Thursday, May 2, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनमुलांची सुट्टी नि मायभाषा

मुलांची सुट्टी नि मायभाषा

मायभाषा – डॉ. वीणा सानेकर

परीक्षांच्या तणावातून मुक्त होऊन विद्यार्थी सुट्ट्यांच्या जगात लवकरच मुक्त विहरणार आहेत. काहींच्या बाबतीत हा मुक्त विहार सुरूही झाला आहे. मराठीच्या जडणघडणीकरिता मुलांना कोणकोणते उपक्रम करता येतील किंवा त्यांच्याकडून करवून घेता येतील याचा विचार करताना जे सुचते आहे, त्याच्या नोंदी आजच्या लेखात करते आहे. हे मुद्दे मायभाषा समृद्द व्हावी म्हणून पूरक ठरावेत.आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील आवडलेल्या कविता वा धड्यावर टिपण लिहा. तसेच न आवडलेल्या कविता वा धड्यावरही टिपण लिहा. आवडणाऱ्या व न आवडण्यामागची कारणे लिहा. सुस्पष्ट विचारांच्या मांडणीचा मुलांना विविध बाबतीत उपयोग होईल.

नादमय शब्दांच्या जोड्या शोधा. (उदा. गंध – बंध, खाण – बाण, बंद – छंद इत्यादी )

  •  नामांकरता विशेषणे शोधणे.
  • शब्दांच्या भेंड्यांचा खेळ मुलांना शब्दसंग्रह वाढविण्याकरिता उपयुक्त ठरतो. (उदा. गावांच्या नावांच्या, आडनावांच्या, मुला-मुलींच्या नावांच्या भेंड्या)
  •  व्यंगचित्रे मुलांना विचारार्थ दाखवणे व त्यावर त्यांना बोलते करणे.

एखाद्या गोष्टीकडे तिरकसपणे पाहणे म्हणजे काय, हे मुलांना यातून समजेल. सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याचा स्वतंत्र दृष्टिकोन यातून तयार होऊ शकेल.

मराठीतील अवांतर वाचनाकरिता मुलांच्या हाती पुस्तके द्यावीत. पालकांनी आवर्जून पुस्तकांच्या दुकानांना मुलांसोबत भेटी द्याव्यात.

  •  मुलांना रोज दैनंदिनी लिहायला सांगावे.
  •  छोटे छोटे लेख लिहायला मुलांना सुट्टीत उद्युक्त करावे. विनोद, विडंबन, चमत्कृती अशा भाषेच्या वैशिष्ट्यांना वाव देणारे विषय सुचवावे.
  • शब्दकोडी सोडवणे व तयार करण्याकरिता प्रोत्साहन देणे.
  •  संगीत, नृत्य, नाट्य, चित्र या कलांशी भाषिक अनुभव जोडण्याचा प्रयत्न करणे.
  •  कवितेची गोडी लागावी म्हणून प्रयत्न करणे. लयबद्ध कवितांचे अनुभव देणे.
  •  चित्रावरून गोष्ट लिहिण्यास सांगणे.
  •  मुद्द्यांवरून गोष्ट तयार करण्यास देणे.
    भाजीवाला, पोस्टमन, फुलवाला, शेजारी, मित्र अशी विविध व्यक्तिचित्रे मुलांना लिहायला लावणे. त्यातून मुलांना माणसे वाचायला शिकवणे.
  •  म्हणींवरून गोष्टी, वाक्प्रचार यांच्याशी मैत्री करून देणे.
  •  एकाच शब्दाच्या विविध अर्थछटा शोधायला लावणे. (सार – सार, तीर-तीर)
  •  कोश पाहायला लावणे. त्यांचा उपयोग करून शब्दांच्या जन्मकथा शोधायला लावणे.

अन्य भाषांमधून मराठीने कोणते शब्द स्वीकारले, याचा शोध घ्यायला लावणे. गणित, विज्ञानाकरिता पालकांनी मुलांकरिता आधीच ट्यूशन, कोचिंग क्लासचा शोध घेतलेला असतो. या विषयांकरिता कितीही पैसे खर्च झाले तरी पालकांना त्याची पर्वा नसते. मायभाषेची जडणघडण जाणीवपूर्वक करावी लागते, याचे भान सहज विसरले जाते. खरे तर मायभाषेचा पाया पक्का असेल तर इतर विषयही पक्के होतात. अभिव्यक्ती, कल्पनाशक्ती, विचार या सर्वांच्या विकासाचे बीज मायभाषेतच लपलेले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -