उलाढालीसह भारत पाचव्या स्थानावर आहे.

या वर्षी देशात साखरेच्या उत्पादनात घट झाली आहे. ‘इस्मा’ने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार २०२३-२४ मध्ये १५ फेब्रुवारीपर्यंत देशातील साखर उत्पादन २.४८ टक्क्यांनी घटून दोन कोटी २३ लाख टन झाले आहे. वर्षभरापूर्वी याच काळात ते उत्पादन दोन कोटी २९ लाख कोटी टन होते. ‘इंडियन शुगर मिल्स असोसिएशन’ (इस्मा) च्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२३-२४ मध्ये साखर उत्पादन दहा टक्क्यांनी कमी होणार आहे. या वर्षी देशात साखरेचे उत्पादन तीन कोटी तीस लाख टन होण्याची शक्यता ‘इस्मा’ने वर्तवली आहे. मागील वर्षी तीन कोटी ६६ लाख टन साखर उत्पादित झाली होती. ‘इस्मा’च्या मते चालू विपणन वर्षात १५ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये साखरेचे उत्पादन कमी राहिले. तथापि, उत्तर प्रदेशमधील साखरेचे उत्पादन वाढून ६७.७ लाख टन झाले आहे. मागील वर्षी याच कालावधीत ते ६१.२ लाख टन होते.

देशातील सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रातील उत्पादन घटून ७९ लाख टन झाले आहे. मागील वर्षी या काळात ८५ लाख टन साखर उत्पादित झाली होती. देशातील तिसरा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या कर्नाटकमधील उत्पादन या कालावधीत ४६ लाख टनांवरून घसरून ४३ लाख टनांवर आले आहे. दरम्यान, ‘इस्मा’ने दिलेल्या माहितीनुसार, चालू विपणन वर्षात १५ फेब्रुवारीपर्यंत देशात सुमारे ५०५ कारखाने कार्यरत होते. गेल्या वर्षी ही संख्या ५०२ होती. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सुमारे २२ कारखान्यांनी गाळप बंद केल्याची माहिती ‘इस्मा’ने दिली आहे. देशातील काही भागात यंदा कमी पाऊस झाला आहे. त्याचा परिणाम ऊस उत्पादनावर झाल्याचे दिसून येत आहे. साखरेच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवल्यामुळे सध्या साखरेच्या दरात वाढ होताना दिसत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, सध्या साखरेची सरासरी किंमत ४४.६२ रुपये प्रति किलो आहे. मागील वर्षीच्या तुलनेत साखरेच्या किमतीत वाढ झाली आहे. मागील एका वर्षापूर्वी साखरेची किंमत ४१.८२ रुपये प्रति किलो होती. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये उत्पादनात घट झाली आहे. सरकारने ऊसाच्या रसापासून इथेनॉलचे उत्पादन मर्यादित केले आहे.

शेअर बाजारात हेराफेरी करणाऱ्यांना लवकरच चपराक बसणार आहे. अशा भामट्यांना पकडण्यासाठी ‘सेबी’ने तयारी केली आहे. त्यामुळे असे काम करणारे लवकर पकडले जातील. तसेच बाजारातील अशा प्रकारांनाही आळा बसणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे फसवणूक करणाऱ्या ब्रोकरला पकडण्यासाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’चा (एआय) वापर करण्यात येणार आहे. यामुळे गुंतवणूकदारांना फसवणाऱ्यांना लगाम घालता येईल. लवकरच सेबी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार आहे. दिल्लीमध्ये नुकतेच ‘असोसिएशन ऑफ नॅशनल एक्सचेंज मेंबर्स ऑफ इंडिया’चे तेरावे आंतरराष्ट्रीय संमेलन पार पडले. त्यात या विषयावर सविस्तर चर्चा झाली. बाजारात पारदर्शकता वाढावी आणि गडबडीला आळा बसावा यासाठी हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे. काही ब्रोकर गडबड करत आहेत. त्यांच्यावर बारीक लक्ष आहे; पण या प्रकाराला आळा घालण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. सेबीच्या नियमांचे उल्लंघन करणे महागात पडेल, असे ‘सेबी’ने स्पष्ट केले आहे. गडबड थांबवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे; पण नियमांचे उल्लंघन केल्यास अशा ब्रोकर्सवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या वापरामुळे ही गडबड लवकरच लक्षात येईल.

दिग्गज भारतीय उद्योगपती गौतम अदानी आणि कॅब एग्रीगेटर ‘उबर’चे सीईओ दारा खोसरोशाही यांच्या भेटीनंतर दोन्ही कंपन्या भारतात मोठी भागीदारी करू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. एकंदरीत, अदानी आणि उबेर एकत्र येऊन ईव्ही क्षेत्रात खळबळ माजवू शकतात.अलिकडेच अदानी आणि खोसरोशाही यांची प्रत्यक्ष भेट झाली. या वेळी अदानी समूह आणि उबर यांच्यातील भविष्यातील सहकार्याच्या शक्यतेचे संकेत दिले गेले. या बैठकीनंतर अदानी म्हणाले की, भारतात उबरच्या विस्तारासाठी खोसरोशाहींची दृष्टी खरोखरच प्रेरणादायी आहे.

त्यांनी ‘एक्स’ या सोशल नेटवर्किंग साईटवर लिहिले की दारा आणि त्यांच्या टीमसोबत भविष्यात सहयोग करण्यास ते उत्सुक आहेत. उबरच्या सीईओंनीही या बैठकीचे वर्णन केले आहे. भारतातील ईव्ही परिवर्तनाला गती देण्यासाठी कंपनीच्या वचनबद्धतेचाही त्यांनी उल्लेख केला. अदानी यांची पोस्ट पुन्हा पोस्ट करत त्यांनी लिहिले की आम्ही आमची भागीदारी पुढील स्तरावर नेण्यासाठी तयार आहोत. उबेर ७० पेक्षा जास्त देशांमध्ये काम करते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -