Saturday, April 27, 2024
Homeताज्या घडामोडीपाऊस होऊनही नवी मुंबईकर तहानलेले

पाऊस होऊनही नवी मुंबईकर तहानलेले

मोरबे धरण ८० टक्के भरले, तरी देखील कमी दाबाने पाणीपुरवठा

नवी मुंबई (वार्ताहर) : पालिकेच्या मालकीचा असणाऱ्या मोरबे धरण परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे धरणात पाण्याची वाढ ही चांगली झाली आहे. परंतु नवी मुंबईतील अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु आहे. त्यामुळ एकीकडे मोरबे धरणात समाधानकारक पाऊस असून देखील पाणी पुरवठा कमी का, असा सवाल नवी मुंबईकर करत आहे.

२००५ मध्ये मोरबे धरण पालिकेने विकत घेतल्यावर किमान तीस वर्ष तरी पाण्याचे संकट पालिकेवर येणार नाही, याची ग्वाही देण्यात येत आहे. परंतु मोरबे धरण घेतल्यावर या घटनेला सतरा वर्षांचा कालावधी पूर्ण होत नाही तर पाण्याचे दुर्भिक्ष्य ओढवले गेले. त्यामुळे फेब्रुवारी २०२२ मध्ये पालिका प्रशासनाने पाणी कपातीचा निर्णय जाहीर केला. यामध्ये ऐरोली ते बेलापूर दरम्यान असणाऱ्या सात विभाग कार्यालय परिसरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा निर्णय जाहीर केला. परंतु या निर्णयाला सर्व स्थरातून विरोध झाल्याने पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली होती. हे सर्व चालू असताना शहरातील गावठाण, गावठाण विस्तार व झोपडपट्टीमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जशेच्या तसे आहे. यामुळे माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांनी मुख्यालयावर हंडा मोर्चा तर ऐरोलीमध्ये सेनेने मटका फोड आंदोलन केले होते.

राज्यात जुलै महिन्यात दमदार पाऊस झाल्याने अनेक धरणांमधील पाणी पातळी वाढली आहे. यामध्ये मोरबेदेखील चांगल्या पैकी भरले आहे. मोरबे धरणाची उंची ८९ मीटर आहे. आताच्याघडीला धरण परिसरात एकूण १७०७.२० मिली मीटर इतके पर्ज्यान्यमान झाले आहे. तर धरणाच्या पातळीत वाढ होऊन ७९.५३ पर्यंत पोहचली आहे. म्हणजेच धरणाची पातळी पूर्ण भरण्यासाठी मोजून दहा मीटर बाकी आहे. त्यामुळे साठलेले पाणी किमान डिसेंबर महिन्याचा शेवट गाठू शकते. परंतु ही वस्तुस्थिती असतानाही गावठाण, गावठाण विस्तार व झोपडपट्टीमध्ये आजही पाण्याची कमतरता आहे, सामाजिक कार्यकर्ते अमित जाधव यांनी सांगितले.

मोरबे धरणात चांगला पाऊस झाला आहे.तरीही नवी मुंबई मधील काही भागात पुरेसे पाणी मिळत नाही.यामुळे समाज माध्यमावर काही घटकांनी मोरबे धरण चोरीला गेले की काय असा पालिका आयुक्तांना चिमटा काढला आहे.

मोरबे धरण परिसरात पाऊस चांगला पडत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. तसेच नवी मुंबई शहरात नागरिकांना अपेक्षित पाणी मिळावे यासाठी प्रयत्नशील आहोत. परंतु असे असतानाही नागरिकांच्या पाण्याविषयी तक्रारी येत आहेत. यावर चौकशी करून पाणी का मिळत नाही, याची माहिती घेतली जाईल. -संजय देसाई, शहर अभियंता, पालिका.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -