Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेडोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखा शिंदे गटाच्या ताब्यात

डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखा शिंदे गटाच्या ताब्यात

शिंदे समर्थकांनी खरेदी केली शिवसेना शाखेची जागा

डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील शिवसेनेची बलस्थान मानली जाणारी शिवाजी पुतळ्याजवळील शिवसेनेची मध्यवर्ती शाखा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या समर्थकांनी गुरुवारी सकाळी शक्तिप्रदर्शन करत ताब्यात घेतली.

शिवसेना शाखेची जागा शिंदे समर्थकांनी विकासकाकडून नोंदणीकृत पध्दतीने खरेदी केली असल्याची कागदपत्र रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केली. शाखेचा ताबा घेतला असल्याचे कळताच ‘उध्दव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाचे समर्थक शाखेत आले. परंतु शाखेबाहेरील नगरसेवकांच्या खासगी सुरक्षा रक्षकांची गर्दी पाहून त्यांनी यापूर्वीसारखा आक्रमक पवित्रा घेतला नाही.

३२ वर्ष शिवसेनेवर माजी शाखाप्रमुख दिवंगत गोविंद चौधरी यांचा अंमल होता. त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या कविता गावंड शाखेवर नियंत्रण ठेऊन होत्या. दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शाखा असलेल्या वर्धमान विकासकाबरोबर व्यवहार केला होता. त्यांची थकीत रक्कम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देऊ केली होती. वर्धमान सोसायटीची देखभाल दुरुस्तीची १९९१ पासुनची थकीत रक्कम मुख्यमंत्री शिंदे यांनी सोसायटीला दिली होती, असे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.

वर्धामान सोसायटीत शिवसेना शाखा असली तरी पालिकेकडून मालमत्ता कराचे देयक विकासकाच्या नावे जात होते. या सोसायटीवर व्यक्तिगतरित्या कोणाचाही ताबा नव्हता. शिवसेनेकडून तोंडी हक्क सांगितला जात होता. यापूर्वी विकासकाने शाखेच्या काही पदाधिकाऱ्यांबरोबर तडजोड करुन काही रक्कम देयक केली होती. ‘माझी थकित रक्कम मला द्या आणि जागेचा ताबा घ्या,’ असे विकासक शाखा पदाधिकाऱ्यांना सांगत होता.

काही महिन्यापूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर शाखेतील एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्या तसबिरी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या समर्थकांनी काढल्या होत्या. या घटनेचा राग येऊन बाळासाहेबांची शिवसेना समर्थकांनी शिवसेना मध्यवर्ती शाखेत घुसून त्यांनी ठाकरे समर्थकांना शाखेबाहेर काढून शाखेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी जोरदार झटापट झाली होती.

हा राग खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मनात होता. शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या नुतनीकरणामध्ये खा. शिंदे यांचा मोठा वाटा आहे. शाखेत कार्यालयासह दोन प्रशस्त दालने आहेत. रेल्वे स्थानकाजवळील वर्दळीच्या रस्त्यावर असलेली शिवसेना मध्यवर्ती शाखा हातामधून जाणे योग्य होणार नाही. हा विचार करुन बंडखोरी नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सहजासहजी ठाकरे समर्थकांकडून शाखेचा ताबा मिळणे शक्य नसल्याने, विकासकाची थकीत रक्कम त्याला देऊ केली. विकासकाकडून शिवसेना शाखेची जागा खरेदी केल्याचा रितसर नोंदणीकृत व्यवहार केला. या सगळ्या हालचाली अतिशय संयम आणि गाजावाजा न करता करण्यात आल्या. ठाकर समर्थकांना याची चाहूल लागणार नाही याची काळजी घेण्यात आली होती.

नोंदणीकृत दस्तऐवज हातात येताच खा. डॉ. शिंदे यांच्या आदेशावरुन गुरुवारी सकाळी शिंदे समर्थक दीपेश म्हात्रे, रमेश म्हात्रे, महेश पाटील आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या खासगी सुरक्षा रक्षकांचा लवाजामा घेऊन शाखेत आले. त्यांनी रीतसर शाखेचा ताबा घेतला. ही माहिती ठाकरे समर्थकांना कळताच त्यांनी शाखेकडे धाव घेतली.

शिवसैनिकांपेक्षा गर्दीत पदाधिकाऱ्यांचे खासगी सुरक्षा रक्षक अधिक असल्याने त्यांनी शाब्दिक विरोध केला. गोविंद चौधरी यांच्या निधनानंतर शाखेवर नियंत्रण असलेल्या कविता गावंड यांना पोलिसांनी शाखेत बोलावून घेतले होते. ठाकरे समर्थक जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, तात्या माने इतर पदाधिकारी पोलीस ठाण्यात गेले. शिंदे समर्थक कार्यकर्ते तेथे होते. पोलिसांनी शिंदे समर्थकांनी जतीन पाटील यांच्या नावे विकासकाकडून शाखेची जागा खरेदी केल्याची नोंदणीकृत कागदपत्र दाखवली. ठाकरे समर्थकांनी याविषयी नाराजी व्यक्त करत शांत राहणे पसंत केले. १९९१ पासून शिवसेना शाखा वर्धामान इमारतीत सुरू आहे.

आनंद दिघे यांच्या काळात शहरी, ग्रामीण भागात गरजू मुलांना वह्या वाटपाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केला जायाचा. या वह्या ठेवण्यासाठी डोंबिवलीत जागा नव्हती. मोनजी भाई विकासकाला विनंती करुन शाखेची जागा तात्पुरत्या वापरासाठी शिवसेनेने घेतली होती. वह्या वाटप करता करता या जागेत शिवसैनिक जमू लागले. वर्षभर वह्यांचा पेर शाखेत पडलेला असायचा. ही जागा हळुहळु शिवसेना शाखा म्हणून ओळखली जाऊ लागली. जागा खाली करा म्हणून आनंद दिघे यांचा कोण सांगणार असा प्रश्न. त्यामुळे १९९१ पासून जागेवर शिवसेनेने अंमल ठेवला. माजी शहरप्रमुख गोविंद चौधरी यांनी काटेकोरपणे जागेची देखभाल केली.शाखेवरील आपला प्रभाव कायम ठेवला. त्यामुळे गोविंद चौधरी यांची शाखा म्हणून ही शाखा ओळखली जात होती.

नोंदणीकृत व्यवहार करुन शाखेचा ताबा घेण्यात आला आहे. अनेक वर्षापासून शिवसेनाप्रमुखांच्या नावाने शाखेतील कारभार सुरू होता. त्यामुळे शाखेवरील ताब्यासाठी आम्ही कायदेशीर प्रक्रिया सुरू करू. – सदानंद थरवळ, जिल्हाप्रमुख, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना

शाखेतील शिंदे पिता-पुत्रांच्या तसबिरी ठाकरे समर्थकांनी काढल्या होत्या. शाखेचे नुतनीकरण खासदार शिंदे यांनी केले होते. तसबिरी काढल्याचा राग होताच. त्यामुळे शाखेच्या ताब्यासाठी कागदोपत्री व्यवहार पूर्ण करुन शाखा ताबा घेण्यात आली आहे. – राजेश कदम, उपजिल्हाप्रमुख, बाळासाहेबांची शिवसेना

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -