Wednesday, May 8, 2024
HomeUncategorizedDisputes between MVA : जागावाटपाआधीच मविआत धुसफूस; वाद आले चव्हाट्यावर!

Disputes between MVA : जागावाटपाआधीच मविआत धुसफूस; वाद आले चव्हाट्यावर!

दक्षिण मुंबईसाठी काँग्रेस आणि ठाकरे गटाने एकमेकांना भरला दम

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Losabha Elections) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसून तयारीला सुरुवात केली आहे. एकीकडे महायुती (Mahayuti) राज्यव्यापी दौरे करण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील (MVA) वाद दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत आहेत. जागावाटपाआधीच त्यांच्यात मतभेद होत असल्याचं वारंवार समोर येत आहे. काही वेळेस तर आघाडीत काय निर्णय झाला आहे, हे त्यांच्यापैकी काही प्रमुख नेत्यांना माहितच नसते. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या वेळी मविआमध्ये सारं काही आलबेल नसल्याची चिन्हे आहेत. त्यातच आज दक्षिण मुंबईवरुन (South Mumbai) ठाकरे गट (Thackeray group) व काँग्रेसमधील (Congress) वाद चव्हाट्यावर आला आहे, ज्याचा परिणाम निवडणुकांमध्ये दिसून येणार आहे.

खासदार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शनिवारी गिरगावात सभा घेतली. ठाकरे गटाने दक्षिण मुंबईत आपला प्रबळ दावा केला असतानाच ‘ठाकरे गटाने दावा केल्यास काँग्रेसही दावा करून उमेदवार निश्चित करेल. महाविकास आघाडीसाठी लोकसभा निवडणूक सोपी ठरणार नाही. तेव्हा कुणीही सार्वजनिक वक्तव्ये किंवा दावे करू नयेत’, असा इशारा काँग्रेस नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी दिला.

लोकसभा जागा वाटपासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नसताना ठाकरे गटाकडून जागांवर केल्या जाणाऱ्या दाव्यांवरून पुन्हा एकदा काँग्रेस नेते नाराज झाले आहेत. उत्तर पश्चिम लोकसभा जागेनंतर दक्षिण मुंबईसाठीही काँग्रेस आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे. यावरुनच महाविकास आघाडीत मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि ठाकरे गटात पेच निर्माण होणार आहे, हे स्पष्ट आहे.

काय म्हणाले मिलिंद देवरा?

काँग्रेस नेते मिलिंद देवरा म्हणाले की, “माझे मतदार कार्यकर्ते समर्थक मला फोन करत आहेत. महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष दक्षिण मुंबईच्या जागेसाठी एकतर्फी दावा करत आहे. त्यामुळे तुमची चिंता वाढणे साहजिक आहे. मला कुठल्याही प्रकारे वाद वाढवायचा नाही किंवा करायचा नाही. त्यांच्या एका प्रवक्त्यानं मागील आठवड्यात काँग्रेस पक्षाला शून्यापासून सुरुवात करायला सांगितली. गिरगावच्या सभेत पुन्हा एकदा दक्षिण मुंबई लोकसभा जागेसाठी त्या घटक पक्षाकडून दावा करण्यात आला आहे.”

पुढे ते म्हणाले, “मागील ५० वर्षापासून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडे आहे. देवरा परिवार हा मतदारसंघ लढवत आला आहे. खासदार असो वा नसो लोकांची कामं दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात केली आहेत. कुठल्याही लाटेत आम्ही निवडून आलेलो नाही, काम आणि नात्यांनी आम्ही हा लोकसभा मतदारसंघ आतापर्यंत जिंकला आहे. महाविकास आघाडीसाठी लोकसभा निवडणूक सोपी होणार नाही, कोणीही सार्वजनिक वक्तव्य किंवा दावे करू नयेत, जर एखादा पक्ष औपचारिक चर्चेआधी जर अशा प्रकारे दावे करत असेल, तर काँग्रेससुद्धा जागांवर दावा करू शकते आणि उमेदवार देऊ शकते, मला वाटतं हा संदेश दिल्ली आणि मुंबईतील काही महत्त्वाच्या लोकांपर्यंत पोहोचेल.”, असं मिलिंद देवरा म्हणाले. यामुळे मविआत यापुढे जागावाटपावरुन आणखी काय वाद रंगणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -