Monday, May 6, 2024
Homeसाप्ताहिककोलाजमुरुडचे दुर्गादेवी मंदिर

मुरुडचे दुर्गादेवी मंदिर

कोकणी बाणा: सतीश पाटणकर

कोणत्याही गावाची स्थापना, त्या गावात कालानुरूप तयार होणाऱ्या परंपरा, संस्कृती विकसन आणि बदल, या सर्वच गोष्टी रंजक असतात. मध्ययुगातील एक मोठे गाव ते आज पर्यटनाच्या नकाशात स्वतःचे वेगळे स्थान असलेल्या मुरुड गावची गोष्ट देखील अशीच आहे.

आदिलशाही काळात एका सिद्धपुरुषाने दाभोळ सुभ्यात गर्दीपासून दूर व उपेक्षित भाग वसाहतीकरिता निवडला. गंगाधर भट असे त्या सिद्ध पुरुषाचे नाव. सौराष्ट्र प्रांतातून हा सिद्ध पुरुष कोकणात आला. गावाची रचना, व्यवस्था, स्वयंपूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारच्या श्रमजीवी व बुद्धिजीवी वर्गाची वस्ती मुरुड गावी वसवण्यात आली. गावच्या बखरीनुसार सिद्धपुरुष, ‘दातार’ यांच्या घरी राहिला व दातार यांच्या बाल-विधवा मुलीला त्यांनी शिक्षण दिले आणि विद्या शिकवल्या. मुरुड गावाच्या रचनेत या मुलीचा विशेष हात होता. सिद्धपुरुषाबरोबरच त्यांचे शिष्य व मानसपुत्र, ‘वैशंपायन’ हे मुरुडला आले व स्थायिक झाले. गावचे उपाध्येपण व धर्माधिकरण हे दोन्ही अधिकार १९व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत त्यांच्याकडेच होते.

१९व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत एकही सागरी सत्ता पश्चिम किनाऱ्यावर नव्हती. त्यामुळे किनाऱ्यावर मलबारी चाच्यांचा आणि सिद्दीचा जुलूम व उपद्रव शिवकाळापर्यंत चालू होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हर्णेतील गोवागड, फत्तेगड, कनकदुर्ग आणि सुवर्णदुर्ग सक्रिय झाले आणि आडवाटेला असलेले मुरुड गाव राजमार्गावर आले. इ. स. १६७३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुवर्णदुर्गाची दुरुस्ती केली. त्या दरम्यान, महाराज हर्णेत आले होते. त्यावेळी महाराजांनी केशव जोशींची भेट घेतली व सन्मान केला. यावेळी महाराजांना हवे असलेले कर्ज जोशी यांनी दिले. पेशव्यांच्या काळात मुरुड एक समृद्ध गाव म्हणून वाढत होते.

कोकण म्हटलं की, निसर्गाची गर्भश्रीमंती. या गर्भश्रीमंतीत कशाचीही उणीव नाही. उदा. नदी-समुद्र, दरी-डोंगर, झरे-धबधबे, पशू-पक्षी, हिरवळ-वनराई असं सर्व काही. अशा निसर्गाच्या कुशीत शिरल्यावर दैनंदिन जीवनाचे सगळे ताप आपोआप मागे पडतात, थकलेलं मन पुन्हा प्रफुल्लित होतं आणि मनस्तापाचा बोझा रितवार उचलण्यासाठी नव्याने सज्ज होतं. हीच गोष्ट लक्षात घेऊन पूर्वीची देवालय मानवी वस्तीपासून दूर, अलिप्त अशी डोंगरमाथ्याशी अथवा नदी, समुद्राच्या शांत तटाशी स्थापन केली जात असत; परंतु मुरुडमधील अत्यंत प्राचीन आणि मानाचं दुर्गा मंदिर हे गावाच्या मध्यावरती आणि मानववस्तीच्या ऐन उंबऱ्यावरच बांधण्यात आलेलं आहे.

चौदाव्या-पंधराव्या शतकात सौराष्ट्राहून (विशालनगरहून) एक सिद्धपुरुष येथे आला, त्याने सर्व जमातींना स्थान देऊन वसाहत निर्माण केली, बुद्धिजीवी व श्रमजीवी लोकांच्या येण्यानं गाव उभं राहिलं, लोक एकोप्याने नांदत असल्यामुळे गावाला भरभराटी आली, या भरभराटीच्या काळात देवालय स्थापन होऊ लागली, सदर मंदिर हे त्याच काळात स्थापन झालं. त्याकाळी परस्पर सहकार्य व स्वयंपूर्णता या तत्त्वावर गाव चाले. देवळातून समाजाचे धार्मिक व सामाजिक नियमन होत असे. आजही आपण दुर्गादेवी मंदिरातील चैत्रशुद्ध प्रतिपदेस होणाऱ्या उत्सवाचे स्वरूप पाहिले, तर त्यात समाजधारणेचे व लोकसंग्रहाचे तत्त्व किती उत्तम रीतीने अंतर्हित झालेले आहे हे लक्षात येते. या उत्सवात अनेक जाती-जमातींना काहीना काही काम, मानाचे विडे व नैवेद्य देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय अश्विन मासात नवरात्रीच्या दिवसांमध्ये होणारा उत्सव सुद्धा सर्वसमावेशक आहे.

वसाहत निर्माण झाल्यानंतर सुरुवातीला देवीचे देऊळ अगदी साधे होते. वेदविद्या व कृषी व्यवसाय करणारे सामान्य खेडवळ लोक, त्यामुळे देवळाच्या वैभवाला उणीव होती. पण कालांतराने देशोदेशी फिरून मुरुडला परत आलेले ग्रामस्थ येताना एक नवीन दृष्टी आणि सामर्थ्य घेऊन आले. त्यांनी देऊळ पुन्हा नवीन करायचे ठरवले. त्यानुसार शंकरभट दीक्षित, विश्वनाथ जोशी, आपाभट दातार, केशवभट कर्वे व नारो हरी बाळ असे मुरुडचे शहाणे आणि कर्ते लोक कामाला लागले. नवीन देवळाचा आराखडा भव्य प्रमाणावर आखण्यात आला. अन्य प्रदेशांतून साहित्य व कसबी कारागीर मागवण्यात आले. सतत तीन वर्षे बांधकाम चालले आणि १७६३ मध्ये मंदिर उभे राहिले. आज आपण दुर्गादेवीचे देऊळ पाहतो ते हेच. इतके सुंदर मंदिर त्या पट्ट्यात दुसरे आढळत नाही.

या मंदिराची इमारत अगदी पुरुषभर उंचीच्या काळ्या दगडांच्या मजबूत चौथऱ्यावर उभी आहे, पायऱ्या चढून वर गेलो की, भव्य तिन्ही बाजूंनी मोकळा सभामंडप आहे, सभामंडपाला मधोमध सुवर्ण नक्षी असलेली फरशी बसवण्यात आलेली आहे, सभामंडपातील सुंदर वेलबुट्टी काढलेले खांब अगदी मनोहर आहेत. ते समस्त सौंदर्य पाहून दृष्टी निवळली की, समोरचं दर्शन घडतं गाभाऱ्यातील अष्टभुजा दुर्गा देवीचं. देवीची मूर्ती तर विलक्षण तेजपुंज आहे. मूर्ती गाभाऱ्याबाहेर उजव्या व डाव्या बाजूला सभामंडपातील खांबांपेक्षाही मोठे दोन-दोन खांब आहेत. या चार खांबावरील नक्षी अधिक कलाकुसरीची असून त्यावर दशावतांराची व इतर देवतांची शिवाय सर्प, पोपट, हत्ती, वाघ सिंह वगैरे प्राण्यांची सुबक चित्रे कोरलेली आहेत. सभामंडपाच्या बाहेरच्या बाजूला पोर्तुगीज देवळात असतात तशा प्रकारची एक मोठी घंटा टांगली आहे. या घंटेवर ‘omnes gentes laudate dominum’असा लॉटिन भाषेत लेख आहे. त्याचा अर्थ ‘सर्व लोकांनी प्रभूची स्तुती करावी.’ असा आहे. ही घंटा देवळात कशी आली याबद्दल कोणतीही ठोस माहिती नाही, केवळ अख्यायिका आहेत. मंदिराबाहेर कै. डॉ. रामचंद्र श्रीधर गानू यांच्या नावाने बांधलेलं भव्य रंगमंदिर आहे. त्यापुढे एक नगारखाना आहे, जो सध्या बंद आहे. त्या नगारखान्याखाली काळ्या दगडाच्या चौथऱ्यावर बांधलेलं तुळशी वृंदावन आणि शेजारी मोठा काळ्या दगडाचा त्रिपूर (दीपमाळ) आहे. दुर्गामंदिरापासून जवळचं मुरुडची किनारपट्टी असल्यामुळे इथे येणारे पर्यटक या मंदिराला आवर्जून भेट देत असतात. कारण हे मंदिर निव्वळ एक देवस्थान नाही, तर इतिहासाची जिवंत साक्ष आहे.(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -